वीरशैव को-ऑप. बँकेच्या लवकरच मुंबई, पुणे, सातारा, कराड या शहरांत शाखा सुरू करण्याचा प्रस्ताव रिझव्‍‌र्ह बँकेकडे पाठविला असून लवकरच त्यास मंजुरी मिळेल, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील-बुदिहाळकर यांनी येथे केले.
वीरशैव को-ऑप. बँकेच्या वतीने आयोजित ग्राहक मेळाव्यात बुदिहाळकर बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वीरशैव समाजाचे सचिव राजू वाली हे होते. बुदिहाळकर म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात कार्यविस्तार करण्यास रिझव्‍‌र्ह बँकेने परवानगी
दिल्यामुळे शेजारील कर्नाटक राज्यातही बँकेचा विस्तार करण्यासाठी बहुराज्य कायद्यांतर्गत केंद्र शासनाकडे परवानगी घेऊन त्या राज्यातही निपाणी, बेळगाव, हुबळी येथे शाखाविस्तार केला जाईल. ग्राहकांना एटीएम, ई-लॉबी, आरटीजीएस, एनईटी आदी सुविधा दिल्या असून मोबाईल बँकिंग सेवाही देण्यात येईल.
बँकेचे ग्राहक शेखर रणदिवे यांच्या हस्ते अध्यक्ष पाटील यांचा, तर उपाध्यक्ष चंद्रकांत स्वामी यांचा उद्योजक दिलीप हंजगे यांच्या हस्ते सत्कार झाला. या वेळी अनंत सांगावकर, झाकीर पठाण, नितीन मेहता, सुकुमार संकपाळ आदी ग्राहकांनी मनोगत व्यक्त केली. शाखाधिकारी किरण तेरणीकर यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. वरिष्ठ अधिकारी सुनील खोत यांनी आभार मानले.