कोकोडेमा हे जपानी टेक्निक आहे. जपान हा एक असा देश आहे जिथे झाडांची एखाद्या माणसाप्रमाणे काळजी घेतली जाते. सजीव या शब्दाचा खरा अर्थ जाणून त्याप्रमाणे तिथे वर्तन केले जाते. फॉल सीजनमध्ये एकदा जपानी बागांना भेट द्यायची संधी मिळाली होती, त्यावेळी एक मजेदार गोष्ट लक्षात आली, ती ही की तिथली झाडं या दिवसांत पूर्णपणे आच्छादलेली होती. येणाऱ्या थंडीपासून झाडांचं संरक्षण व्हावं हा त्या आच्छादन घालण्यातला हेतू होता. झाडांची जिथे इतकी बारकाईने काळजी घेतली जात असेल तिथे नवनवीन तंत्र विकसित होणं स्वाभाविकच नाही का?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरात बाग तयार करण्यासाठी प्रत्येकवेळी गच्ची हवी किंवा मोकळं अंगण हवं, किमान गॅलरी तरी हवी असा आपला सर्व साधारण समज असतो. कोकोडेमा पद्धतीने जर आपण हिरवाई जोपासली तर जागा हा प्रश्नच उरतच नाही. एखाद्या लहानशा खोलीत राहणाऱ्या कोणाला जर झाडांची आवड असेल किंवा खोलीत निसर्गाचं सान्निध्य हवं असं वाटतं असेल तरी या पद्धतीच्या वापराने ते सहज पूर्ण होऊ शकेल.

बोन्साय, लँडस्केप, हायड्रोपोनिक्स यांसारखी अनेक टेक्निक्स आपण ऐकली असतील त्याद्वारे लावलेली झाडं, रोपं पाहिलीही असतील. कोकोडेमा हे असंच एक तंत्र आहे. फरक एवढाच की ते सोपं आहे आणि सहजसाध्य आहे. अगदी एखादं छोटं मूलही आपल्या इवल्या हातानं एखादं सुंदर कोकोडेमा तयार करू शकेल.

हे ही वाचा… अमृततुल्य आईच्या दुधाचे दान करणारी ॲलिसे

मुळात हे जपानी टेक्निक आहे. जपान हा एक असा देश आहे जिथे झाडांची एखाद्या माणसाप्रमाणे काळजी घेतली जाते. सजीव या शब्दाचा खरा अर्थ जाणून त्याप्रमाणे तिथे वर्तन केले जाते. फॉल सीजनमध्ये एकदा जपानी बागांना भेट द्यायची संधी मिळाली होती, त्यावेळी एक मजेदार गोष्ट लक्षात आली, ती ही की तिथली झाडं या दिवसांत पूर्णपणे आच्छादलेली होती. येणाऱ्या थंडीपासून झाडांचं संरक्षण व्हावं हा त्या आच्छादन घालण्यातला हेतू होता. झाडांची जिथे इतकी बारकाईने काळजी घेतली जात असेल तिथे नवनवीन तंत्र विकसित होणं स्वाभाविकच नाही का?

तर कोकोडेमाचा उगम जपान मधील आहे कोको म्हणजे शेवाळे व डेमा म्हणजे चेंडू . थोडक्यात झाडावरील शेवाळाच्या मदतीने तयार केलेला चेंडू. कोकोडेमा पद्धतीने झाडं लावताना आपल्याला नावाप्रमाणेच एक गोळा तयार करून घेऊन त्यात झाड लावायचं असतं.

यासाठी लागणारं साहित्यसुद्धा अगदी सहज उपलब्ध होईल असं असतं. यासाठी कोकोपीट हवं आणि पावसाळ्यात ओलसर भिंतीवर दाट पसरलेले शेवाळ असतं ते गोळा करून वापरायचं. कोकोडेमामधील हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. याशिवाय नारळाच्या काथ्या किंवा गोणपाटाचे कापडसुद्धा वापरता येतं. सोबत कोकोडेमाच्या बांधणीसाठी एखादी सुतळ किंवा एखादा जाड दोरा लागेल. एवढी सामग्री जमा केली की कोकोडेमा बनवायची मुख्य कृती करायला सुरुवात करायची.

सगळ्यात आधी कोकोपीट आणि साधी माती यांचं समप्रमाणात मिश्रण करून घ्यायचं. पुरेसं पाणी घालून ते भिजवून त्याचा एक मध्यम आकाराचा किंवा जेवढ्या आकाराचे झाड असेल आणि त्याची मुळं असतील तेवढा गोळा करून घ्यायचा. गोळा करून झाल्यावर त्यातील अधिकचे पाणी पिळून घेऊन हलक्या हाताने त्याचे दोन भाग करून घ्यायचे. यानंतर जे रोप आपण निवडलं असेल त्याची मुळं साफ करून, आवश्यकते प्रमाणे कापून घ्यायची. हे करत असताना मुख्य मुळांना धक्का लागता कामा नये.

हे ही वाचा… समुपदेशन : बाबांची भीती वाटतेय?

आता या मुळांना आपण तयार केलेल्या गोळ्यातील एका भागाने झाकत त्यावर दुसरा भागही दाबून त्याला गोलाकार आकार द्यायचा. आता हा चेंडू एकतर गोणपाटाच्या कापडाने गुंडाळून घ्यायचा किंवा मग त्यावर नारळाच्या काथ्यांचे अनावरण घालायचे. जर शेवाळं उपलब्ध असेल तर त्याने आच्छादून घ्यायचे. आता या तयार गोळ्याला सुतळीने किंवा मग एखाद्या जाडसर दोऱ्याने बांधून घ्यायचे. बांधताना एकसारखी पद्धत वापरायची आणि सौंदर्यदृष्टी जपत हे गुंडाळण्याचं काम पूर्ण करायचं.

आता हे तयार कोकोडेमा रोपं टांगायचं असेल तर त्याला टांगता येईल असा दोरा बांधायचा. अन्यथा एखाद्या बाऊलमध्ये किंवा आकर्षक बशीतही आपण ते ठेवू शकतो.

या तयार रोपाला पाणी देताना एका भांड्यात पाणी घेऊन त्यात हा आपला चेंडू बुडवून निथळत ठेवायचा. आपण कोकोडेमासाठी जे रोप निवडलं आहे त्याच्या जरूरीप्रमाणे त्याला उन मिळेल अशी जागा त्यांच्यासाठी निश्चित करायची. ही झाली रोपं तयार करण्याची प्राथमिक पद्धत. पुढील लेखात याबद्दल आपण अधिक माहिती घेऊ.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grow a garden at home with kokedema technique asj