चारुशीला कुलकर्णी

“एवढी गाडी काढून देतोस का? मला उशीर होतोय कामावर जायला…” मी शक्य तितक्या सौम्य शब्दात अखिलेशशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. घरासमोर शेजाऱ्यांनी एकापुढे एक लावून ठेवलेल्या दुचाकींमधून मला माझी गाडी सहज काढता येणार नाहीये, हे सरळच दिसत होतं. त्यात पूर्वीची कुठेही शिताफीनं पार्किंग करण्याची सवय आता सुटलेली. अखिलेशचा चेहरा मात्र वैतागलेला. चिडक्या स्वरात तो म्हणाला, “एक गोष्ट धड जागेवर ठेवता येत नाही तुला… तूच काढ तुझी गाडी. मला उशीर होतोय. तसंही तुला कुठे काही काम असतं?” अखिलेशच्या त्या प्रश्नानं खाड्कन कुणीतरी थोबाडीत मारल्याचा मला भास झाला.

Blowing Nose Can Harm Ears And Throat How To Clear Congestion
नाक शिंकरल्याने ‘असा’ वाढू शकतो त्रास! बंद नाक मोकळे करण्यासाठी योग्य उपाय कोणते? तज्ज्ञांनी सांगितलं उत्तर
Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
What Mahesh Manjrekar Said About Veer Savarkar Film
Exclusive : ‘वीर सावरकर’ चित्रपट का सोडला? अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “रणदीप हुड्डाने…”
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर

आता ‘तुला कुठे काही काम असतं?’ या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी साचेबध्द मालिकेतलं स्त्री-पात्र नाही डोळ्यांसमोर आणणार. ‘आई कुठे काय करते’ची टेपही नाही वाजवणार. मी काम करते माझ्या आवडीचं. एका संस्थेसाठी ‘कंटेंट क्रिएशन’चं. त्याच्यासाठी मला कधी फिरावं लागतं, कधी राजकीय बैठका, परिषदा, संमेलनं अशा ठिकाणी उपस्थित राहावं लागतं. कुठलाही विषय वर्ज्य नाही. हे सारं एका जिद्दीनं सुरू असताना ‘करोना’नं धडक दिली. करोनाचा विळखा पडला, तसं ऑफिसमधून आम्हालाही ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय दिला गेला. गल्लत झाली कुठे, तर ‘वर्क फॉर्म होम’ सुरू करताना ‘वर्क फॉर होम’च कधी सुरू झालं ते कळलं नाही.

आधी घड्याळ्याच्या एका विशिष्ट ठोक्याला बाहेर पडणारी मी. त्या वेळेपूर्वी नेटानं घरातली कामं उरकायचे. राहिली करायची, तर कधी नाईलाजानं सोडून द्यायचे, नजरेआड करायचे. कारण मला माझं ऑफिससुद्धा तेवढंच महत्त्वाचं, आवडीचं होतं. करोनापासून मात्र मी ‘होम वर्क’मध्ये अर्थात घरातल्या कामांमध्ये अडकले. कामाच्या वेळेत अपेक्षित काम पूर्ण करून देणं गरजेचं होतं. पण घरातल्या कामांमुळे मी कधी नियोजित वेळेपेक्षा उशीरानं कामांना सुरूवात करू लागले. ऑनलाईन बैठक असली, तर व्यवस्थित आवरून लॅपटॉपसमोर बसावं लागे. मग घरातली कामं रेंगाळलीच म्हणून समजा. कधी घरातल्या कामांच्या गडबडीत ऑफिसच्या कामाकडे दुर्लक्ष होत राहिलं. पण तरीही माझी आवड जपायला मिळतेय, मी जे शिकलेय त्याचा उपयोग करायला मिळतो आणि अर्थार्जन, या तीन हेतूंसाठी घर आणि ऑफिस याची घडी बसवत होते. बाईनं आई व्हावं, स्वयंपाकीण व्हावं, सेवेकरी व्हावं, पण इतरांसारखं ‘माणूस’ होऊ नये, अशीच बहुदा घरातल्या मंडळींची इच्छा असते, हे या दोन वर्षांत मला पूर्णत: कळून चुकलं. ‘आई-बायको-सून घरी आहे, म्हणजे तिनं ठरलेलं काम केलंच पाहिजे. तिला तसंही काय काम आहे?…’ अशा प्रकारे माझ्या कामाचं वेळापत्रक बिघडत असताना घरच्यांनी मला गृहीत धरायला सुरूवात केली. माझ्या ऑफिसच्या कामाचे सगळे फायदे हवेत, पण मी घराबाहेर पडायला नको, ही घरच्यांची मानसिकता तयार झाली असतानाच आता मला ऑफिसमध्ये पुन्हा रुजू होण्यास सांगितलं आहे. ‘वर्क फ्रॉम होम’चं आता पूर्वीसारखं ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ होणार आहे.

