मिठी नदीवर पूल बांधून साकीनाका ते आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जाण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या रस्त्यांच्या मार्गातील पुनर्वसनाचा अडथळा दूर झाला असून येत्या ३ महिन्यांत हे रस्ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर साकीनाक्यापासून अवघ्या पाच मिनिटांत आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जाता येईल.
कुर्ला एल विभागात एमटीएनएल आणि लाठीया रबर रस्त्याचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले होते. एमटीएनएल रस्त्याची लांबी ४८० मीटर असून रूंदी १६.३० मीटर आहे. तर लाठीया रबर रस्त्याची लांबी ५८२ मीटर व रुंदी १८.३ मीटर आहे. या दोन्ही रस्त्यांसाठी मिठी नदीवर पूल बांधण्यात येत असून त्यांची लांबी ३० मीटर व रूंदी १८.३० मीटर आहे. हे दोन्ही रस्ते व मिठी नदीवरील पुलांच्या कामासाठी एकूण ३० कोटी ३४ लाख रुपये खर्च आहे.
निवासी आणि व्यावसायिक गाळय़ांमुळे या रस्त्यांचे काम वर्षभरापासून अडले होते. त्याबाबत अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकाराखाली विचारणा केली असता, पुनर्वसनाच्या प्रश्नामुळे हे गाळे काढता येत नसल्याचे सांगण्यात आले. आता माहुल येथील डीबी रिलाल्टी प्रकल्पातील इमारत क्रमांक १९ मधील गाळे पुनर्वसनासाठी उपलब्ध झाले आहेत. त्यासाठी सोडत काढण्यात आली असून आठवडाभरात प्रकल्पग्रस्तांना त्यांचा ताबा मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे आता या दोन्ही रस्त्यांच्या कामातील अडथळा पूर्ण झाला असून बाकीचे काम येत्या तीन महिन्यांत, एप्रिल २०१३ पर्यंत होण्याची अपेक्षा आहे.
हे रस्ते झाल्यानंतर साकीनाक्यापासून आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जाण्यासाठी वाहनाचालकांची मोठी सोय होईल.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Feb 2013 रोजी प्रकाशित
विमानतळ परिसरातील रस्ते एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा
मिठी नदीवर पूल बांधून साकीनाका ते आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जाण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या रस्त्यांच्या मार्गातील पुनर्वसनाचा अडथळा दूर झाला असून येत्या ३ महिन्यांत हे रस्ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
First published on: 02-02-2013 at 03:12 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roads around airport area expected to complete by april