राहुरी येथे उद्यापासून (दि.१९) दोन दिवसांचे ११ वे विद्रोही साहित्य संमेलन सुरू होत आहे. डॉ. बाबूराव गुरव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनात विविध सामाजिक विषयांवरील परिसंवाद, तसेच गटचर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ वाजता कृषी विद्यापीठातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संमेलनपूर्व मिरवणूक सुरू होईल. ११ ते २ या वेळेत संमेलनाचे उद्घाटन सत्र आहे. डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांच्या हस्ते उद्घाटन होईल. डॉ. जालिंदर घिगे स्वागताध्यक्ष आहेत. राजेंद्र विधाते प्रस्तावना करतील. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके, माजी संमेलनाध्यक्ष राजा शिरगुप्पे, तसेच विद्यमान संमेलनाध्यक्ष गुरव यांची भाषणे होतील.
दुपारी ३ ते ५ या वेळेत भारतीय स्त्री समतेच्या ऐतिहासिक संघर्षांचा वारसा व भवितव्य या विषयावर परिसंवाद होणार आहे. नूतन दळवी अध्यक्ष असून त्यात प्रतिभा शिंदे, मनिषा टोकले, उल्का महाजन, स्मिता पानसरे, रंजना पगार-गवांदे सहभागी होणार आहेत. ५ ते ७ या वेळेत कवी वाहरू सोनवणे व त्यांचे सहकारी आदिवासी स्त्री गीते सादर करणार आहेत. सायंकाळी ७ ते साडेआठ या वेळेत होय, आम्ही राक्षस आहोत या विषयावर डॉ. राजेंद्र कुंभार, प्रा. शामसुंदर मिरजकर, प्रा. गौतम काटकर यांचा सहभाग असलेली चर्चा होईल. रात्री ९ वाजता कवीसंमेलन होणार आहे.
रविवारी (दि. २०) सकाळपासून बाल मेळावा व अनेक भरगच्च कार्यक्रम आहेत. त्यात विद्रोही शाहिरा जलसा, नंदू माधव, राजकुमार तांगडे, संभाजी भगत यांची प्रकट मुलाखत, जातीअंताचा लढा- ऐतिहासिक आढावा व पुढील दिशा यावर प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. कथाकथन, सडक नाटक, गट चर्चाही होणार आहे. सायंकाळी ५ वाजता समारोपाचे सत्र सुरू होईल. त्यात एकनाथ आव्हाड, हनुमंत उपरे, धनाजी गुरव आदींची भाषणे होतील. यशवंत मनोहर यांच्या उपस्थितीत ठराव वाचन होऊन नंतर संमेलनाध्यक्ष डॉ. गुरव यांचे भाषण होईल.