महापालिकेची निवडणूक ऐन तोंडावर आलेली असताना पक्षातील गटबाजीला वैतागून ज्येष्ठ नेते ब्रीजलाल सारडा यांनी शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने पक्षात मोठीच खळबळ उडाली आहे. राजीनामा देण्यासाठी सारडा यांनी पत्रात जी कारणे दिली आहेत, त्याचीही प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ पातळीवरही गंभीर दखल घेतल्याचे समजले. याबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईत बैठक आयोजित करण्याचेही घाटत आहे.
सारडा यांचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी पूर्वीपासून घनिष्ठ संबंध आहेत, त्यामुळे राजीनाम्याची माहिती शिंदे यांनाही दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पक्षाच्या अखिल भारतीय समितीकडूनही याची दखल घेतली जाईल, अशी त्यांच्या निकटवर्तीची अपेक्षा आहे. सारडा जरी काही बोलण्याचा इन्कार करत असले तरी त्यांनी अद्याप राजीनामा परत घेतलेला नाही. ऐन निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर पक्षातील दुफळी अशा पद्धतीने समोर आल्याने पक्षातील अनेक इच्छुक उमेदवारांमध्येही चलबिचल आहे. नियुक्तीनंतर सारडा यांनी संघटनाबांधणीस वेग दिला होता, त्यामुळे निवडणुकीत पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली होती. काही आजी-माजी नगरसेवकांनीही पक्षात प्रवेश केला होता. काही प्रवेशासाठी इच्छुक होते, त्यांच्यावरही याचा परिणाम होणार आहे.
शहराला स्वतंत्र जिल्हय़ाचा दर्जा असल्याने ग्रामीणपासून शहराचे स्वतंत्र कार्यालय असावे असा दावा करत सारडा यांनी लालटाकी भागात स्वतंत्र कार्यालय सुरू केले होते, त्याची पूर्वकल्पना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे या दोघांनाही देण्यात आली होती. त्यानुसारच शनिवारी दोघांच्या उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन करण्याचे घाटले होते. परंतु थोरात यांचा दौरा रद्द झाल्याने हे उद्घाटन लांबले. परंतु सारडा यांच्या राजीनाम्याची दखल घेत विखे यांनी त्यांच्याशी बंद खोलीत चर्चा करून तर थोरात यांनी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यामार्फत सारडा यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. पक्षाचे निरीक्षक आमदार शरद रणपिसे यांनीही या वादाची माहिती घेतली.
शहराचे स्वतंत्र कार्यालय हे जरी वादाचे निमित्त ठरले असले तरी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांचा शहरातील वाढता हस्तक्षेप व त्यांच्या माध्यमातून काही ठराविक पदाधिकारी निर्माण करत असलेली गटबाजी हेच राजीनाम्यामागील मूळ कारण असल्याचे सांगितले जाते. पूर्वी भानुदास कोतकर शहर जिल्हाध्यक्ष असल्यापासून शहराचे स्वतंत्र कार्यालय होते, त्या वेळी कोणी त्याबद्दल हरकत घेण्याचे धाडस दाखवले नाही, याकडे काही जण लक्ष वेधतात. ससाणे हे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत, मात्र मतदारसंघाच्या शोधात असलेल्या ससाणे यांनी जिल्हय़ात इतरत्र कोठेच बैठका न घेता केवळ नगर शहरातच त्यांनी बैठका घेण्याचे कारण काय, याचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत.
पक्षाला नगर शहरासाठी अनेक महिने जिल्हाध्यक्ष मिळालेला नव्हता. काही दिवस विनायक देशमुख यांची या पदावर नियुक्ती झाली, तेव्हाही त्यांना सारडा यांच्यासारखाच वैताग दिला गेला होता. प्रदेश संनियंत्रण समितीचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर तर देशमुख यांनी शहरात लक्ष घालण्याचेही बंद केले. पक्षश्रेष्ठींना शहरात संघटना बांधणी होऊच द्यायची नाही का, असा प्रश्न या निमित्ताने निष्ठावंतांच्या मनात उपस्थित राहिला आहे.