‘स्वदेस’ चित्रपटाची गोष्ट आजच्या काळात प्रत्यक्षात घडू शकेल का?… हो, अनुकृती शर्मा या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या जीवनात ती खरोखरची घडली आहे. त्यांची वाटचाल जाणून घेताना नुकताच त्यांनी ‘ट्विटर’वर ‘शेअर’ केलेला एक प्रसंग जाणून घेऊ या…
उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरातल्या गावातलं एक छोटंस घर. घरात सर्वत्र अठराविश्व दारिद्र्याच्या खुणा. त्या घरात राहणाऱ्या ७० वर्षीय नूरजहाँ अम्माला एक तरुण महिला पोलीस अधिकारी दिव्याचं बटण कसं लावायचं, पंखा कसा सुरू करायचं हे प्रेमानं समाजवून सांगतेय. हे सांगत असतानाच तिनं स्विच बोर्डवरचं बटण दाबलं आणि घरात लख्ख प्रकाश पडला. त्या प्रकाशात अम्मीच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर फुललेलं हास्य…
त्या आनंदाच्या भरात अम्मीनं त्या तरुण महिला अधिकाऱ्याला मारलेली प्रेमळ मिठी आणि अम्माच्या डोळ्यांतले आनंदाश्रू… या प्रसंगानं त्या दोघींचे चेहरे तर फुलले होतेच, पण आजूबाजूच्या लोकांच्या चेहऱ्यावरही या प्रसंगानं वेगळंच समाधान होतं. नूरजहाँ अम्मीच्या आनंदाला तर पारावारच नव्हता, कारण ईदच्या चाँदच्या आधीच त्यांचं घर प्रकाशानं उजळलं होतं. हा व्हिडिओ नुकताच नेटवर प्रसिद्ध झाला आणि पाहणाऱ्यांच्या कौतुकास पात्र ठरला.
आणखी वाचा-पुरूषांनी घर आणि ऑफिसचा ताळमेळ बसवून दाखवावाच!
या सत्तर वर्षीय अम्माच्या चेहऱ्यावर प्रकाशाचा आनंद फुलवणाऱ्या महिला पोलीस अधिकारी अनुकृती शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या प्रसंगाची माहिती दिली. वरवर हा प्रसंग खूप हळवा वाटणारा, पण सरकारी सेवेत असताना एखादा अधिकारी सामान्य माणसाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण कसे फुलवू शकतो आणि अंगावर चढवलेली वर्दी ही त्याचसाठी असते आणि हेच आपलं प्राथमिक कर्तव्य असतं, याची साक्ष पटवून देणारा. या प्रसंगाचा उल्लेख करताना अनुकृती शर्मांनी हा माझ्या आयुष्यातला ‘स्वदेश क्षण’ असल्याचं सांगितलं. त्यामागची गोष्ट रंजकच.
वृद्धेच्या घरात वीज आणण्याच्या समाधानाच्या क्षणाला ‘स्वदेश क्षण’ म्हणण्याचं कारण असं, की अनुकृती अमेरिकेत ‘पीएच.डी.’चा अभ्यास करत होत्या. एक दिवस त्या ‘स्वदेस’ हा चित्रपट पाहायला गेल्या. हा चित्रपट त्यांनी पाहिला खरा, पण यातला ‘स्वदेशा’चा संदेश काही त्यांचा पिच्छा सोडत नव्हता. आपणही आपल्या देशासाठी काहीतरी करायला हवं या विचाराने त्या पुरत्या पछाडल्या. त्यांनी आपला पीएचडीचा अभ्यास मधेच सोडून सरकारी सेवेच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचा निश्चय केला आणि त्या तडक भारतात निघून आल्या. इथे युपीएसचीची परीक्षा देऊन आयपीएस झाल्या. पुढे उत्तर प्रदेश केडरमधून बुलंदशहरात सहाय्यक पोलीस अधिक्षक म्हणून रूजू झाल्या. सरकारी सेवेत असताना आपण इथल्या सामान्य माणसांसाठी, पर्यायानं देशासाठी खूप काही करू शकतो, अशी त्यांची दृढ भावना आहे.
