“जया ताई, बरं झालं तुम्ही आलात. खरं तर मीच तुम्हाला फोन करून बोलावून घेणार होते.”
“काय झालं अश्विनी?”
“पुन्हा अजिंक्य आणि माझ्यात वाद झलेत, तो माझं ऐकतच नाही.”
“आता वादाचा नवा कोणता विषय आहे?”
“विषय जुनाच आहे, आम्ही दुसरा चान्स घेण्याबाबत. पिंटू आता सहा वर्षांचा झाला. तो खूप हट्टी झालाय, इतर मुलांशी खेळत नाही. त्याची खेळणी कोणीही घेतलेली त्याला आवडत नाहीत. मी शेजारच्यांच्या बाळाला कडेवर घेतलेलंही त्याला आवडत नाही. पिंटूला योग्य वळण लागावं यासाठी आम्ही दुसऱ्या मुलाचा विचार करावा, असं अजिंक्यचं म्हणणं आहे. परंतु त्याला शिस्त लागावी म्हणून दुसऱ्या मुलाची जबाबदारी वाढवणं मला पटत नाही. मला पुन्हा त्या चक्रात अडकायचंच नाहीये. मी कितीही अजिंक्यला पटवून देण्याचा प्रयत्न केला, तरी त्याला पटत नाही. दुसरं मुलं म्हणजे खर्च वाढणार, माझ्या करिअरमध्ये अडथळा येणार. मुलांना कुणी सांभाळायचं हाही प्रश्न आहेच. सासूबाई हेमाताईंकडे अमेरिकेत गेल्यानंतर पिंटूला सांभाळण्यासाठी किती अडचणी आल्या. आता पुन्हा नवीन बाळाचा विषय नकोच, असं मी त्याला सांगतेय. पण तो ऐकायला तयारच नाही. रोज त्याच गोष्टीवरून वाद चालू आहेत. तो माझ्यावर रागावलाय. दोन दिवसांपासून ऑफिसला डबाही घेऊन जात नाहीये.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – सोफिया फिरदोस : ओडिशामधील पहिली मुस्लिम स्त्री आमदार

“अश्विनी, दुसरं मुलं हवं की नको, हा पूर्णपणे तुमच्या दोघांचा निर्णय आहे. पण या विषयासाठी एकमेकांवर रागावणं, चिडचिड करणं योग्य नाही. त्यापेक्षा विषयाच्या दोन्ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे. दुसऱ्या मुलाची जबाबदारी वाटते तेवढी सोपी नाहीये, हे तुझं म्हणणं बरोबरच आहे. पण पिंटू आता एकटा आहे. त्याला घरात कुणीतरी भावंडं गरजेचं आहे, असं अजिंक्यला वाटणं त्याच्या जागी बरोबर असू शकतं. आता तुझंच उदाहरणं घे- तू आणि तुझा भाऊ एकमेकांशी सगळ्या गोष्टी शेअर करता. आईबाबांशी ज्या गोष्टी तू बोलत नाहीस, त्यासुद्धा दादाशी बोलतेस. कोणत्याही प्रसंगात तुला दादाचा आधार जास्त वाटतो. तोही सुखदुःखाच्या सर्व गोष्टी तुझ्याशी बोलत असतो. हक्काचं भावंडं असणं हीसुद्धा महत्त्वाची गरज असते. घरात भावंडांबरोबर खेळणं, एकमेकांबरोबर काही गोष्टी शेअर करणं, एकमेकांची काळजी घेणं, वाट पाहणं, या सर्व गोष्टी मुलं आपोआप शिकतात. भावनिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास यामुळे होतो, हे खरंय. बऱ्याच वेळा एकटी राहणारी मुलं हट्टी होतात. घरातल्या प्रत्येक वस्तूवर केवळ माझाच अधिकार आहे, असं त्यांना वाटतं राहतं. शेअरिंग करणं त्यांना जमत नाही, ती एकलकोंडी होतात. त्यांचा संवाद कमी होतो. खेळण्यासाठी मोबाईल, कॉम्प्युटर अशा स्क्रीनचा आधार घेतात, अशी उदाहरणं मी अनेक घरांत पाहिलेली आहेत. एकच मूल असलेले पालकही एकाच मुलावर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे त्यानं सगळं आपलं ऐकलंच पाहिजे, अशी अपेक्षा ठेवली जाते. त्या मुलाच्या लग्नानंतरही मुलांच्या आयुष्यातील पालकांचं लक्ष कमी होत नाही, अशी उदाहरणं सर्रास बघायला मिळतात… कदाचित अजिंक्यचा हाच मुद्दा असेल.”

