देशाला २०२०साली विकसित देशाच्या पंक्तीत बसविण्यासाठी शिक्षण हे महत्त्वपूर्ण साधन ठरणार असून, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये नतिक नेतृत्वगुण, संशोधकवृत्ती आणि चिकित्सात्मकता, रचनात्मकता व नवनिर्मितिगुण, उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबरोबच सतत शिक्षार्थी व प्रत्यक्ष काम करत राहण्याची वृत्ती विकसित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आज येथे केले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कलाम बोलत होते. केंद्रीय कृषिमंत्री आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-िनबाळकर, माजी मंत्री एन. डी. पाटील, शंकरराव कोल्हे, रयतचे अध्यक्ष अ‍ॅड. रावसाहेब िशदे, उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील, सचिव प्राचार्य डॉ. अरिवद बुरुंगले, सहसचिव प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड उपस्थित होते. कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांनी आपल्या जीवनात नीतिमूल्यांसह शिक्षण देण्याचे ध्येय अखेपर्यंत पार पाडले, असे गौरवोद्गार काढून डॉ. कलाम म्हणाले, राज्यात कोणतेही खेडे शाळेविना आणि कोणतीही शाळा प्रशिक्षित शिक्षकाविना असू नये ही त्यांची दूरदृष्टी सर्वसामान्य व वंचितांच्या मुलांमध्ये शिक्षणाप्रती जागृती करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली. बहुजनांचा उद्धार करण्याचे ध्येय ठेवून त्यांनी आपल्या सर्व शाळा सुरू केल्या. आज या संस्थेच्या १४ जिल्हय़ात ६७४ शाळा, महाविद्यालयांमध्ये ४ लाखांवर विद्यार्थी घडत आहेत. या मोठय़ा द्रष्टा व्यक्तीच्या जयंतीला उपस्थित राहता आले याचा आपल्याला आनंद आहे, असेही डॉ. कलाम म्हणाले.
देशाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये क्षमताबांधणीची गरज आहे, असे सांगून डॉ. कलाम म्हणाले, त्याअंतर्गत सहा बाबींमध्ये काम करण्याची गरज आहे.  शिक्षणाचे एक चांगले मॉडेल विकसित करण्याची आज गरज असून जेणेकरून विद्यार्थ्यांना देशाच्या आíथक विकासात आपला वाटा उचलण्यासाठी प्रेरित करता येईल.  आजच्या काळात आपण विकसित केलेले सर्व ज्ञान आणि माहितीचे व्यवस्थापन कसे करावयाचे याचेही ज्ञान विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. तंत्रज्ञानाचा अवलंब करून आज आपण स्वत:ला शेवटपर्यंत शिक्षार्थी बनविण्याची क्षमता प्राप्त केली आहे. आजच्या माहितीच्या महाजाळात ज्ञानाचे वैयक्तिकीकरण करणे यापेक्षा नेटवर्क गटांच्या माध्यमातून त्याचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे.  
विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान मिळविण्याची व त्याचा योग्य वापर करण्याची क्षमता विकसित झाली पाहिजे. शिक्षण घेताना त्यास मदत म्हणून आजच्या काळातील नवनवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणे विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे. याशिवाय शिक्षणास प्रारंभ केल्यापासून विद्यापीठ स्तरापर्यंत विद्यार्थ्यांमध्ये आंत्रप्रिन्युअरशिपचा कल विकसित करण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित होतील अशा शिक्षणपद्धतीची गरज आज आहे. यासाठी मोठी स्वप्ने पाहण्याची आणि मानवजातीच्या उत्थानासाठी दूरदृष्टी ठेवण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली पाहिजे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये आपण हे करू शकू याविषयी प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे.
शिक्षण हे आपल्याला जगामध्ये विहार करण्याचे पंख देतात, अशा शब्दांत शिक्षणाचे महत्त्व सांगून डॉ. कलाम म्हणाले, त्यासाठी आपण असामान्य अशा ध्येयाने प्रेरित झाले पाहिजे. थॉमस एडिसन, राईट बंधू, अलेक्झांडर ग्रॅहम बेल, सी. व्ही. रमण, श्रीनिवास रामानुजन, चंद्रशेखर सुब्रह्मण्यम, मादाम क्युरी अशा महान शास्त्रज्ञांचे आदर्श डोळय़ांसमोर ठेवून आपण स्वत:ला सामान्यातून असामान्य घडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.  विद्यार्थ्यांना त्याचा भोवतीचा परिसर व इतर सर्वजन सर्वसामान्य होण्यासाठी प्रेरित करतात.  मात्र विद्यार्थ्यांनी असामान्य शास्त्रज्ञांचा आदर्श घेत असामान्यत्वाकडे जाण्यासाठी अशा प्रवृत्तींशी झुंज दिली पाहिजे. यातूनच आपण आपले ध्येय प्राप्त करण्याबरोबच वेगळेपण सिद्ध करू शकाल, असेही ते म्हणाले.
डॉ. कलाम म्हणाले, विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांमध्येही उच्च गुणांची गरज आहे. तो ज्ञानाने संपन्न, विद्यार्थ्यांशी आपुलकीचे वर्तन करणारा व जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन असणारा असावा. केवळ शिक्षण देणे एवढेच मर्यादित काम न करता त्याने तरुणांची मने उच्च ध्येयाने प्रज्वलित केली पाहिजेत. सर्वसामान्य विद्यार्थ्यांमधून विशेष शिक्षण कौशल्याने उत्कृष्ट ते बाहेर काढू शकणाऱ्या शिक्षकाची आज गरज आहे, असेही ते म्हणाले.
आपल्या भाषणाचा प्रारंभ मराठी भाषेत करून डॉ. कलाम यांनी उपस्थितांची मने जिंकली. भाषणात अनेक उदाहरणे देत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.  ‘आय विल फ्लाय’ ही कविता सर्वाना आपल्यापाठोपाठ म्हणायला सांगून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांमध्ये आपल्या सुप्तशक्तींना जागृत करण्यास प्रेरित केले. देशाच्या आणि स्वत:च्या प्रगतीविषयी करावयांच्या बाबींचे अनेक मुद्दे असलेली प्रतिज्ञा सर्वाना दिली.
सामान्यांच्या जीवनात शिक्षणाची ज्योत पेटविण्याचे काम उभे आयुष्यभर कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांनी केले, असे गौरवोद्गार केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी या वेळी काढले.
पवार म्हणाले, डॉ. कलाम यांनी अत्यंत गरिबीतून आणि कष्टाने आपले शिक्षण पूर्ण केले.  शालेय, अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी देशाच्या संरक्षणक्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असे योगदान दिले. आपल्या संरक्षण मंत्रिपदाच्या कालावधीत डॉ. कलाम हे संरक्षण मंत्रालयाचे सल्लागार होते. त्या कालावधीत क्षेपणास्त्र विकासासाठी त्यांनी राबविलेल्या कार्यक्रमामुळे परक्या देशाला आपल्या देशाकडे वाकडय़ा नजरेने पाहण्याची िहमत झाली नाही, असेही पवार या वेळी म्हणाले. याप्रसंगी अ‍ॅड. रावसाहेब िशदे यांचेही भाषण झाले. सचिव डॉ. बुरुंगले यांनी प्रास्ताविकात रयतच्या कामकाजाचा आढावा सादर केला. प्रारंभी सर्व मान्यवरांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमास विविध पदाधिकारी, अधिकारी, प्राध्यापक, नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need to develop the qualities in students dr a p j abdul kalam