इचलकरंजी येथील साळुंखे मळ्यात राहणारे स्टँम्प रायटर रवींद्र आंबोळे यांच्या घरामध्ये शुक्रवारी मध्यरात्री चोरटय़ांनी सुमारे १५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. आंबोळे हे आईच्या अंत्यविधीसाठी परगावी गेल्याची संधी साधून चोरटय़ांनी डल्ला मारला. घटनास्थळी ठसेतज्ञ व श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. गावभाग पोलीस ठाण्यामध्ये चोरीची नोंद झाली आहे.
इचलकरंजी येथील गांधी हॉस्पिटलसमोर रवींद्र महादेव आंबोळे हे राहतात. त्यांचे हातकणंगले व इचलकरंजीतील राजाराम स्टेडियम येथे दोन कार्यालये आहेत. त्यांच्या आई पार्वतीबाई आंबोळे यांचे आठवडय़ापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे आंबोळे हे कुटुंबीयांसोबत हातकणंगले येथील घरी राहात होते. त्यांच्या घरामध्ये कोणी नसल्याचे पाहून चोरटय़ांनी घरफोडी केली.
घराच्या उजव्या बाजूच्या खिडकीचा गज वाकवून चोरटे घरात घुसले. त्यांनी तीन खोल्यांतील आठ कपाटे फोडली. त्यातील २५ तोळे सोने, पावणे दोन लाखाचा हिऱ्यांचा सेट, ५ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम असा सुमारे १५ लाखांचा मुद्देमाल चोरटय़ांनी लांबविला. आंबोळे यांना चोरी झाल्याचे कळताच त्यांनी ही माहिती गावभाग पोलिसांना दिली. गावभागचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, विष्णू सूर्यवंशी घटनास्थळी आले. ठसेतज्ञांनी पाहणी केली. श्वानपथक त्या परिसरातच घुटमळत राहिले. या परिसरात गेल्या वर्षभरात १० ते १२ घरफोडय़ा झाल्या आहेत. त्याचा छडा अद्याप लागला नसल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या शुक्रवारी चांदणी चौकातील जैन मंदिरात चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता, तर मंगळवारी गावभागातील अंबाबाई मंदिरात देवीचे दागिन्यांसह ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटय़ांनी लांबविला होता.
संग्रहित लेख, दिनांक 18th Aug 2013 रोजी प्रकाशित
इचलकरंजीत घरफोडी; १५ लाखांचा मुद्देमाल लंपास
इचलकरंजी येथील साळुंखे मळ्यात राहणारे स्टँम्प रायटर रवींद्र आंबोळे यांच्या घरामध्ये शुक्रवारी मध्यरात्री चोरटय़ांनी सुमारे १५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. आंबोळे हे आईच्या अंत्यविधीसाठी परगावी गेल्याची संधी साधून चोरटय़ांनी डल्ला मारला.
First published on: 18-08-2013 at 01:51 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery in ichalkaranji theft of 15 lakhs