‘‘आज वाचकांपेक्षा ‘विचारवंत’ अधिक झाले आहेत. अधिकाधिक पुस्तके लिहिणे, भाषणे करणे, पीएच.डी पदवी मिळवणे हीच विचारवंत होण्यासाठीची कसोटी समजली जाऊ लागली आहे. या अर्थाने महात्मा ज्योतीराव फुले विचारवंत नव्हते. ते विचारवंतांचे विचारवंत होते,’’ असे प्रतिपादन खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे दिला जाणारा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ डॉ. मुणगेकर यांना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख, फुले पगडी आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ. मुणगेकर म्हणाले, ‘‘विचारवंत खऱ्या अर्थाने बुद्धिमान हवा. त्याच्याकडे दूरदृष्टी हवी. आजचे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे भीषण वास्तव, पाण्याच्या वाटपाची समस्या फुले यांनी त्या काळी प्रभावीपणे मांडली. बाबासाहेब आंबेडकर यांनी जसे बुद्ध आणि संत कबीर यांना आपले गुरू मानले, तसेच त्यांनी फुले यांनाही आपले गुरू मानले. या अर्थी फुले विचारवंतांचे विचारवंत होते.आज जातीव्यवस्था कमकुवत होण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने वाढत चालली आहे. प्रबळ जातींच्या हातात राजकीय ,आर्थिक व सामाजिक सत्तेचे केंद्रीकरण झाले आहे. फुले दांपत्य, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या वैचारिक परंपरेपासून महाराष्ट्र जितका दूर जाईल तितके आपले वैचारिक अध:पतन होईल.’’  ‘फुले दांपत्याच्या जीवनावरील माहिती देणारा ‘लाईट अ‍ॅन्ड साऊंड शो’ फुले वाडय़ात उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांतर्फे प्रस्ताव पाठवल्यास आपल्या खासदार निधीतून त्यासाठी २५ लाख रुपये देईन’, असेही डॉ. मुणगेकर यांनी सांगितले.