त्र्यंबोली यात्रेवेळी वेताळमाळ तालीम व खंडोबा तालीम यांच्यात डॉल्बी मागेपुढे करण्यावरून शुक्रवारी जोरदार मारहाण झाली. त्याचे पर्यवसन दगडफेकीमध्ये होऊन दोन महिलांसह सुमारे २० जण जखमी झाले. दोन चारचाकी वाहनांसह अर्धा डझन दुचाकींची मोठी नासधूस करण्यात आली. पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगविले तरी रात्रीपर्यंत या परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. पोलिसांच्या आठ पथकांनी घटनास्थळी जाऊन हल्लेखोरांना घरात घुसून शोधण्याचे काम केले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्याचे काम सुरू होते.    
शुक्रवारी त्र्यंबोली यात्रेमध्ये वेताळमाळ तालीम व खंडोबा तालीम या मंडळांचा सहभाग होता. दोन्ही मंडळाचे कार्यकर्ते डॉल्बीच्या तालावर थिरकत पुढे चालले होते. दोन्ही मंडळांच्या तरुण कार्यकर्त्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात होती. डॉल्बी पुढे नेण्यावरून दोन्ही तालमीच्या कार्यकर्त्यांमध्ये बलभीम बँकेजवळ थोडा वाद झाला, मात्र तो लगेचच मिटविण्यात आला. त्यानंतर मिरवणूक पुढे सुरू झाली.    
बुवा चौकातील झुंजार क्लब येथे मिरवणुका पोहोचल्यावर पुन्हा एकदा वादाने उसळी खाली. वेताळमाळ तालमीचा डॉल्बी पुढे होता. तर मागून खंडोबा तालमीचा डॉल्बी येत होता. खंडोबा तालमीचा मार्ग दुसरीकडे जाणार असल्याने त्यांचा पुढे जाण्याचा प्रयत्न सुरू होता. तर वेताळमाळचा डॉल्बी जागीच थांबला होता. त्यांचे कार्यकर्ते डॉल्बीच्या तालावर नाचत होते. मिरवणुकीतील डॉल्बी पुढे जाण्यास मार्ग न मिळाल्याने या ठिकाणी दोन्ही मंडळांत पुन्हा वाद झाला. तो इतका विकोपाला गेला की दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांनी परस्परांवर दगडफेक केली. जोरदार दगडफेकीमुळे या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला. यामध्ये १० ते१५ जण जखमी झाले. तर एक तवेरा, स्विफ्ट व रिक्षा या वाहनांचीही जमावाने तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक विठ्ठल पवार, जयवंत खाडे हे मोठय़ा फौजफाटय़ासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, चव्हाण गल्ली येथे एका मंडळाचा जमाव शिरला. त्यांनी घराघरांत घुसून मारहाण सुरू केली. त्यामध्ये पार्वतीबाई सूर्यवंशी व विद्या पाटील या दोन महिला जखमी झाल्या. जमावाने या गल्लीत उभा केलेल्या दोन होंडा, स्प्लेंडर, रिक्षा या वाहनांचीही मोडतोड केली. जमावाकडून दगडफेकही केली जात होती. या भागात दगड व चपलांचा खच पडला होता. हा प्रकार सुरू असताना पोलिसांची कुमक तेथे दाखल झाली. त्यांनी पाठलाग करून हल्लेखोरांना मारण्यास सुरुवात केली. यामुळे जमाव तेथून निघून गेला. तथापि या परिसरात रात्री उशिरापर्यंत तणाव कायम होता. वेताळमाळ मंडळाचे प्रमुख भाजपचे ज्येष्ठ नेते रामभाऊ चव्हाण यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिसरात शांतता ठेवण्यात मदत करावी, असे आवाहन केले.