करवीर निवासिनी महालक्ष्मीला सोमवारी ६५ तोळे वजनाचा सोन्याचा ‘चंद्रहार’ कर्नाटकातील रेड्डी कुटुंबीयांनी अर्पण केला. सुमारे २० लाख रूपये किमतीचा हा हार सोळा पदरी आहे. नेल्लोर येथील मेघापाटीराजगोपाल रेड्डी यांनी हा हार देवस्थान समितीचे सदस्य प्रमोद पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. साडेतीन शक्तिपीठापैकी एक प्रमुख शक्तिपीठ म्हणून महालक्ष्मी मंदिराकडे पाहिले जाते. देश-विदेशातील हजारो भाविक येथे दररोज देवीच्या दर्शनासाठी येत असतात. तिरूपती बालाजीप्रमाणे महालक्ष्मीला सोन्या-चांदीचे दागिने अर्पण करण्याचे प्रमाण वाढत आहे. सोमवारी रेड्डी कुटुंबीयांच्यावतीने ६५ तोळे वजनाचा चंद्रहार देवीला अर्पण करण्यात आला. या वेळी खासदार राजमोहन रेड्डी, आमदार चंद्रशेखर रेड्डी, अभिनव रेड्डी आदी उपस्थित होते. देवस्थान समितीचे व्यवस्थापक धनाजी जाधव, प्रशांत गवळी, प्रल्हाद सावंत यांनी त्यांचे स्वागत केले.     
या वेळी मेघापाटी रेड्डी म्हणाले,की गेली आठ वर्षे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आम्ही येत आहोत. देवीच्या कृपाआशीर्वादामुळे आमच्या कुटुंबीयांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत. त्यातून उतराई होण्यासाठी देवीला चंद्रहार अर्पण केला आहे. यापूर्वी दरवर्षी देवीच्या प्रसादासाठी अर्थसाहाय्य करीत होतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reddy family of karnataka offering gold jewellery to mahalaxmi