अचानक पुन्हा कामावर रूजू होण्याचा आदेश आल्यापासून माझ्या मनात मात्र एक नवी अडथळ्यांची शर्यत उभी राहिली आहे. मुलांच्या शाळा, घरातल्या वृध्दांचं रुटीन, घरातली इतर कामं, यात इतके दिवस मदतनीसांची मदत घेतली नव्हती. मदतनीस न ठेवायला कारण काय?… ‘तशीही तू घरातच आहेस! कर जरा घरातली कामं. तेवढाच तुलाही व्यायाम होईल,’ ही घरातून सक्ती. मी घरी राहून इतके दिवस ऑफिसचं काम करतेय याचा कुणाला विचारच नाही. असा राग आला होता मला म्हणून सांगू?… पण घरातल्यांच्या मनाविरुद्ध कामाला बाई ठेवणं म्हणजे त्यांची नाराजी ओढवून घेणं. त्यातून वादाला निमंत्रण नको आणि आपल्याच कुटुंबाचं करायचं आहे, असं म्हणून मी तेव्हा गप्प बसले.

आता कामाला बायका-मदतनीस ठेवायच्या, तर त्यांच्या तालाशी जुळवून घेणं आलं. माझी ऑफिसची वेळ सांभाळून त्यांनी कामाला यायला हवं. घरातली कामं नीट होत आहेत का, स्वयंपाकाची तयारी, वृद्धांचं खाणंपिणं, त्यांची औषधं, मुलांचं रुटीन, त्यांचा अभ्यास यात मला लक्ष घालणं आलंच. आपल्याकडे तसंही ही कामं पुरूष कधी करतात?… ही तारेवरची कसरत सांभाळताना तोंडाला फेस येईल, असं आतापासूनच वाटू लागलंय. ऑफिसच्या कामात ताण वाढलाय, जबाबदाऱ्याही वाढल्या आहेत. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मधले इतके दिवस मी अतिशय मेहनतीनं घरातल्या आणि ऑफिसच्या कामांचा ताळमेळ बसवला आहे, तो पुरता विस्कटणार आहे.

तुमच्यापैकी काही- विशेषत: अनेक पुरूष म्हणतील,“तुम्ही बायका ‘वर्क फ्रॉम होम’ दिलं तरी रडता आणि ‘वर्क प्रॉम ऑफिस’ सुरू झालं तरी रडता!” पण मला सांगा, घर आणि ऑफिसच्या कामांची घडी एकत्र बसवण्याचा आणि त्याबरोबर मुलांचीही संपूर्ण जबाबदारी सांभाळण्याचा पेच किती पुरूषांसमोर असतो?… ऑफिसमधून मीसुद्धा साधारण अखिलेशच्या वेळेलाच घरी येते. अखिलेश घरी येऊन फ्रेश होतोय तोच सासूबाई त्याच्या हातात गरम चहाचा कप ठेवतात. पण मी घरी येते, ती रात्रीच्या जेवणात कुठली भाजी करायची आणि ती निवडण्यापासून सुरूवात करावी लागेल का, हे विचार करत! घरातल्यांनी आम्हा स्त्रियांना थोडं सहकार्य दिलं तर कामांची घडी बसेल असं वाटतं. पण हे कुणा कुणाला आणि कसं पटवून देणार?…

अखिलेशी वाद घालण्यात काही अर्थ नाही हे मला कळून चुकलं होतं. इतके दिवस मला घरात बघून मला काही काम नसतं, असा त्याचा झालेला समज मी पुसू शकत नाही. आता मी ऑफिसला रुजू होणार, म्हणजे घराकडे दुर्लक्ष करणार, असं त्याला वाटून त्याचा चाललेला त्रागाही मी थांबवू शकत नाही. कारण समजून घेऊ शकणाऱ्यांनाच समजावणं शक्य आहे.

‘वर्क फ्रॉम ऑफिस’ सुरू होताना कौटुंबिक जबाबदाऱ्यांची मनातल्या मनात उजळणी करत मी गाडी काढायला बाहेर पडले…

lokwomen.online@gmail.com