सगळ्यात आधी आपल्याला निवड करावी लागते ती बोन्सायसाठी उपयुक्त ठरेल अशा कुंडीची. त्यानंतर शोधायचं ते झाड. बाकीची साधनं आपण सहज मिळवू शकतो. आता कुंडी निवडताना आपली नेहमीची झाडं लावण्याची कुंडी घेऊन चालणार नसतं, नंतर उथळ आकाराची एखाद्या सटासारखी किंवा अंडाकृती कमी खोलीची अशी एखादी निवडावी लागते. या कुंडीला पाणी जाण्यासाठी मोठी भोके असणं गरजेचं असतं. एकतर रोपांच्या वाढीसाठी ही छिद्र आवश्यक असतात आणि सोबत बोन्साय करताना आपण ज्या तारा वापरणार असतो त्या या छिद्रातून ओवून वरच्या बाजूला ओढून घेता येतात. याच तारांच्या सहाय्याने झाडाला विविध आकार देता येतात, शिवाय झाडाला आधारही मिळतो.
बोटॅनिकल गार्डनमध्ये किंवा मग एखाद्या फुलांच्या आणि झाडांच्या एकत्रित प्रदर्शनांमधे नेहमीच विविध बोन्साय पाहायला मिळतात. मोठ्या वृक्षांच्या त्या छोट्या प्रतिकृती फारच मोहक दिसतात.आपण अगदी बारकाईने आणि डोळे भरून त्या पाहून घेतो.आपल्याकडेही असा एखादा वामन वृक्ष असावा असं मनात येतं, पण हे जमावं कसं? यासंबंधी एखादा अभ्यास वर्ग करावा तर तेवढा वेळ आणि त्याला लागणारी भरमसाठ फी हे दोन्ही जमणं थोडंसं अवघड जातं. पण इच्छा तिथे मार्ग या न्यायाने थोडा शोध घेतला, थोडं निरीक्षण केलं आणि अर्थातच प्रयोग केले की सगळं जमत. मग ही कला घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या सामग्रीतूनही साध्य करता येते.कशी ते सविस्तर बघूया.
सगळ्यात आधी आपल्याला निवड करावी लागते ती बोन्सायसाठी उपयुक्त ठरेल अशा कुंडीची. त्यानंतर शोधायचं ते झाड. बाकीची साधनं आपण सहज मिळवू शकतो. आता कुंडी निवडताना आपली नेहमीची झाडं लावण्याची कुंडी घेऊन चालणार नसतं, नंतर उथळ आकाराची एखाद्या सटासारखी किंवा अंडाकृती कमी खोलीची अशी एखादी निवडावी लागते. या कुंडीला पाणी जाण्यासाठी मोठी भोके असणं गरजेचं असतं. एकतर रोपांच्या वाढीसाठी ही छिद्र आवश्यक असतात आणि सोबत बोन्साय करताना आपण ज्या तारा वापरणार असतो त्या या छिद्रातून ओवून वरच्या बाजूला ओढून घेता येतात. याच तारांच्या सहाय्याने झाडाला विविध आकार देता येतात, शिवाय झाडाला आधारही मिळतो.
आता दुसरा मुद्दा आहे तो रोप निवडीचा. बोन्सायसाठी उपयुक्त अशी रोपं नर्सरीमध्ये सहज मिळतात. काही तर मुद्दाम बोन्सायसाठी म्हणूनच तयार केलेली असतात. आपण अशी तयार रोपं आणून सोबत नर्सरीतूनच एखादं उत्तम बोन्साय पॉट आणून आपल्या प्रयोगाची सुरुवात करू शकतो. पण जर कोणाला हा प्रयोग अगदी कमी खर्चात आणि अधिक नैसर्गिक वाटेल असा करायचा असेल तर कुंभारवाड्यात किंवा मातीचे दिवे, पणत्या मिळणाऱ्या एखाद्या दुकानात मातीची उरळी मिळून जाते. आंतरजालावर जरी शोध घेतला तरीही अनेक पर्याय मिळू शकतात. या मातीच्या चरबीचा उपयोग आपण करू शकतो.
