जामखेड तालुक्यातील नान्नज येथील सराफाच्या घरावर ४० दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सुमारे अकरा लाखांचे दागिने पळवून नेले. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील कासार गल्लीमध्ये अमोल दत्तात्रय पंडित यांचे घर असून तेथेच दुकानही आहे. आज मध्यरात्री अडिचच्या सुमारास घराच्या मागील बोळीमधून काही दरोडेखोर आले. त्यांनी तेथील जुना दरवाजा तोडून स्वयंपाकघरात प्रवेश केला. उचकापाचक करताना आवाज झाला म्हणून अमोलचे वडील दत्तात्रय पंडित जागे झाले. मात्र, पुन्हा आवाज न झाल्याने ते परत झोपले. त्यानंतर घरात आलेल्या दरोडेखोरांनी बाहेर असलेल्या अन्य साथीदारांनाही घरात बोलावले व शोधाशोध सुरू केली.
दत्तात्रय पंडित यांना संशय आल्याने त्यांनी अमोल व त्याचा भाऊ यांना जागे केले. घरात असणारे दोन भाचे व आजी यांनाही उठवले व दरोडेखोरांना भीती दाखवण्यासाठी स्वत:जवळील छऱ्र्याच्या बंदुकीतून एक गोळी फायर केली. मात्र त्यामुळे दरोडेखोर चिडले व त्यांनी पंडित कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता ते वाडय़ातील दुसऱ्या खोलीत पळाले व तेथून घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केला, मात्र बाहेर जाता आले नाही, त्यावेळी दरोडेखोरांनी त्यांचा पाठलाग करून शस्त्रांचा धाक दाखवून दुकानात प्रवेश केला व कपाटे फोडून त्यामधील २०० ग्रॅम सोन्याचे व साडेपंधरा किलो चांदीचे दागिने असा सुमारे ११ लाख १० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. हा सर्व प्रकार सुमारे पाऊणतास सुरू होता. हे सर्व घडत असताना कासार गल्लीतील सर्व लोक जागे झाले होते व ते पंडित यांच्या घराबाहेर जमले होत. मात्र, सर्वादेखत दरोडेखोर पळून गेले. आज अप्पर पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथकाने एक किलोमीटरपर्यंत माग काढला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People worried after 11 lacs thept