जीवनात यशस्वी होण्यासाठी पुस्तकी किडा होऊन चालणार नाही तर ज्ञानाच्या कक्षा वाढवून प्रत्येक विद्यार्थ्यांला जगाच्या बरोबर आहे हे सिद्घ करावे लागेल, असे मत प्रसिद्घ विचारवंत व संगमनेरच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी सोमवारी पारनेर येथे बोलताना व्यक्त केले.
केंद्र सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग व पारनेरच्या न्यू आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या इन्स्पायर कार्यशाळेचा समारोप डॉ. मालपाणी यांच्या व्याख्यानाने झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे, खजिनदार विश्वासराव आठरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत चेडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य सुधाकर शिंदे, समन्वयक डॉ. सुधीर वाघ यावेळी उपस्थित होते.
कोणतेही संशोधन हे प्रगतीच्या दृष्टीने असावे विध्वंसक नाही असे स्पष्ट करून डॉ. मालपाणी पुढे म्हणाले ५०० वर्षांत झाले नाहीत तेवढे बदल गेल्या पन्नास वर्षांत झाले असून मिळालेल्या पर्यायांपैकी आवश्यक पर्यायांची निवड करून ते कार्यप्रणव करण्याची ताकद निर्माण झाली पाहिजे. सतत नवे संशोधन होत आहे त्यासाठी कायम वाचनाची आवड निर्माण करून नव्या संशोधनाचा शोध घेतला पाहिजे. संपूर्ण व्यवस्था बदलता आली नाही तरी स्वत:साठी तरी व्यवस्था बदलण्याची धमक अंगी असली पाहिजे. इतरांवर अवलंबून न राहता स्वत:चा विचार स्वत:च करता आला पाहिज़े
कारण तुमची स्पर्धा तुमच्याशीच असून आज जे आहोत त्याच्याही पुढे जाण्याचा ध्यास ठेवावा लागेल, जिंकायचे असेल तर सातत्याने पुढे जावेच लागेल, थांबला तो संपला, असे म्हणण्याचे दिवस आता गेले असून पळाला तोच टीकला असेच आता म्हणावे लागेल, असेही ते म्हणाले.