अनेक दिवसांपासून सुरु असणारी पावसाची संततधार गुरूवारपासून वादळी वा-यांच्या साथीने कोसळत असलेल्या धुवाधार आषाढ सरी, तुडुंब भरलेली भात खाचरे, दुथडी भरुन वाहणारे ओढे नाले, जलमय झालेला परिसर, वातावरणातील बोचरा गारवा यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुळा-भंडारदरा पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पर्जन्यवृष्टी सुरु असून रतनवाडी येथे २४ तासात १६० मि.मी पाऊस पडला. मुळा नदीच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली असून तालुक्याच्या उत्तर भागातील आढळा धरणातही नव्याने पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. बदगी बेलापूर ९४.५० दलघफू, सांगवी ७२ दलघफू, घोटी शिळवंडी १४६ दलघफू हे लघु पाटबंधारे तलाव आज भरुन वाहू लागले. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ७१ टक्के झाला आहे.
काल दुपारपासून कळसुबाई, रतनगड, हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगात मुसळधार पाऊस सुरु आहे. आज दिवसभर या परिसरात अंतराअंतराने जोरदार आषाढ सरी कोसळत होत्या. भंडारदरा धरणात दिवसभराच्या बारा तासात ४१७ दलघफू नवीन पाणी आले. सायंकाळी भंडारद-याचा पाणीसाठा ७ हजार ८५८ दलघफू झाला होता. निळवंडे धरणातही दिवसभरात साडेतीनशे दलघफू पाण्याची भर पडली. निळवंडेचा पाणीसाठा १ हजार ९०६ दलघफू झाला आहे. तालुक्यातील बोरी तलावाचा अपवाद वगळता अन्य सर्व लघुपाटबंधारे तलाव भरुन आता वाह लागले आहेत.
पाणलोट क्षेत्रात पडत असणा-या पावसामुळे पश्चिम भागातील भात खाचरे, ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत. आकाशातून सातत्याने बरसणा-या आषाढ सरी, जलमय झालेला परिसर, ओढय़ानाल्यांना आलेले पाणी, सकाळ-संध्याकाळ धुक्यात हरवणारी पर्वतशिखरे, तापमानात झालेली कमालीची घट, पावसाच्या बरोबरच कालपासून वाहत असणारे जोरदार वारे यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.