कुख्यात गुंड शाहरूख शेख याच्याकडून पोलिसांनी मंगळवारी गावठी कट्टा हस्तगत केला. गावठी पिस्तुलाची खरेदी विक्री करणा-या रॅकेटचा शोध त्यामुळे पोलिसांना घेता येणार आहे.
शाहरूख शेख याने चितळी (ता. राहाता) येथे गोळीबार करून भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या चौधरी यास जखमी केले होते. शाहरूख याला नाशिक येथील दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिका-यांनी मालेगाव येथे पकडले. शेख याला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. दि. २४ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांनी शेख याच्याकडून गावठी पिस्तूल हस्तगत केले. त्याला पिस्तूल पुरविणा-यांची नावे पोलिसांना मिळाली असून लवकरच त्यांना अटक केली जाणार आहे. शाहरूख शेख याने यापूर्वी शिर्डी येथील गुन्हेगार पाप्या शेख याच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात एका लहान मुलाचा मृत्यू झाला होता. जामिनावर सुटला असताना तो फरार झाला. पुन्हा कारागृहात हजर झाला नव्हता. त्यामुळे दहशतवादविरोधी पथकाने त्यास ताब्यात घेतले. दोन वर्षांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. शाहरूख याच्यावर कोपरगाव, शिर्डी, श्रीरामपूर येथे अनेक गुन्हे आहेत. कोल्हार येथील भगवती माता पतसंस्था फोडून लाखो रुपये त्यांनी लंपास केले होते. या गुन्ह्यात तो फरार होता. शाहरूख हा कुख्यात गुंड चन्या बेग टोळीचा सदस्य आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने धूम स्टाईलने पळविण्यात तो माहीर आहे. त्याला अटक केल्यामुळे आता अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pistol seized from the infamous hooligan shrahrukh