मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत शहराजवळ वाहतूक ठप्प होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या व उंबरखेड चौफुलीवरील भुयारी मार्ग तसेच सव्‍‌र्हिस रोडच्या कामात अडथळा ठरणाऱ्या येथील प्रार्थनास्थळ, पुतळे व वृक्षांचा अडसर तातडीने दूर करावा व दीर्घकाळ रेंगाळलेले महामार्गाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तीन-चार वर्षांपासून पिंपळगाव बसवंत ते गोंदे या ८० किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून पिंपळगाव बसवंत आणि ओझरजवळील काही भागाचा अपवाद वगळता बहुतेक काम पूर्ण झाले आहे. वाहतूक ठप्प करणारे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव बसवंत येथील काही नागरिकांच्या आडमुठेपणामुळे उंबरखेड व चिंचखेड चौफुलीवरील भुयारी मार्ग व उड्डाणपुलाचे काम रेंगाळले आहे. त्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात या ठिकाणी होतच असतात. येथील शहा पेट्रोल पंपासमोर प्रार्थनास्थळ, पुतळा व छोटेसे उद्यान आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास हा अडथळा दूर करण्यात अपयश आले आले असून त्यामुळे महामार्गावर सातत्याने वाहतूक ठप्प होत आहे.
हा परिसर मोकळा न झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी, अपघात, काम करताना अडचणी व विकासात खीळ बसत असून त्यामुळे महामार्गालगतच्या व्यवसायांवरही परिणाम होत आहे. पिंपळगाव बाजार समितीसमोर असणारा उड्डाणपूल काही धनदांडग्यांनी स्वत:चे व्यावसायिक नुकसान होऊ नये म्हणून राजकीय वरदहस्ताने रद्द करून घेतला. त्यामुळे कोटय़वधी रुपये खर्च करून उभा केलेला उड्डाणपुलाचा सांगाडा अक्षरश: भुईसपाट करण्यात आला. हा उड्डणपूल रद्द झाल्यामुळे सहापदरी रस्ता झाला तरी  वाहतूक ठप्प होण्याची समस्या ‘जैसे थे’ राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पिंपळगावाजवळ वाहतूक कोंडी होण्यास बाजार समितीकडे जाणारी वाहनेही अधिक कारणीभूत राहात असल्याने समितीसमोर उड्डाणपूल आवश्यक होता, असे वाहनधारकांचे म्हणणे आहे.