जिल्ह्य़ातील महिला बचतगटांच्या उत्पादनाचे ‘साईज्योती स्वयंसहायता यात्रा’ प्रदर्शन यंदा ४ ते ८ जानेवारी दरम्यान सावेडीतील जॉगिंग पार्क मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शन आयोजनाचे हे चौथे वर्ष आहे. यंदा प्रदर्शनात २५०हून अधिक गट सहभागी होतील.
जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे व मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या स्वर्णजयंती ग्रामरोजगार योजनेअंतर्गत हे विक्री व प्रदर्शन भरवले जाणार आहे, त्यासाठी राज्य सरकारकडून १० लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. पहिल्या वर्षी जिल्हास्तरीय व नंतरचे सलग दोन वर्षे विभागीय स्तरावरील प्रदर्शन आयोजित करुन बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यात आली होती. या तीनही प्रदर्शनांना नगरकरांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याने मोठी उलाढाल झाली होती. यंदाही उत्पादनांची मोठी विक्री होईल, अशी अपेक्षा लंघे यांनी व्यक्त केली.
प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते होईल, तसेच प्रदर्शनास भेट देण्यासाठी जिल्ह्य़ातील मंत्री, आमदार, खासदार यांना निमंत्रित केले जाणार आहे. प्रदर्शनस्थळी रोज सायंकाळी ७ ते १० वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. इतर जिल्ह्य़ातील निवडक महिला बचतगट, तसेच काही एपीएलच्या गटांसाठीही प्रदर्शनात स्टॉल असतील.
प्रदर्शनात बचतगटांनी तयार केलेल्या विविध वस्तू असतील, त्याचबरोबर अनेक खाद्यपदार्थाची मेजवानीही मिळणार असल्याची माहिती डीआरडीएचे प्रकल्प संचालक डॉ. वसंत गारुडकर यांनी सांगितले.
गेल्या तीन प्रदर्शनांमुळे ग्रामीण भागातील महिला बचतगटांमध्ये उत्पादन व बाजारपेठेविषयी व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण झाला आहे. गटांच्या उत्पादनांना कायमस्वरुपी बाजारपेठ मिळावी यासाटी जिल्ह्य़ातील ८ तालुका ठिकाणी विक्री केंद्रांची बांधकामे सुरु असून पारनेर, नेवासे व अकोले येथील कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जि. प. उपाध्यक्ष मोनिका राजळे, सभापती हर्षदा काकडे, प्रा. शाहूराव घुटे, बाबासाहेब तांबे, तसेच अधिकारी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 19th Dec 2012 रोजी प्रकाशित
४ ते ८ जानेवारी दरम्यान बचतगटांचे प्रदर्शन
जिल्ह्य़ातील महिला बचतगटांच्या उत्पादनाचे ‘साईज्योती स्वयंसहायता यात्रा’ प्रदर्शन यंदा ४ ते ८ जानेवारी दरम्यान सावेडीतील जॉगिंग पार्क मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शन आयोजनाचे हे चौथे वर्ष आहे. यंदा प्रदर्शनात २५०हून अधिक गट सहभागी होतील.
First published on: 19-12-2012 at 04:54 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saving group show between 4 to 8 january