एचआयव्हीची लागण झाल्याची त्यांना आता सल नाही. जीवनाला नव्याने आकार देण्यासाठी आता त्यांची धडपड सुरू आहे. त्याकरिता काहींनी अशा आजारात गुरफटलेला जोडीदार निवडून अध्र्यावर टाकलेला डाव पुन्हा मांडायला घेतला आहे तर काहींनी आपल्या पाल्यांच्या भवितव्याकडे संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. नवीन उद्योग, पुनर्वसन केंद्रात काम व नोकरीच्या माध्यमातून ते देखील आर्थिकदृष्टय़ा आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी येथील महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा लिमिटेड आणि यश फाऊंडेशन यांच्या वतीने राबविण्यात येणारा उपक्रम कारणीभूत ठरत आहे.
एचआयव्हीग्रस्तांमध्ये जीवनाकडे सकारात्मकपणे पाहण्याचा दृष्टीकोन रुजविणे आणि प्रामुख्याने त्यांना आर्थिकदृष्टया निर्भर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. चार वर्षांपासून शहरात एचआयव्ही, एड्स याविषयी जनजागृतीपर कार्यक्रम राबविले जात आहेत. संस्थेने पुनर्वसनाचा जेव्हा विचार केला, तेव्हा सर्वप्रथम लहान बालक हे लक्ष्यगट म्हणून निश्चित करण्यात आले. त्या अंतर्गत एचआयव्हीबाधित अथवा एड्सग्रस्त १०० हून अधिक मुलांना संस्थेच्यावतीने सकस आहार वाटप करण्यात येतो. या मुलांसाठी निवासी संकुल उभारण्याचाही त्यांचा मानस आहे. संस्थेने महिला व पुरूषांच्या पुनर्वसनासाठीही ठोस पाऊले टाकण्यास सुरूवात केली आहे. कार्यालयीन कामांसाठी दोन एड्सग्रस्तांना नोकरी देऊन उर्वरीत रुग्णांना त्यांच्या कौशल्यानुसार पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या उपक्रमाने जीवनाला वेगळे वळण मिळालेल्या एड्सग्रस्तांची कहाणी वेगवेगळी.
‘मला एड्स पतीकडून झाला. या आजाराविषयी समजल्यावर सासरच्या मंडळींनी माझ्याशी सर्व संबंध तोडून टाकले. पतीने दुसरा घरोबा केला. त्याचा संसार सुखात सुरू आहे. पण आजही मला त्रास देण्यासाठी तो अधुनमधून येतो. माझ्या घरच्यांना माझ्याविरूध्द भडकावतो. पण, मला आता त्याचा काही फरक पडत नाही. मी माझ्या पायावर उभी आहे. माझा मुलगा केवळ एचआयव्हीबाधित असून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी सर्व समस्यांचा सामना करत आहे’ एचआयव्ही बाधित नीलिमा (नाव बदलले आहे) यांची ही प्रतिक्रिया त्यांचा आत्मविश्वास स्पष्ट करते. संस्थेच्या पुनर्वसन केंद्रात कार्यरत ज्योतीची स्थिती फारशी वेगळी नाही. ‘माझे हे दुसरे लग्न. पहिल्या पतीचे अपघातात निधन झाले. त्यानंतर मुलगा वारंवार आजारी पडू लागला. खासगी दवाखान्यातील तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला एड्स झाल्याचे सांगितले. पण, तुम्हीही तपासणी करून घ्या, असे काहीच सुचविले नाही. मुलगा वारंवार आजारी राहात असल्याने नातेवाईकांनी घरातील सर्वाना तपासणी करून घेण्यास सुचविले. त्यात माझ्या दोन्ही मुलींना एड्स असल्याचे निदान झाले. एकिकडे समाजाकडून आजारपणाबद्दल होणारी सातत्याने विचारणा, मुलाचे निधन, यामुळे मी पूर्णत: खचून गेले. परंतु या पुनर्वसन केंद्रात आल्यानंतर ही सल कुठे निघून गेली ते समजलेच नाही’ असे त्यांचे म्हणणे. दु:खाचा बाऊ करण्याऐवजी जगण्याशी दोन हात करण्याचे शिक्षण मला इथे मिळाल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
संस्थेत सर्वाच्या सहभागाने संध्याने एचआयव्ही, एड्स आजाराची लक्षणे, त्यावरील उपाय समजल्यानंतर या विषयी प्रबोधन करण्यासाठी एनपीसी (नेटवर्क पीपल चिल्ड्रन विथ एचआयव्ही) या संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून कर्मचारी समुपदेशकांची भूमिका निभावत आहेत. तसेच एचआयव्हीबाधितांनी स्वत:चे विवाह समुपदेशन केंद्रही सुरू केले आहे. या माध्यमातून आजवर चौघांचा विवाह झाला आहे. आर्थिकदृष्टय़ा आत्मनिर्भर करण्यासाठी पुनर्वसन केंद्रामार्फत मेणबत्ती तयार करणे, बॉक्स फाईलची निर्मिती, वेगवेगळ्या कंपन्यासाठी लागणारे कापडी हातमोजे तयार करणे, स्क्रिन प्रिटींग यांसह गरज व मागणीनुसार हंगामी साहित्य तयार करण्याचे काम सुरू आहे.
या साहित्याला बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणावर मागणी असली तरी संस्थेकडे मनुष्यबळ कमी असल्याची खंत संस्थेचे रवींद्र पाटील यांनी व्यक्त केली. सध्या महिंद्रासह क्रॉम्प्टन, सुप्रिम इंडस्ट्री, लिअर ऑटोमोबाईल, अनिष फार्मा आदी कंपन्यांना हे साहित्य पुरविले जाते. पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून आजवर ५० हून अधिक एचआयव्हीबाधित तसेच एड्स असणाऱ्या रुग्णांना खासगी कंपन्यांमध्येही रोजगार देण्यात आला आहे.
एचआयव्हीबाधितांना मानसिक, सामाजिक आधार देणे व नोंद केलेल्या प्रकरणांचा पाठपुरावा करण्याचे काम संस्था करत आहे.