रेडक्रॉस म्हणजे केवळ आपत्ती व्यवस्थापन आणि प्रथमोपचाराचे उत्कृष्ट कार्य करणारी संघटना असा आपला समज होता. परंतु नाशिकच्या रेडक्रॉसने सुरू केलेले पाळणाघर, शहरी आरोग्यसेवा केंद्र, नागरी आरोग्य केंद्र आणि आता हे फिजिओथेरपी केंद्र हे उपक्रम पाहून रेडक्रॉसच्या मानवतावादी कार्यातील सातत्य आणि आवाका लक्षात आला, असे प्रतिपादन अशोका समुहाचे सर्वेसर्वा अशोक कटारिया यांनी केले. येथील रेडक्रॉस शाखेत फिजिओथेरपी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अत्यंत अल्प शुल्क आकारून रुग्णांना उत्तम उपचार मिळणार असल्याने या उपक्रमासही प्रतिसाद मिळेल आणि हे केंद्र गरजू व गरीब जनतेसाठी मोठा आधार बनेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. व्यासपीठावर रेडक्रॉसचे सचिव पी. एम. भगत, ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य डॉ. बी. टी. चौधरी हे उपस्थित होते. भगत यांनी प्रास्ताविकात गरीब जनतेसाठी भौतिकोपचार केंद्राचा प्रकल्प आणि हा प्रकल्प सुरू करण्याचा उद्देश याबाबत माहिती दिली. डॉ. प्रतिभा औंधकर यांनी रेडक्रॉस इमारतीमध्ये सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रशांत भुतडा यांनी करून दिला. राजश्री पगारे यांनी सूत्रसंचालन केले. आभार डॉ. अनिल गोसावी यांनी मानले.