शांता रंगास्वामी यांचा जन्म १ जानेवारी १९५४ चा, चेन्नईमधला. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटची आवड होती. मात्र त्यांची ही आवड म्हणजे त्या काळात एखाद्या मुलीने क्रिकेट खेळणे हे समाजाला पटणारे नव्हते. शांता यांनी समाजाच्या या समजाविरोधात जाण्याचे धाडस दाखवले. शाळा-महाविद्यालयीन काळात मैदानावर मुलांबरोबर क्रिकेट खेळत स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करून दाखवली. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे ‘बीसीसीआय’मध्ये महिलांना मानाचे स्थान मिळाले. त्यांनी भारतासाठी खेळलेल्या महिला क्रिकेटपटूंसाठी पेन्शनची योजना लागू केली, असं त्या आवर्जून सांगतात.

भारतीय महिला क्रिकेट संघाने काही दिवसांपूर्वीच प्रथमच एकदिवसीय सामन्यांचे विश्वविजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक यशामागे सध्याच्या संघाची मेहनत आहेच, पण यामागे खूप मोठ्या संघर्षाचा इतिहास आहे. या इतिहासातील एक सुवर्णाक्षरात कोरलेले नाव म्हणजे शांता रंगास्वामी. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विजयामागे अनेक महिला क्रिकेटपटूंचा संघर्ष दडला आहे. कारण त्यांच्यामुळेच आज या महिला क्रिकेट खेळू शकल्या. त्यातील सर्वांत अग्रणी आणि प्रभावी चेहरा म्हणजे शांता रंगास्वामी. ज्या धाडसाने शांता यांनी भारतीय महिला क्रिकेटची ज्योत पेटवली, त्यामुळेच आज भारताला विश्वचषक जिंकता आला. इतकंच नव्हे तर मुली क्रिकेट क्षेत्रात येऊ शकल्या.

शांता रंगास्वामी यांचा जन्म १ जानेवारी १९५४ चा, चेन्नईमधला. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटची आवड होती. मात्र त्यांची ही आवड म्हणजे त्या काळात एखाद्या मुलीने क्रिकेट खेळणे हे समाजाला पटणारे नव्हते. शांता यांनी समाजाच्या या समजाविरोधात जाण्याचे धाडस दाखवले. शाळा-महाविद्यालयीन काळात मैदानावर मुलांबरोबर क्रिकेट खेळत स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करून दाखवली. शांता यांनी क्रिकेटमध्ये जरी आपले वर्चस्व सिद्ध केले असले तरी त्यापूर्वी विद्यापीठासाठी त्या बॅडमिंटनही खेळल्या आहेत. कर्नाटक राज्याच्या सॉफ्टबॉल संघाचे कर्णधारपददेखील त्यांनी भूषवले.

भारतीय महिला संघाने ३१ ऑक्टोबर १९७६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. त्या संघाचे कर्णधारपद भूषविण्याचा मान शांता रंगास्वामी यांना मिळाला. शांता यांना मिळालेले कर्णधारपद हे फक्त त्यांचा सन्मान नव्हता, तर तो भारतातील क्रीडाक्षेत्रासाठी तो एक मैलाचा दगड ठरला. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तीनही विभागांत त्यांचा दबदबा होता. त्यांच्या नेतृत्वात भारताने अनेक कसोटी सामने खेळले आणि महिला क्रिकेटचा पाया मजबूत केला. महिला क्रिकेटमध्ये भारतासाठी पहिले शतक साकारण्याचा विक्रमही शांता यांच्याच नावावर आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शांता सांगगतात की, आज जरी महिला खेळाडूंना सुविधा मिळत असल्या तरी पूर्वीचे चित्र वेगळे होते. आम्हाला रेल्वेच्या अनारक्षित डब्यांमधून प्रवास करावा लागे.

वसतीगृहात जमिनीवर झोपावे लागे. क्रिकेटचे साहित्य, राहण्या-झोपण्याची सोय, हे सर्व स्वत:चे स्वत:लाच घेऊन जायला लागायचे. आज आपल्या महिला खेळाडूंना पुरुषांच्या बरोबरीने सुविधा मिळत आहे हे पाहून खूप आनंद होतो. त्यांची उत्कृष्ट कामगिरी, मेहनत याचे हे फळ आहे. तसेच ‘बीसीसीआय’, राज्यस्तरीय क्रिकेट संघटना आणि खेळाडूंच्या अथक परिश्रमाने महिला क्रिकेटला नवीन उंचीवर नेले आहे. आज भारताच्या महिला संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर देशातील लाखो मुली क्रिकेटपटू होण्याचे स्वप्ने पाहू लागल्या आहेत. महिला ‘आयपीएल’चेही यशस्वी आयोजन होऊन क्रिकेट रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या प्रत्येक पायरीत शांता रंगास्वामींसारख्या पूर्वीच्या अनेक महिला खेळाडूंच्या संघर्षाचे हे फलित आहे. खेळाडू म्हणून निवृत्तीनंतरही त्यांचा क्रिकेटमधील प्रवास थांबला नाही. पुढे त्यांनी ‘बीसीसीआय’ची महिला समिती, तसेच ‘आयसीसी’च्या महिला क्रिकेट समितीमध्येही महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

भारतातील महिला क्रिकेटच्या विकासासाठी त्यांनी धोरणात्मक, व्यवस्थापकीय पातळीवर जे जे शक्य असेल ते सर्व प्रयत्न करताना मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या कर्तृत्त्वाबद्दल १९७६ साली भारत सरकारतर्फे त्यांना अर्जुन पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. अजून एका मुलाखतीत शांता सांगतात, १९९८-९९ च्या आसपास आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट परिषद ‘आयसीसी’मध्ये विलीन झाली. पण आपल्या देशात ‘बीसीसीआय’ महिलांना सामील करून घेण्याबाबत फारसे उत्सुक नव्हते. मात्र शरद पवारांसारख्या दूरदर्शी व्यक्तींमुळे ‘बीसीसीआय’मध्ये महिलांनाही मानाचे स्थान मिळाले. महिला क्रिकेटसाठी त्यांनीदेखील खूप मोठे काम केले. त्यांनी भारतासाठी खेळलेल्या महिला क्रिकेटपटूंसाठी पेन्शनची योजना लागू केली.