जयाताई बोलत राहिल्या, ”आमच्या पिढीतल्या अनेकांना तर असं वाटतं, की आता सगळ्यांनीच एकच मूल हवं असा विचार केला, तर आत्या, मावशी, काका-काकू, मामा-मामी ही नाती हळूहळू कालबाह्य होतील. नातेसंबंधातील आपलेपणा, संस्कार हे या मुलांना कसं शिकता येईल? अर्थात हा आमच्या पिढीचा विचार झाला! तुमच्या पिढीत अनेक समीकरणं बदलली आहेत. आता मुलींचंही मुलांइतकंच चमकदार करिअर असतं, त्यांनाही त्यांच्या म्हणून अगोदरच अनेक जबाबदाऱ्या असतात. त्यात आयुष्य अतिशय धावपळीचं झालंय, खर्च अवाच्या सवा वाढलेत. त्यामुळे आताच्या काळात मुलींना एकाच मुलावर थांबावंसं वाटणं साहजिक वाटतं. त्यामुळे तूही तुझ्या जागी बरोबर आहेस असंच म्हणावं लागेल… खरं तर मुलामुलींनी लग्नाच्या आधीच या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करायला हवी असं मला वाटतं. पण अजूनही वेळ गेलेली नाही. तू आणि अजिंक्य अजूनही समोरासमोर बसून शांतपणे बोलू शकता. तू तुझे मुद्दे त्याला समजावून सांग, त्याचे मुद्दे ऐकून घे. नंतर दोघं न भांडता सामंजस्यानं काय तो निर्णय घ्या. अशी चिडचिड करून काही उपयोग नाही, हे तू त्याला समजावून सांग. ”

हेही वाचा – सासरच्या कुटुंबियांविरोधात विनाकारण गुन्हा नोंदवणे गैरच…

“जया ताई, तुम्ही म्हणताय त्यातल्या काही गोष्टी मला निश्चित पटतायत. लहानपणी आम्ही सर्व चुलत, आतेभावंडं आणि मामे मावसभावंडं सुट्टीत एकत्र जमायचो, खूप खेळ खेळायचो. मस्ती करायचो. पण आता मुलांना ही जवळची नातीच राहिलेली नाहीत याची मलाही खंत वाटते. मामाच्या गावाला जाण्याची मजा नसते म्हणून शिबिरांना पाठवावं लागतं. नात्यातली मजा मुलांना घेता यायला हवी, असं मलाही वाटतं. एकच मूलं हवं असं असलं तरी त्याला वाढवताना मूल एकलकोंडं व्हायला नको, त्याचा सामाजिक विकास व्हायला हवाय, हे मला कळतंय. पण दुसरं मुलं हवं असेल तर जबाबदारी विभागून घ्यायला हवी, असं मला वाटतं. आणि नव्या जबाबदारीचा स्वीकार आनंदानं, जाणीवपूर्वक करायला हवा. केवळ मुलांच्या आईवर सारी जबाबदारी टाकून देणं मला योग्य वाटत नाही. शिवाय खर्चाचं, मुलांच्या संगोपनाचं नीट नियोजन करायला हवं. मी या सगळ्याबद्दल अजिंक्यशी नक्की बोलीन. दोघं आपापले मुद्दे मांडू. निदान आमच्यातली भांडणं तरी नक्कीच थांबायला हवीत.” अश्विनीच्या मनातला गोंधळ थोडा कमी झालाय हे बघून जयाताईंनाही जरा बरं वाटलं.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smita joshi606@gmail.com)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How many children do we want how many couples think about these issues before marriage this discussion is need of the hour to do it now ssb