आणखी वाचा-अधिकारी झाल्यावर तिने नवऱ्याला सोडणं बरोबर की चुकीचं?
पोलीस चोवीस तास लोकांच्या सेवेत असतात, परंतु लोकांच्या मनात त्यांच्याविषयी थोडी नकारात्मक भावना असते आणि भीतीही! पण अशा छोट्या प्रयत्नांतून लोकांच्या मनात पोलिसांविषयी सकारात्मक प्रतिमा करू निर्माण करता येईल, असं त्यांना वाटतं. सामान्य माणूस म्हणून जगताना त्यांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागलं, त्या समस्यांचं निराकरण सरकारी सेवेच्या माध्यमातून करता येईल, हा त्यांचा विश्वास.
बुलंदशहरात सहाय्यक पोलीस अधिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली, तेव्हा त्यांनी सुरुवातीला महिला, वृद्ध आणि मुलं, जे एरवी पोलिसांपासून चार हात लांबच असतात- यांना आश्वस्त करायचं ठरवलं. त्यासाठी ‘पोलीस माझे मित्र’ या मोहिमेअंतर्गत त्यांच्यापर्यंत त्या पोहोचल्या. ‘महिला सशक्तीकरण अभियाना’तील ‘ग्राम चौपाल’अंतर्गत इथल्या स्थानिकांसोबत छोट्या मीटिंगा घेतल्या. त्यांचे प्रश्न जाणून घेतले. अशाच एका सभेत नूरजहाँ अम्मा उभ्या राहिल्या. ‘माझ्या जीवनात एकच समस्या आहे की, माझ्या घरात वीज नाही.’ असं त्या बोलून गेल्या. तेव्हा नूरजहाँ अम्माच्या मनातही नसेल, की आपली ही समस्या खरंच कोणी सोडवू शकेल. पण अनुकृती शर्मा यांनी या समस्येचा पाठपुरवा करत अम्मांना वीज उपलब्ध करून दिली. वीज उपलब्ध करून देणं हे काही पोलिसांचं काम नाही अशी भूमिका न घेता त्यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला आणि गावातील सरपंच, वीज कर्मचारी यांच्या सहकार्यानं अम्मांना वीज उपलब्ध करून दिली. हे केवळ त्यांचं एकटीचं श्रेय नाही, तर संबंधित सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं हे आपण करू शकलो हे त्या खुल्या दिलानं सांगतात.
आणखी वाचा-महिलेनं उभारलं शैक्षणिक स्टार्टअप, ५०० शहरांतून देतेय १२ लाख विद्यार्थ्यांना परवडणारं शिक्षण
या एका प्रसंगानं अम्माच नाही, तर पोलिसांच्या मनातही आपण सामान्य जनतेचे सेवक आहोत आणि ती भूमिका आपण उत्तमरित्या पार पाडू शकतो असा विश्वास निर्माण होण्यास मदत होईल असं त्यांचं म्हणणं. अनेकदा पोलिसांना असं वाटतं, की आपण चेहऱ्यावर कडक भाव ठेवले, थोडा वागण्यातही कडकपणा आणला की आपण पोलीस म्हणून शोभून दिसतो. पण असं होऊ नये असं अनुकृती शर्मा यांना प्रामाणिकपणे वाटतं. पोलीस हाही एका संवदेनशील माणूस आहे आणि त्यांनं त्याच भावनेने जनतेचे प्रश्न सोेडवावेत असं त्या म्हणतात.
या छोट्याशा प्रसंगामुळे या गावात पोलीस आणि सामान्य लोक यांच्यात परस्पर सहकार्याचं नातं निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो आहोत असं त्या म्हणतात. आणि हेच चित्र सर्वत्र देशभर निर्माण व्हावं असा त्यांचा मानस आहे.
lokwomen.online@gmail.com