येणार येणार म्हणून प्रदीर्घ काळापासून केवळ चर्चेत असलेल्या लष्कराच्या हवाई दलाची (आर्मी एव्हीएशन) लढाई हेलिकॉप्टरची प्रतिक्षा आता संपुष्टात आली असून पुढील तीन ते चार महिन्यात विविध स्वरूपाची शस्त्र धारण करणारी ध्रुवची लढाऊ आवृत्ती ‘रुद्र’ हेलिकॉप्टर ताफ्यात समाविष्ट होत आहे. आकाशात हवाई निरीक्षण कक्ष स्थापून तोफखान्याच्या माऱ्याचे निरीक्षण आणि युद्ध मैदानावर शस्त्र व अन्य सामग्रीचा पुरवठा अशा सहाय्यकारी (सपोर्टीग आम्र्स) दलाच्या भूमिकेत राहिलेला या दलाची कामगिरी ‘रुद्र’ आल्यावर शस्त्रदल अर्थात ‘फायटिंग आम्र्स’च्या स्वरूपात बदलणार आहे. दरम्यान, या लढाऊ हेलिकॉप्टरवरील नियंत्रण व संचालनावरून हवाई दल-लष्करात उद्भवलेल्या वादाचे कवित्व अद्याप वेगवेगळ्या मार्गाने सुरू आहे. या वादाचा कोणताही प्रत्यक्ष उल्लेख न करता आर्मी एव्हीएशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लढाऊ हेलिकॉप्टर्स युद्धभूमीवर नेण्याची केवळ लष्करी वैमानिकांची क्षमता असल्याचे ठासून सांगण्याची बाब त्याच कवित्वाचा भाग होय.
येथील आर्मी एव्हिएशनच्या स्कुलतर्फे शुक्रवारी आयोजित १८ वा दीक्षांत सोहळा आर्मी एव्हीएशनचे अतिरिक्त संचालक मेजर जनरल पी. के. भराली यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या निमित्ताने लष्कराच्या हवाई दलात ३७ वैमानिकांची तुकडी नव्याने समाविष्ट झाली आहे. यावेळी मार्गदर्शन करताना भराली यांनी रुद्र ही लढाऊ हेलिकॉप्टर्सची नवीन आवृत्ती या आर्थिक वर्षांच्या अखेपर्यंत आर्मी एव्हीएशनमध्ये दाखल होणार असल्याचे सांगितले. गेल्या काही वर्षांपासून लढाऊ हेलिकॉप्टर्स ताफ्यात समाविष्ट करण्याच्या मुद्यावर निव्वळ चर्चा सुरू होती. त्यात मध्यंतरी या लढाऊ हेलिकॉप्टर्सवर कोणाचे नियंत्रण असावे यावरून लष्कर व हवाई दल यांच्यात बेबनाव निर्माण झाला होता. या वादावर हेलिकॉप्टर्स लष्कराकडे देण्याचा निर्णय घेऊन पडदा टाकण्यात आला. परंतु, या विषयाचे पडघम वेगवेगळ्या प्रकारे उमटत असल्याचे लक्षात येते. दीक्षांत सोहळ्यात भराली यांनी हवाई दल वा या वादाचा कोणताही संदर्भ न देता लढाऊ हेलिकॉप्टर्सवर लष्कराचे वैमानिक सर्वोत्तम कामगिरी करू शकतात, असा दाखला देऊन सूचक विधान केले. आर्मी एव्हीएशनच्या वैमानिकांची प्रत्यक्ष युद्धमैदानात हेलिकॉप्टर नेण्याची क्षमता आहे. इतरांकडे तशी क्षमता नाही, असेही त्यांनी नमूद केले. त्यांचे हे वक्तव्य उभय वादाची किनार अधोरेखीत करत आहे.
यावेळी आर्मी एव्हीएशनच्या विस्तारीकरणाची माहिती देण्यात आली. भारतीय लष्कराचा आर्मी एव्हीएशन दल हे एखाद्या छोटय़ा देशाच्या हवाई दलापेक्षा मोठे आहे. सद्यस्थितीत आर्मी एव्हीएशनकडे २५५ हेलिकॉप्टर असून १९ ‘स्कॉड्रन’ कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. वैमानिकांना मार्गदर्शन करताना भराली यांनी सुरक्षित उड्डाणाचे महत्व विषद केले. यावेळी प्रशिक्षणात वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थी वैमानिकांना गौरविण्यात आले. सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून कॅप्टन सुदीप के. यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. ‘ग्राऊंड सबजेक्ट’ विषयातील कामगिरीबद्दल बी. एन. त्रिपाठी यांनाही भराली यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दरम्यान, गांधीनगर येथील स्कुलच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यात प्रत्यक्ष युद्धात या दलामार्फत केल्या जाणाऱ्या कार्यवाहीची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यात चित्ता, चेतक, व ध्रुव या हेलिकॉप्टर्सने सहभाग नोंदविला. सुमारे अर्धा तास चाललेल्या प्रात्यक्षिकांनी स्कुलच्या मैदानास जणू रणभूमीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
काय आहे ‘रुद्र’ हेलिकॉप्टर ?
हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेडने यापूर्वी निर्मिलेल्या ‘ध्रुव’ या हेलिकॉप्टरची ‘रुद्र’ ही नवीन लढाऊ आवृत्ती आहे. अत्याधुनिक कॉकपीट, ७० एम. एम. रॉकेट्स डागण्याची क्षमता, २० एम. एम. गन, स्व संरक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर यंत्रणा ही त्याची काही खास वैशिष्ठय़े. विशेष म्हणजे, रात्री व दिवसा कार्यरत राहणारे कॅमेरे, इन्फ्रा रेड इमेजिंग आदी आधुनिक तंत्राचाही त्यात अंतर्भाव आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास ७० ‘रुद्र’ आर्मी एव्हीएशनला पुरविली जाणार आहेत.