लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याने निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी घरी बसून महापालिकेची चालविलेली आर्थिक लूट आणि शहरातील उद्यानांचे खासगीकरण या मुद्यांवरून कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला बुधवारी धारेवर धरण्यात आले. काही मुद्यांवरून सभागृहात वैचारिक मतभेदामुळे गोंधळ झाला होता. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर जयश्री सोनवणे होत्या. महानगरपालिकेतील काही अधिकारी व कर्मचारी भ्रष्टाचारामुळे निलंबित करण्यात आले आहेत. मात्र अशांना महापालिकेचे वेतन सुरू आहे.
कॉमन मॅनचा थाळीनाद
उद्यानांच्या खासगीकरणास विरोध दर्शवित बुधवारी कॉमन मॅन व जनशक्ती या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर घंटानाद आंदोलन केले. तत्पूर्वी शिवाजी चौकातून महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला.महापालिकेसमोर दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उद्यानांच्या खासगीकरणाबद्दल जोरदार घोषणाबाजी केली. याचवेळी सभा सोडून नगरसेवक आंदोलकांना भेटण्यासाठी आले. त्यांनी उद्यानांच्या खासगीकरणाचा विषय हाणून पाडू असे आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात सुभाष वोरा, बाबा इंदूलकर, जीवन पाटील, काका पाटील, समीर नदाफ, रामेश्वर पत्की आदींनी भाग घेतला. दरम्यान भाजपाच्या वतीनेही या प्रश्नी महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी राहुल चिकोडे, संदीप देसाई, संजय सावंत, मधुमती पावनगडकर, अमोल पालोजी, सुलभा मुजूमदार आदी उपस्थित होते.