खातेप्रमुखांची उडवाउडवीची उत्तरे व निष्क्रियतेने तालुका दुष्काळ आढावा बैठकीत तहसीलदार व आमदार संतापले. येत्या आठ दिवसांत निर्णयांची योग्य अंमलबजावणी न केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा तहसीलदार राहूल जाधव यांनी दिला.
पंचायत समिती सभागृहात आमदार अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत टँकर मागणी, तात्पुरत्या नळ योजना, रोजगार हमी आदीबाबत कोणतेही प्रस्ताव दाखल केले नाही तसेच शासकीय आदेशाची अंमलबजावणी केली याबद्दल ग्रामसेवकांनी बेपर्वाईची उत्तरे दिली. रांजणगाव देशमुख भागातील पाणी साठवण तलावाच्या आठ वर्षांपूर्वीपासूनच्या गळती संदर्भात जलप्राधिकरण अधिकाऱ्यांनी कोणतीच दखल घेतली नाही. पाटबंधारे खात्याने पिण्याच्या पाण्यासाठी गावतळी, साठवण तलाव भरून देण्यास कुचराई केली. अनेक ठिकाणी चाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे कागदोपत्री पूर्ण केल्याने अनेक कार्यकर्ते संतप्त झाले.
सध्या शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेल्या २० टक्के विहिरीच्या खोदकामास बांधकाम परवानगी देण्यात आली. प्रत्यक्षात अद्याप कामे सुरू झाली नाही. ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक दुष्काळी परिस्थितीत नोकरीच्या गावी न राहता वेळ मिळेल तेव्हाच नोकरीच्या ठिकाणी एखादा दिवस थांबतात. अशा तक्रारींमुळे आमदार काळे यांनी कपाळावर हात मारून घेतला, तर तहसीलदार राहूल जाधव यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वर्तन माणुसकीला काळीमा फासणारे असल्याची जळजळीत टीका केली. प्रत्येक खात्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दररोज केलेल्या कामाचा अहवाल देण्याचा आदेश तहसीलदारांनी दिला. येत्या शनिवारी आमदारांशी चर्चा करून अल्पावधीत प्रांताधिकारी व आमदारांच्या उपस्थितीत आढावा  बैठक घेण्यात येईल. या बैठकीत आगामी दीड महिन्यातील कामकाजाचा आराखडा तयार करण्यात येईल. या कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार जाधव यांनी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Negligence of gramsevak in drought meeting