पाणीप्रश्नाचे राजकारण करुन भाजपचे आमदार राम शिंदे नौटंकी सादर करत असल्याचा व राष्ट्रवादीतूनही नथीतून तीर मारण्याचे प्रकार सुरु आहेत, असा आरोप करताना पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी या सर्वाना आपण योग्य वेळी उत्तर देऊ, असा इशाराही दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज पक्ष कार्यालयात जिल्ह्य़ातील दुष्काळी परिस्थिती व पक्षाचे अध्यक्ष, केंद्रिय मंत्री शरद पवार यांच्या दि. १२ रोजीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या नियोजनावर चर्चा करण्यासाठी जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी पाचपुते बोलत होते. जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
पाचपुते म्हणाले कुकडीच्या पाण्यासाठी दि. ६ नोव्हेंबरला कालवा समितीची सभा होती, भुतवडा तलावात एक महिना पुरेल इतका पाणीसाठा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सभेत आ. शिंदे यांनी चौंडी तलावात पाणी सोडण्याची कोणतीही मागणी केली नाही, त्यानंतर आपण व जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा बैठक घेतली, त्यावेळीही त्यांनी भूमिका मांडली नाही, कुकडीचे २३ दिवस आवर्तन सुरु होते, आधी कर्जतला व नंतर श्रीगोंदे, करमाळ्याला पाणी देण्याचे नियोजन केले. चौंडीच्या कालव्यासाठी दिलीप वळसे पालकमंत्री असताना आपणच दिड कोटी रुपये द्यायला लावले, कर्जत-जामखेड हा काही पाकिस्तानचा भाग नाही, त्यामुळे श्रीगोंद्यासाठी चारी न उघडता कर्जतला पाणी दिले, मांगीतूनही पाणी देण्याचा विचार होता, परंतु तरीही आ. शिंदे गैरसमज निर्माण करुन देत आहेत, आपल्याला व राष्ट्रवादीला बदनाम करत आहेत, त्यांच्या आत्मदहनाचा प्रयत्न म्हणजे एक नौटंकीच होती.
आ. शिंदे पाणी प्रश्नावर राजकारण करत असल्याने कर्जत-जामखेडमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष शेलार यांनी केले. जिल्ह्य़ात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ८४ पैकी ४८ राष्ट्रवादीला, प्रत्येकी १३ काँग्रेस व भाजपला, ७ शिवसेनेला व ३ इतरांच्या ताब्यात आल्याची आकडेवारी त्यांनी सादर केली.
जिल्ह्य़ातील दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधत पदाधिकाऱ्यांनी चारा, पाणी, टँकर पुरवठा व रोजगार हमीची कामे करण्यात दिरंगाई होत असल्याकडे लक्ष वेधणाऱ्या तक्रारी केल्या. तसेच पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, उपाध्यक्ष मोनिका राजळे, राजेंद्र कोठारी, संजय कोळगे, सरोदे, बाबासाहेब भोस, पोपटराव पवार, नानासाहेब तुवर, आबासाहेब थोरात, दत्तात्रेय अडसुरे, नानासाहेब निकत, केशव बेरड, विठ्ठलराव काकडे, डॉ. मेधा कांबळे, अंबादास गारुडकर आदींची भाषणे झाली.      
मुळाचे आज आवर्तन
मुळा धरणातून सिंचनासाठी उद्या (मंगळवारी) सायंकाळी आवर्तन सोडले जाणार आहे व भंडारदऱ्याचेही तीन आवर्तन होणार असल्याची माहिती पालकमंत्री पाचपुते यांनी दिली. जिल्ह्य़ात प्रशासनाकडून जनावरांच्या छावण्या सुरु करण्याबाबत उदासीनता दाखवली जात आहे, त्यांनी लवकर निर्णय घेतले नाही, अडवणुकीचे धोरण घेतले तर कारवाई करावी लागेल, असाही इशारा त्यांनी दिला.

 कळमकरांचा मोर्चा काढण्याचा इशारा
दुष्काळाच्या संदर्भात प्रशासन अडवणूक करत असल्याने मोर्चा काढण्याचा इशारा माजी जिल्हाध्यक्ष दादा कळमकर यांनी दिला. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष व भिंगार अध्यक्ष पदाचा निर्णय अद्यापि न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत मनपा व भिंगार छावणी मंडळाच्या निवडणुकीत परस्पर आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ नेत्यांनी फिरवली पाठ
पक्षाच्या सभेकडे जिल्ह्य़ातील बहुतेक ज्येष्ठ नेत्यांनी नेहमीप्रमाणे पाठ फिरवली, सभा सुरु झाल्यानंतरही आमदार, काही नेते व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी काही वेळातच काढता पाय घेतला. त्यांच्यामागे समोर बसलेले कार्यकर्तेही निघून गेले, त्यामुळे सभा सुरु होण्यापूर्वी भरलेले पक्षाचे सभागृह, प्रत्यक्षात सभा सुरु झाल्यावर मात्र निम्म्याहून अधिक रिकामे झाले होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते सभेपूर्वी झालेल्या जिल्हा बँकेच्या पदाधिकारी निवडीस उपस्थित होते. परंतु त्यानंतर लगेचच असलेल्या पक्षाच्या सभेकडे ते फिरकले देखील नाहीत. जिल्हाध्यक्ष शेलार यांनी यापूर्वी पक्षाच्या सभेस अनुपस्थित राहिल्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा इशारा दिला होता, परंतु आजच्या अनुपस्थितीची त्यांनी दखलही घेतली नाही. सभा सुरु होताच लगेचच आ. अरुण जगताप, आ. चंद्रशेखर घुले, माजी आमदार पांडुरंग अभंग निघून गेले, त्यांच्या मागे त्यांचे समर्थकही सभेतून उठून गेले. जलव्यवस्थापन समितीची सभा असल्याचे कारण सांगत जि. प. अध्यक्ष लंघे, उपाध्यक्ष राजळे आपले भाषण आटोपताच गेले, त्यांच्या मागे जि. प.चे इतर पदाधिकारी व सदस्यही निघून गेले. त्यामुळे व्यासपीठही बरेचसे रिकामे झाले.