सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष मेघराज मडेप्पा ऊर्फ अप्पासाहेब काडादी यांचे सोमवारी दुपारी चार वाजता पुण्यातील खासगी रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, कन्या असा परिवार आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे धर्मराज काडादी यांचे ते चुलते होत. त्यांच्या पाíथवावर उद्या मंगळवारी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. सोलापूरच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, शेती, उद्योग आदी क्षेत्रांत काडादी यांनी भरीव योगदान दिले होते.
मेघराज काडादी यांना सांधेदुखीचा आजार होता. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या गुडघ्यावर मागील आठवडय़ात यशस्वी शस्त्रक्रियाही झाली होती. परंतु गेल्या तीन दिवसांपासून अचानक हृदयविकार बळावल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. मंगळवारी दुपारी चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सोलापूरच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, शेती व उद्योग क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. मितभाषी, मृदू, संयमी असे काडादी यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे, पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल आदींनी शोक व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सोलापूरचे दिवंगत ज्येष्ठ नेते, माजी खासदार अप्पासाहेब काडादी यांचे पुत्र असलेले मेघराज काडादी हे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर देवस्थान समितीचे १९९२पासून ते आजतागायत अध्यक्ष होते. मंदिर परिसराच्या विकासासाठी त्यांनी सिंहाचा वाटा उचलला होता. याशिवाय सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या संगमेश्वर शिक्षण संस्थेची धुरा ते अनेक वर्षांपासून वाहात होते. २००६-११ या कालावधीत त्यांनी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्षपदही सांभाळले होते. सोलापूरच्या नावाजलेल्या ‘संचार’ वृत्तपत्राची भागीदारी तथा व्यवस्थापनाची जबाबदारीही मेघराज काडादी यांनी अखेपर्यंत सांभाळली.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Sep 2013 रोजी प्रकाशित
सिद्धरामेश्वर देवस्थानचे अध्यक्ष मेघराज काडादी यांचे निधन
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष मेघराज मडेप्पा ऊर्फ अप्पासाहेब काडादी यांचे सोमवारी दुपारी चार वाजता पुण्यातील खासगी रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले.
First published on: 03-09-2013 at 02:02 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddharameshwar temple chairman meghraj kadadi passes away