घरात एकटय़ा असलेल्या महिलेला दोन रखवालदारांनी जबरदस्तीने उचलून शाळेच्या गच्चीवर नेले आणि जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. गेल्या गुरुवारी घडलेला हा प्रकार उघडकीस आला असून, भोसरी पोलीस ठाण्याची पथके दोन्ही आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.
या प्रकरणी संबंधित ३५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून रमेश ब्रीजमोहन कोटार आणि राजूप्रसाद जगमोहन कोटार (रा. उत्तर प्रदेश) या दोन सुरक्षारक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक मार्गावर एका गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. या ठिकाणी उत्तर प्रदेशातील दोन व नेपाळचा एक असे तीन सुरक्षारक्षक काम करतात. या महिलेचा नवरासुद्धा तिथेच सुरक्षारक्षक आहे. तो गुरुवारी रात्रपाळीवर होता, त्यामुळे ही महिला घरी एकटीच होती. त्या वेळी उत्तर प्रदेशातील दोन सुरक्षारक्षक रात्री नऊच्या सुमारास त्या महिलेच्या घरात शिरले. त्यांनी तिला जबरदस्तीने उचलून जवळच्याच गृहप्रकल्पाच्या गच्चीवर नेले. त्या ठिकाणी दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची माहिती महिलेने पतीला सांगितली. हा सर्व प्रकार या गृहप्रकल्पाच्या व्यवस्थापकाला सांगितल्यानंतर त्याने दोघांनाही कामावरून काढून टाकले. या प्रकरणी एका स्थानिक महिला नगरसेवकाच्या मदतीने पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात रविवारी रात्री तक्रार दिली.
याबाबत सहायक पोलीस आयुक्त विष्णू माने यांनी सांगितले की, महिलेने तक्रार दिल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपीही निष्पन्न झाले आहेत. त्यांना लवकरच अटक केली जाईल.