पुणे-बेंगलोर महामार्गावरील कराडनजीकच्या तासवडे टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन छेडताना, वाहनधारकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. या वेळी आंदोलनकर्त्यांच्या दुपटीने पोलीस बंदोबस्त तैनात होता. आंदोलनकर्त्यां सुमारे शंभरावर मनसे कार्यकर्त्यांना तासवडे पोलिसांनी ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवताना केवळ ९ कार्यकर्त्यांवर कारवाईचा फार्स केला आहे.
मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी तासवडे येथील टोल वसुली लक्ष्य करण्याचा चंग बांधल्याच्या पार्श्र्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात राहताना, टोल वसुली करणाऱ्या यंत्रणेनेही आपली कुमक तैनात ठेवली होती. मात्र, तरीही टोल देणार नाही, अशी स्टिकर्स वाहनांवर चिटकवत ‘बोंबाबोंब आंदोलन’  मनसेने केले. आंदोलनादरम्यान, मनसेचे अतिउत्साही स्थानिक नेते दादा िशगण यांची चांगलीच हेळसांड झाली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल विरोधी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्र्वभूमीवर कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. मात्र, त्यांची संख्या मर्यादित असल्याने आंदोलनाची तीव्रता फारकाळ टिकू शकत नसल्याचे दिसून आले. आंदोलनात महेश जगताप, अ‍ॅड. विकास पवार, सागर बर्गे, नितीन महाडिक आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत तासवडे टोलनाक्यावर बंदोबस्त कायम होता. कराड विभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली तासवडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns movement on tasavade on toll booth