मिरज स्थानकावर सायन्स एक्स्प्रेसमधील महिला स्वयंसेविकेची छेडछाड काढण्याचा प्रकार रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने केला असून रेल्वे स्थानकावरच स्वयंसेविकांनी या जवानाची यथेच्छ धुलाई केली. रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
सर्वसामान्य जनतेला विज्ञानातील अद्ययावत शोध, माहिती  मिळावी यासाठी केंद्र शासनाच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाच्या वतीने सायन्स एक्स्प्रेसश शनिवार (दि.६)पासून मिरज स्थानकावर आहे. प्रत्येक डब्यातील वैज्ञानिक माहिती देण्यासाठी महिला कर्मचारी तनात आहेत. या पकी एका महिला स्वयंसेविकेची छेड काढण्याचा प्रयत्न रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने केला. यामुळे संतप्त झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनी या जवानाला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरच बेदम चोप दिला.
या संदर्भात महिला स्वयंसेविका रीतसर तक्रार दाखल करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात गेली होती. मात्र त्या ठिकाणी संबंधित जवानाने दिलगिरी व्यक्त करून क्षमा याचना केली. संबंधित तरुणीनेही या जवानाला माफ करण्याचा निर्णय घेतला.
सुरक्षा दलाचे निरीक्षक गोकूळ सोनोनी यांच्याशी संपर्क साधला असता घडलेली घटना मान्य करून रितसर फिर्याद दाखल नसली तरी संबंधित जवानाला १५ दिवसांसाठी सक्तीच्या रजेवर धाडण्यात आल्याचे सांगितले.