आडत्यांच्या प्रश्नाबाबत आज पणन संचालकांची बैठक
आडत्यांनी बंद पुकारला असल्याने गुलटेकडी येथील मार्केट यार्डमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी माल विक्रीची व्यवस्था करण्यात आली असल्याने मागील चार दिवसांच्या तुलनेत भाज्यांची आवक वाढली आहे. मात्र, काही ठरावीक भाज्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने या भाज्यांचे दर भडकले आहे. त्यामुळे मोठा दर देऊन भाजी घ्यावी लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, आडत्यांच्या प्रश्नावर गुरुवारी पणन मंडळाच्या कार्यालयामध्ये बैठक होणार असून, त्यात काही तोडगा निघतो का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांनी आणलेल्या मालावर सहा टक्केच आडत आकारण्याच्या निर्णयाला विरोध करून आडत्यांनी मागील पाच दिवसांपासून बंद पुकारला आहे. शेतीमाल आडत्यांकडून उचलला जात नसल्याने नुकसान होण्याच्या भीतीने सुरुवातीला शेतकऱ्यांनी माल बाजारात न आणल्याने भाज्यांचे भाव भडकले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मालाच्या विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकरी स्वत:च मालाची विक्री करीत आहेत. त्यामुळे मागील चार दिवसांच्या तुलनेत बुधवारी मालाची आवक वाढली. १७ टक्क्य़ांपर्यंत घसरलेली आवक बुधवारी ५० टक्क्य़ांवर गेली. मात्र, ठरावीक काही भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मिरची, मटार, घेवडा, दुधी भोपळा, गाजर, भेंडी आदी भाज्यांचा मोठय़ा प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असल्याने या भाज्यांचे भाव पुन्हा भडकले आहेत. शहरातील किरकोळ बाजारपेठांमध्ये सर्वच भाज्यांचे भाव वाढलेले दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे काही भाज्या बाजारामध्ये उपलब्धच नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. किरकोळ बाजारामध्ये फळांचाही मोठय़ा प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे फळांचेही भाव कडाडले आहेत. फुल बाजारामधील परिरिस्थिती मात्र वेगळी आहे. फुलांची आवक मोठय़ा प्रमाणावर होत असली, तरी खरेदीदार येत नसल्याने मातीमोल किमतीला शेतकऱ्यांना फुलांची विक्री करावी लागत आहे. न विकलेली फुले अक्षरश: फेकून द्यावी लागत आहेत. बाहेरगावच्या खरेदीदारांना आडत्यांकडून बाजारात येऊ दिले जात नसल्याचा आरोपी काही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. आडत सहा टक्केच ठेवली पाहिजे, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, आडत्यांच्या या प्रश्नावर पणन संचालकांकडून गुरुवारी बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीला राज्यातील बाजार समित्यांचे प्रतिनिधी, आडत्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. आडत आकारण्याच्या निर्णयाला झालेला विरोध व त्यामुळे भाज्यांचे वाढलेले भाव लक्षात घेता या प्रश्नावर
तोडगा काढण्यासाठी ही बैठक होत आहे. या बैठकीचा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे.