कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) संस्थेच्या वतीने येथे ८ ते १० मार्च या कालावधीत फळे, भाजीपाला व धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांच्या दारात ही संकल्पना राबविली जाणार आहे.
उंटवाडीजवळ सिटी सेंटर मॉलसमोरील मैदानात हा महोत्सव होणार आहे. यापूर्वी सलग तीन वर्षे नाशिक येथे धान्य महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून, प्रत्येक वेळी सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांचा शेतमाल विक्री करण्यात आला होता.
आत्मा संस्थेमार्फत गठित करण्यात आलेल्या शेतकरी गटांचा देखील सहभाग लाभणार आहे. या महोत्सवात गहू, बाजरी, नागली, ज्वारी, हरभरा, मूग, उडीद, कुळीद व इतर कडधान्य, सर्व प्रकारची फळे आणि भाजीपाला तसेच शेतकऱ्यांनी स्वत: प्रक्रिया केलेला शेतमाल विक्रीसाठी आणला जाणार आहे. शेतकरी व ग्राहक यामधील दलालांची साखळी कमी करून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फायद्यात वाढ करणे आणि ग्राहकांनादेखील योग्य दरात शेतमाल मिळून देणे, असा दुहेरी उद्देश या धान्य महोत्सवाच्या आयोजनातून साधला जाणार आहे.