सौंदर्याच्या रूढ व्याख्येनुसार स्त्रीची नखं लांब, निमुळती, किंचित फुगीर आणि गोलाकार, सुबक असावीत असं समजलं जातं. आपल्यापैकी पुष्कळ जणांची नखं तशी नसतात हे काही नव्यानं सांगायला नको! परंतु मूळची नखं तशी नसली तरी त्यावर विविध कृत्रिम उपाय निघाले आहेत आणि ते सामान्यांच्या खिशाला परवडतदेखील आहेत. कदाचित त्यामुळेच हल्ली मूळ नखांवर कृत्रिम नखं (आर्टिफिशियल नेल्स) लावून ‘नेल आर्ट’ करण्याचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतं. मात्र कृत्रिम ॲक्रेलिक नखं आपल्या मूळच्या नखांवर वारंवार चिकटवणं आणि काढणं हे नखांसाठी चांगलं नाही. त्यामुळे नैसर्गिक नखं खराब होऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : श्माम बेनेगलांनी लीड रोल दिला नाही, तर कमर्शिअल चित्रपटवाले कसे देणार? – नीना गुप्ता

कृत्रिम नखं लावताना काय संभवतं?

  • ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ डरमॅटोलॉजी असोसिएशन’च्या (एएडी) निरीक्षणानुसार कृत्रिम ॲक्रेलिक नखं नैसर्गिक नखांवर चिकटावीत, यासाठी नैसर्गिक नखं घासून काहीशी खडबडीत करावी लागतात. तरच वरून लावलेली नखं चिकटतात. या प्रयत्नात मूळची नखं निष्कारण घासल्यानं पातळ आणि कमकुवत होऊ शकतात.
  • वरून नखं चिकटवण्यासाठी जो पदार्थ वापरला जातो, त्यामुळे नखांच्या आजूबाजूच्या किंवा इतर कुठे त्याचा हात लागल्यास तिथल्या त्वचेला ‘इरिटेशन’ होऊ शकतं.
  • कृत्रिम नखं काढतानाही एकतर ती घासून काढतात किंवा ॲसिटोनमध्ये बुडवून काढतात.
  • काही लोक बरेच दिवस कृत्रिम नखं लावलेली तशीच ठेवतात. अशा परिस्थितीत खालची नैसर्गिक नखं वाढतच असतात. मग नैसर्गिक नखांची झालेली वाढ आणि त्यावर लावलेलं कृत्रिम नख यातलं अंतर भरून काढायला नखांचं ‘टच अप’ केलं जातं. सारखं सारखं असं टच अप केल्यामुळे नैसर्गिक नखं खराब होऊ शकतात.

आणखी वाचा : लवकर म्हातारं न दिसण्यासाठी… या ९ टिप्स!

तरीही तुम्हाला कृत्रिम नखं आवडतच असतील वा तुम्ही ती वापरणारच असाल, तर नैसर्गिक नखं वाचवण्याच्या दृष्टीनं ‘एएडी’नं काही टिप्स प्रसिद्ध केल्या आहेत.
१) ॲक्रेलिक नखांपेक्षा जेल नखं बरी
कृत्रिम नखांमध्येही प्रकार आहेत. यात ॲक्रेलिक नखांपेक्षा जेल नखं त्यातल्या त्यात बरी मानली जातात, कारण ती अधिक लवचीक असतात. त्यातसुद्धा काढताना खरडून (नेल फायलिंग करून) काढून टाकाव्या लागणाऱ्या जेल नखांपेक्षा ‘सोक ऑफ’ प्रकारची नखं निवडा, असं ‘एएडी’ म्हणते.

२) कृत्रिम नखं ‘सेट’ करताना ‘एलईडी लाईट’ वापरलेला बरा
कृत्रिम जेल नखं बसवताना ती नीट ‘सेट’ होण्यासाठी, कडक होण्यासाठी (याला ‘क्युरिंग’ असा शब्द वापरला जातो.) एलईडी लाईट किंवा अल्ट्राव्हायोलेट लाईट वापरला जातो. यात एलईडी लाईट त्यातल्या त्यात बरा मानला जातो, कारण त्यात अतीनील किरणांचं प्रमाण कमी असतं आणि काम तुलनेनं लवकर पूर्ण होतं. याबाबत तुम्ही तुमच्या नेल सलूनमध्ये विचारून घेऊ शकता.
३) नखांचं ‘क्युटिकल’ खरडू नका
‘मॅनिक्युअर’मध्ये नखांचं ‘क्युटिकल’- अर्थात नखाच्या तळाशी असलेला, बोटाच्या त्वचेला लागून असलेला अर्धगोलाकार भाग खरडून वा ‘ट्रिम’ करून ‘स्मूथ’ केला जातो. हे ‘क्युटिकल ट्रिमिंग’ टाळलेलं बरं. कारण तो भाग खरडून साफ करताना नखाला जिवाणू संसर्ग होऊ शकतो आणि असा संसर्ग पुढे बरं व्हायला वेळ घेतो.

आणखी वाचा : आई xx दे की रिप्लाय!

४) कृत्रिम नखं क्वचितच वापरा
तुम्हाला कृत्रिम नखं आवडत असतील तरी ती क्वचितच, खास प्रसंगांसाठी वापरलेली बरी. कृत्रिम नखं काढून टाकल्यावर आपली मूळची नखं त्यांचं झालेलं नुकसान नैसर्गिकरित्या भरून काढण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना तो अवधी द्यायला हवा. त्यामुळे सारखी सारखी कृत्रिम नखं वापरू नका, असा सल्ला ‘एएडी’नं दिला आहे.

नखं हा शरीराचा अगदी बारीकसा भाग असला, तरी त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. नखांची काळजी घेतली आणि त्यांना शरीरातून योग्य पोषण मिळालं, तर तुमची मूळची नखंही निश्चितपणे चांगली दिसतील

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you are using artificial nails then must read utility vp
First published on: 03-12-2022 at 17:27 IST