काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ९ डिसेंबर रोजी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी’च्या वतीने शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात आला. पुणे शहर काँग्रेस कमिटी आणि सहारा आश्रम संस्था यांच्या वतीने काँग्रेस भवन येथे अंध, अपंग, मूकबधिर आणि मतिमंद मुलामुलींसाठी वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
‘प्रबोधन’ संस्थेतर्फे ८ ते १४ या वयोगटातील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या २१ गरजू मुलांना दत्तक घेण्यात आले. संस्थेचे संस्थापक मिलिंद काची यांनी ही माहिती दिली. ‘पुणे शहर जिल्हा युवक काँग्रेस कमिटी’तर्फे गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
‘महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ संचालित कै. सि. धो. आबनावे कला महाविद्यालया’तर्फे सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण व प्रदर्शन सोहळाही ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
‘पुणे शहर काँग्रेस ज्येष्ठ नागरिकां’च्या वतीने अनाथ आश्रमांमध्ये धान्य वाटप करण्यात आले. ‘श्री आदिजांबमुनी समाज संस्था’ आणि ‘कन्नड समाज’ या संस्थांतर्फे आदर्श शिक्षकांचे सत्कार व शाळकरी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.