तालुक्यातील एकेक प्रकल्प कोरडेठाक पडू लागल्याने तहानेने प्राण कंठाशी आलेल्या धुळेकरांची तहान भागविण्यासाठी अखेर साक्रीतील सर्वपक्षीयांचा विरोध असतानाही पांझरा, जामखेली आणि मालनगाव या प्रकल्पांमधील पाणी सोडण्यात आले आहे. या तिघा धरणांमध्ये धुळ्यासाठी एक हजार ६० दशलक्ष घनफुट पाणी आरक्षित आहे. दरम्यान पाणी सोडण्याच्या या निर्णयाविरोधात साक्री तालुका सर्वपक्षीय पाणी बचाव समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
धुळे शहराला नकाणे, रानमळा हे तलाव तसेच तापी योजना यांव्दारे पाणी पुरवठा होत असतो. यंदा डिसेंबरमध्येच नकाणे तलाव कोरडा पडल्याने आणि रानमळा तलावातही अल्प साठा असल्याने धुळ्याची तहान पुरविण्याचा भार एकटय़ा तापी पाणी पुरवठा योजनेवर आला. सध्या शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. धुळ्यासाठी साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरणात ६००, जामखेली ३००, मालनगाव १६० या प्रमाणे एकूण १०६० दशलक्ष घनफुट पाण्याचे आरक्षण आहे. त्यामुळे टंचाईत धुळ्याला साक्री तालुक्यातील या आरक्षित पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. त्यानुसार काही दिवसांपूर्वी धुळेकरांनी पाण्याची मागणी केली असता त्या विरोधात साक्री तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी एकवटले. यंदा साक्री तालुक्यातही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने आणि टंचाईत या तीन प्रकल्पातील पाण्यावरच तालुक्याला अवलंबून राहावे लागत असल्याने धुळ्याला पाणी न देण्याचा निर्णय घेत साक्री तालुका सर्वपक्षीय पाणी बचाव समिती स्थापन करण्यात आली. ‘धुळेकरांसाठी प्रसंगी रक्त देऊ, पण पाणी देणार नाही’ अशी आक्रमक भूमिका या समितीने घेतल्याने साक्री विरूध्द धुळे असा पाणी संघर्ष निर्माण होतो की काय असे वाटू लागले. परंतु समितीच्या विरोधानंतरही धुळ्यासाठी या तिघा धरणांमधून पाणी सोडण्यात आले. केवळ मानवतावादी दृष्टिकोनातून साक्रीकरांनी पाणी सोडू दिले असे काहींचे म्हणणे आहे. तर, समितीचे निमंत्रक सुभाष काकुस्ते यांनी पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. समितीला अंधारात ठेवून पाणी सोडण्यात आल्याचा आरोपही काकुस्ते यांनी केला आहे. २१ फेब्रुवारी रोजी या याचिकेची सुनावणी होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. नगरसेवक अनिल मुंदडा यांनी जलसाठे हे फक्त पिण्यासाठी आरक्षित असतील या शासनाच्या मुद्यावर औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. दोन्ही तालुक्यांमधील पाणी प्रश्न आता न्यायालयात दाखल झाला आहे.