चिपळूण येथे नियोजित ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पारधी समाज अभ्यास आयोगाच्या निर्मितीचा ठराव करण्यात यावा या मागणीसाठी पारधी मुक्ती आंदोलनातर्फे संमेलनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा पारधी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष प्रकाश वायदंडे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
पत्रकात म्हटले आहे की, संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्याकडे मोर्चाद्वारे महाराष्ट्र सरकारने पारधी समाज अभ्यास आयोगाची स्थापना करावी असा ठराव करण्याबाबतचा आग्रह धरण्यात येणार आहे. सदर आयोगाच्या मागणीकरिता अर्थसंकल्पीय अधिवेशन काळामध्ये विधानभवनावर धडक मोर्चा काढण्यात आला होता.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याबरोबरही आयोगासंदर्भात सकारात्मक चर्चा झालेली आहे. परंतु, पारधी समाजाच्या व्यथा अखिल भारतीय स्तरावर साहित्य संमेलनाच्या माध्यमाने पोहोचतील व राज्यकर्त्यांना समाजातून पारधी समाजातून पारधी अभ्यास आयोगासंदर्भात विचारणा व्हावी त्यामुळे पारधी समाज पुनर्वसन गरज व दिशा निश्चित होईल या उद्देशाने ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर  मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
या मोर्चाच्या यशस्वीयतेसाठी राज्य उपाध्यक्ष दलित मित्र सनातन भोसले, विभागीय अध्यक्ष अनिल कांबळे, सातारा जिल्हाध्यक्ष कैलास पवार, पुणे जिल्हाध्यक्ष भोसले, सांगली जिल्हाध्यक्ष विजय आठवले, संपर्क प्रमुख पवन निकम, महिला आघाडीच्या श्रीमती रेश्मा काळे पवार, राणी शिंदे, ऐश्वर्या काळे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि पारधी बांधव प्रयत्नशील असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strick for allowance of pardhi samaj