महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यांच्या निवडीत काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर झालेल्या कुरघोडय़ांचे दृश्य परिणाम लगेचच दिसू लागले आहेत. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा आदेश डावलल्याबद्दल पक्षाचे मनपातील गटनेते तथा माजी महापौर संदीप कोतकर यांना शिस्तभंगाची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेनेत नवेच महाभारत सुरू झाले असून स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून पक्षाच्या नगरसेविका अनिता राठोड यांच्या राजीनामा नाटय़ाने शिवसेनेत नवेच वादळ घोंगावू लागले आहे.
मनपाच्या स्वीकृत सदस्यांच्या निवडीत सर्वच पक्षात स्थानिक पातळीवर कुरघोडय़ांचेच राजकारण अधिक रंगले. शुक्रवारी झालेल्या या खेळ्यांचा पुढचा अध्यायच शनिवारी झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी या पदासाठी पक्षाचे शहर जिल्हा सरचिटणीस अनंत देसाई यांच्या नावाची शिफारस केली होती. तसा आदेशही त्यांनी शुक्रवारी बजावला होता, प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर त्यात बदल होऊन त्यांच्या जागी विखे समर्थक सुभाष लोंढे यांची निवड करण्यात आली. त्याची पक्षाच्या प्रदेशाध्याक्षांनी लगेचच दखल घेतली आहे. ठाकरे यांच्याच आदेशानुसार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील यांनी याबद्दल मनपातील गटनेते संदीप कोतकर यांना आज शिस्तभंगाची कारणे दाखवा नोटीस बजावली. प्रदेशाध्यक्षांनी आदेश देऊनही स्वीकृत सदस्यपदी त्यानुसार निवड न करता आपण शिस्तभंग केला असून त्याचा खुलासा येत्या तीन दिवसांत लेखी स्वरूपात करावा अन्यथा आपल्यावर पुढील कारवाई केली जाईल, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
शिवसेनेत स्वीकृत सदस्य निवडीवरून मुळातच मोठा वादंग होता. त्यांनी आमदार अनिल राठोड यांचे चिरंजीव विक्रम यांची या पदी निवड केली. मात्र त्यासाठी सुधीर पगारिया यांचे नाव चर्चेत होते. ते मागे पडले. शनिवारी त्यावरून पक्षात वेगळाच गोंधळ सुरू झाला आहे. पक्षाच्या नगरसेविका अनिता राठोड यांनी या निवडीच्या निषेधार्थ शनिवारी सभागृहातच त्यांच्या पदाचा राजीनामा मनपाचे आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याकडे देण्याचा प्रयत्न केल्याने पक्षात एकच गोंधळ उडाला. ही बाब लक्षात आल्याने अनिल शिंदे, पक्षाचे गटनेते संजय शेंडगे यांनी व्यासपीठावर जाऊन हे राजीनामापत्र हस्तगत केले. त्यानंतर लगेचच सभाही संपली.
मात्र श्रीमती राठोड यांचे पती व माजी नगरसेवक राजेंद्र राठोड काही वेळातच मनपात आले व त्यांनी दुसरे राजीनामापत्र सादर करण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र राठोड यांनी या पदासाठी संतोष बिज्जा यांच्या नावाचा आग्रह धरला होता. विक्रम राठोड यांच्याऐवजी त्यांनाच स्वीकृत करावे अशी त्यांची मागणी होती, मात्र ती मान्य न झाल्याने त्याच्या निषेधार्थ त्यांनी पत्नीच्या नगरसेवकपदाच्या राजीनाम्याचे अस्त्र उपसून आमदार अनिल राठोड यांनाच शह दिल्याचे मानले जाते. या प्रकाराने शिवसेनेत गोंधळ उडाला असतानाच राजेंद्र राठोड यांनी पत्नीसह आयुक्तांच्या दालनात ठिय्या देऊन राजीनाम्याचा प्रयत्न केला, मात्र सभा संपल्यानंतर आयुक्त लगेचच औरंगाबादला रवाना झाल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. अखेर प्रभारी उपायुक्त विश्वनाथ दहे येथे आले, मात्र तोपर्यंत आगरकर यांच्यासह शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढून राजीनामापत्र तर त्यांच्याकडून घेतलेच, शिवाय येथून त्यांना ते घेऊन गेले. ज्यांच्या निवडीवरून हा गोंधळ सुरू होता. त्या विक्रम राठोड यांनी मात्र या सर्व प्रकाराकडे पाठच फिरवली, ते इकडे फिरकलेही नाहीत.
खरंच राजीनामा की..?
शिवसेनेतील श्रीमती राठोड यांच्या राजीनामा नाटय़ाने मनपातील वातावरण काही वेळ तापले होते. राजेंद्र राठोड यांनी पत्रकारांना येथे थांबू द्यावे अशी सूचना केली होती. मात्र या विषयावर पत्रकारांशी ते काहीही बोलले नाही. नंतर पक्षाच्या वर्तुळातच ही चर्चा रंगली होती. त्यांच्या पत्नी खरंचच नगरसेवकपदाचा राजीनामा देणार की, ही नियोजनबध्द खेळी, याविषयी चर्चा सुरू होती. त्यामुळेच हे पेल्यातील वादळ ठरेल असे शिवसेनेच्याच वर्तुळातून सांगण्यात येते. विशेष म्हणजे राजेंद्र राठोड यांनी ज्यांचा आग्रह धरला होते, ते संतोष बिज्जाही यावेळी उपस्थित होते.