आता शोधायचं ते रोपं. पावसाळ्यात मोकळ्या जागेत मोठ्या वृक्षांच्या पायतळी- अगदी आपल्या कुंडीतसुद्धा अनेक वडा -पिंपळाची रोपं उगवलेली असतात. जुन्या भिंतींवर किंवा एखाद्या इमारतीवर पाईप लगतही अशी झाडं उगवलेली दिसतात. मुळातचं अतिशय चिवटपणे ती स्वतःला टिकवून असतात, त्यामुळे अशा झाडांचा आपल्या प्रयोगासाठी फायदाच होऊ शकतो. अनेक आकार ,प्रकारांचे प्रयोग आपण यांच्या सहाय्याने करू शकतो.जर असं काही निवडायचं नसेल, तर नर्सरी आणि प्रदर्शनांमधे एडिएनटमची रोपं मिळतात. साधारण कण्हेरीच्या आकाराचं आणि अगदी तसंच फूल असलेलं एडियंटम हे बोन्सायसाठी अगदी योग्य असं झाडं आहे. यात अनेक रंग ही मिळतात. एडिएंटमचं खोड हे अतिशय मजबूत आणि वळणदार आकार दिल्यावर त्याप्रमाणे सहज वळणारं असं असतं. याचं बोन्साय करताना फार मेहनत घ्यावी लागते नाही. माझ्याकडे दोन एडिएंटमची बोन्साय आहेत- ज्यांचं वय हे साधारण पंचवीस वर्ष इतकं आहे. अनेकदा त्याला आकार देऊन त्याच्यापासून बोन्सायचे वेगळे प्रकार करण्याचे प्रयोग मी नेहमीच केले आहेत.
याव्यतिरिक्त फायकस कुळातली म्हणजेच ज्यांना पारंब्या येतात अशा झाडांची रोपं ही आपण निवडू शकतो. वड आणि पिंपळ हे फायकस कुळात येतातच, पण फायकस लाँग आयलंड, रबर प्लांट असे पारंब्या येणारे हिरवीगार रूंद पाने असलेले आणि तुलनेने अधिक कणखर असे वृक्ष बोन्साय साठी उत्तम. यांची छोटी रोपं मिळवून आपण प्रयोगाला सुरुवात करू शकतो.
कुंडी आणि रोपांची निवड झाली की लागतात ती इतर साधनं. यात छोटी पकड, माती भरायला लागणारं छोटं हत्यार जे एखाद्या नर्सरी मधे सहज मिळतं, त्यातही लहान मुलांचा बीच सेट घरी असेल तर असं माती भरण्याचं छोटं फावडं त्यातून सहजी मिळतं, अगदीच काही नाही तर एखादा मध्यम आकाराचा लांब दांड्याच्या चमचाही चालतो. जोडीला हव्यात त्या तांब्याच्या तारा. विविध जाडीच्या आणि रंगांच्या मजबूत आणि टिकाऊ, फारसे कष्ट न घेता हव्या तशा वाकवता येणाऱ्या अशा तारा हार्डवेअरकडे मिळून जातात.
आता गरज पडेल ती मातीची. मातीसाठीसुद्धा खूप खर्च करत बसायला लागतं नाही. मोठेसे पण कुंडीत मावतील एवढे वेगवेगळ्या आकाराचे दगड, पालापाचोळ्याचं खत आणि एखाद्या वृक्षातळीची छोट्या दगड गोट्यांनी बनलेली माती आपल्या या प्रयोगासाठी उपयुक्त ठरते. साधारण एवढे घटक जमा झाले की प्राथमिक तयारी पूर्ण झाली. यानंतर प्रत्यक्ष प्रयोगाला सुरुवात करायला घ्यायची. पुढील लेखात आपण प्रत्यक्ष कृती कशी करायची. बोन्सायचे शास्त्रशुद्ध प्रकार कोणते आणि फळा, फुलांच्या आणि नुसत्या पानांनी बहरणाऱ्या वृक्षांसाठी लागणारी माती कशी करायची या सगळ्याची माहिती घेणार आहोत. mythreye.kjkelkar@gmail.com