ऊस, जमीन, पाणी, खते सारखीच असताना खासगी व सहकारी साखर कारखान्यांना साखर उताऱ्यात दोन ते तीन टक्क्यांची तफावत कशी? सहकारी साखर कारखाने उतारा चोरत असल्याने त्यांची मशिनरी तपासा, अशी मागणी रघुनाथदादा पाटीलप्रणीत शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीने केली. या मागणीचे निवेदन प्रादेशिक साखर सहसंचालक वाय. व्ही. सुर्वे यांना देण्यात आले.     
शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे म्हणाले, कोल्हापूर व सांगली जिल्हय़ातील गतवर्षी गाळप हंगाम केलेल्या ३६ कारखान्यांपैकी दालमिया शुगर्स या खासगी कारखान्याचा साखरउतारा १३.६० टक्के आहे. त्याच पट्टय़ातील ऊस गाळणाऱ्या इतर सहकारी साखर कारखान्यांचा साखरउतारा मात्र ११ ते १२ टक्केच्या दरम्यान आहे. एकीकडे खासगी साखर कारखाने १३ ते १४ टक्के उतारा दाखवत असताना सहकारी साखर कारखाने मात्र ११ ते १२च्या आतच उतारा दाखवत आहेत. ते साखरउतारा चोरत असून यामुळे प्रतिटन ६०० ते ७५० रुपयांचे नुकसान होत आहे.    
खरी रिकव्हरी समोर आली तर शेतकऱ्यांना प्रतिटन आणखी ६०० ते ७५० रुपये जास्त मिळू शकतात. सहकारी साखर कारखाने सहकाराच्या नावाखाली शेतकऱ्यांना लुटून आपला उद्धार करण्यात मग्न आहेत. शेतकऱ्यांच्या भांडवलातून उभ्या राहिलेल्या सहकारी साखर कारखान्यांमध्ये उताऱ्याच्या माध्यमातून खुलेआम लूट सुरू आहे. सहकारी साखर कारखान्यांवर छापे टाकून उतारा तपासणारी मशिन लावावीत आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही अॅड. शिंदे यांनी करून अशा कारखान्यांवर फौजदारी दाखल करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.