स्वातंत्र्यसंग्रामात योगदान देणा-या ब्राह्मण समाजावर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र मोठय़ा प्रमाणात अत्याचार होत आहेत. अत्याचार निवारणासाठी आता एप्रिल महिन्यापासून टोल फ्री क्रमांकावर‘परशुराम हेल्पलाइन’ची सेवा सुरू होत असून ब्राह्मण समाजावर जेथे अत्याचार होईल, त्यांनी या हेल्पलाइनचा आधार घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय बहुभाषक ब्राह्मण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश त्रिपाठी यांनी येथे केले.
येथील उत्सव मंगल कार्यालयात अखिल भारतीय बहुभाषक ब्राह्मण संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वधू-वर परिचय मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी आमदार भाऊसाहेब कांबळे, ज्योतिषरत्न प्रीती कुलकर्णी, राष्ट्रीय सचिव सुरेश मुळे, मंजुश्री शुक्ला, अजित त्रिपाठी, प्रा. श्रीकांत देशपांडे, दिगंबर जोशी, जयंत ससाणे, नगराध्यक्षा राजश्री ससाणे, उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, सिद्धार्थ मुरकुटे उपस्थित होते.
त्रिपाठी म्हणाले, समाजात हुंडा देणे-घेणे ही पद्धत आता हद्दपार करावी लागणार आहे. जर कोणी हुंडय़ाची देवाण-घेवाण केली तर संबंधितांना समाजातून बहिष्कृत करण्याचा इशारा त्यांनी दिला. समाजात मुलींची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. स्त्रीभ्रूणहत्या रोखल्या पाहिजे. चांगल्या संस्कार व विचाराची गरज आहे. आरक्षणामुळे ब्राह्मण समाजाच्या भावी पिढीचे भविष्य अंधकारमय झाले आहे. जातिनिहाय होणारे आरक्षण बंद करून आर्थिक निकषावर आरक्षणाची आता गरज आहे. नाहीतर संपूर्ण आरक्षणच बंद करण्याचा आग्रह केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे.
प्रा. श्रीकांत देशपांडे म्हणाले, ब्राह्मण समाज संघटित झाला तर समाजाला डावलणा-या उमेदवाराचा पराभव करण्याची ताकद निश्चित निर्माण होणार आहे. समाजातील आर्थिकदृष्टय़ा गरीब असणा-या होतकरू तरुण-तरुणींसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात राज्य सरकारची तात्त्विक मान्यता मिळाली आहे. येत्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीनंतर हे मंडळ अस्तित्वात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या वेळी नगराध्यक्षा राजश्री ससाणे, मंजुश्री शुक्ला, सुरेश मुळे आदींची भाषणे झाली. या वेळी राज्यभरातून आलेल्या वधू-वरांचे परिचय संमेलन संपन्न झाले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. मेळाव्यात सुमारे २५० हून अधिक वधू-वरांनी नाव नोंदणी केली. डॉ. अजित देशपांडे यांनी स्वागत केले. पुरूषोत्तम मुळे यांनी प्रास्ताविक केले. के. टी. जोशी यांनी आभार मानले.