“छकुली, रडू नकोस. तू माझ्याजवळ ये. तुला कुणीही रागावणार नाही.” सुशीलाताईंनी छकुलीला जवळ बोलावून घेतलं, ती डोळे पुसत त्यांच्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली, “आजी, तूच फक्त माझ्यावर प्रेम करतेस, बाकी सगळे मला नुसतं रागावतात. माझं पोट दुखतंय म्हणून मला शाळेत जायचं नाहीये, असं सांगितलं तर ही नवीन मम्मी माझं काही ऐकूनच घेत नाही. माझी मम्मी आता देवाघरी गेली ना, मग माझं कोण ऐकणार?”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिचं ऐकून सुशीलाताईंचे डोळे भरून आले त्यांनी तिला जवळ घेतलं, तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाल्या, “बेटा, तुझी आजी आहे ना. तुला आज शाळेत जायचं नाहीये ना, नको जाऊस. बेडरूममध्ये जाऊन आराम कर.”

हेही वाचा – ‘१६ वर्षांच्या’ मुलीने सुरू केली स्वतःची कंपनी! आता करते ‘१०० कोटींची’ उलाढाल! कोण आहे, पाहा…

पडत्या फळाची आज्ञा घेऊन छकुली तिथून निघून गेली आणि सुशीलाताईंनी आपला मोर्चा मुलाकडे वळवला आणि रागातच त्याच्याशी बोलायला सुरुवात केली, “पराग, तुझ्या बायकोला सांगून ठेव. माझ्या नातीला सारखं रागवायचं नाही. आईविना पोर आहे ती, मी तिला पोरकं करणार नाही, तुझ्या बायकोला घेऊन तुला दुसरीकडे राहायला जायचं असेल तर खुश्शाल जा. तुम्ही तुमचा संसार करा. त्या लेकरच्या अंगावर ओरडायचं नाही. सावत्र आईचा त्रास मी माझ्या नातीला भोगू देणार नाही, तिचं सर्व करायला मी अजून खंबीर आहे.”

आईचा राग परागच्या लक्षात आला, सध्या वर्क फ्रॉम होम चालू असल्यानं घरात काय चाललं आहे हे त्याला माहिती होतं, पण वस्तुस्थिती लक्षात न घेता ती नातीवर आंधळं प्रेम करते आहे आणि ते छकुलीसाठी आजिबात योग्य नाही याची जाणीव त्याला होती, म्हणूनच तो सुशीला ताईंना म्हणाला,
“आई, प्रणिता करोनामध्ये आपल्याला सोडून गेल्यानंतर छकुलीला मी एकट्याने संभाळेन असं तुला म्हटलं होतं, पण तेव्हा तूच ‘आता माझं वय झालंय, तू दुसरं लग्न कर, छकुलीसाठी आई घेऊन ये,’ असं म्हणाली होतीस. तुझ्या सततच्या आग्रहामुळं मी लग्नाला तयार झालो आणि घटस्फोटित स्वातीशी लग्न करून तिला घरी आणलं. थोड्याच दिवसांत तिनं छकुलीला आपलंसं केलं. तिचं सगळं ती अगदी प्रेमानं करते, तिची खूप काळजी घेते. तिच्या आवडीनिवडी जोपासते, हे तुलाही चांगलंच माहिती आहे, सख्या आईसारखं प्रेम ती करू शकते, मग मूल चुकत असेल तर सख्या आईसारखं रागावण्याचा अधिकार तिला नाही? आई, तूच सांग, मी वेळेवर गृहपाठ केला नाही किंवा शाळेत खोड्या केल्या, तर तू मला किती रागवायचीस, कितीतरी वेळा मी तुझा मारही खाल्लेला आहे. मुलं चुकीचं वागत असेल तर रागावते तीच खरी आई. लहानपणी तूच मला चोरी करणाऱ्या मुलाची गोष्ट सांगितली होतीस. त्या मुलाला शिक्षा झाल्यानंतर त्यानं फक्त आपल्या आईला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि आईला भेटल्यानंतर त्या मुलानं आईच्या मानेचा कडकडून चावा घेतला आणि म्हणाला, ‘मी पहिली चोरी केली तेव्हा तू मला अडवलं असतंस तर मी आज अट्टल चोर झालो नसतो.’ मुलांना घडवण्यात आईचा सहभाग मोठा असतो, ती प्रसंगी कणखर वागून मुलांना योग्य मार्गावर आणत असते. आज स्वाती छकुलीला का रागावली, हे तू विचारलंस का? तिनं आज तिचा होमवर्क केलेला नाही, पोटात दुखतं हे ती खोट बोलत होती. तिला असंच तू पाठीशी घालशील तर ती खोटे बोलायला शिकेल, स्वातीचा कधीही आदर करणार नाही. तिला आई मिळावी म्हणून मी दुसरं लग्न केलं ना? मग हे असंच चालू राहिलं तर माझा उद्देश कधीच सफल होणार नाही. आपल्या मनात ’सावत्रआई ’ही छळणारी, त्रास देणारी ही संकल्पना इतकी रुजलेली आहे, त्यामुळं मुलांना घडवणारी सावत्र आई आपल्याला कधी दिसतच नाही. दुधावरची साय घट्ट होण्यासाठी दुधाला चांगलं तापवावं लागतं, योग्य प्रमाणात उष्णता द्यावीच लागते, तरच आपल्याला हवे ते रिझल्ट मिळतात. त्यांच्यात एकमेकींना रागावणं, वाद होणं हे सर्व होऊ दे, ते नसर्गिक आहे, यातूनच त्यांचं नातं घट्ट होणार आहे आणि छकुलीला तिची आई मिळणार आहे.”

हेही वाचा – IIT, IIMमधून घेतले शिक्षण, १ कोटीची नोकरी नाकारून उभारली ३०० कोटींची कंपनी! कोण आहे ही उद्योजिका?

सुशीलाताईंनी परागचं बोलणं ऐकलं आणि त्या विचारात मग्न झाल्या. खिडकीच्या बाहेर त्यांनी डोकावलं तर पोट दुखतं म्हणून शाळेत न जाणारी छकुली शेजारच्या पिंटू बरोबर उड्या मारत खेळत होती. आपण चुकीचा विचार करून स्वातीला उगाचच ‘सावत्रपणाचा’ दोष लावला. आता यापुढं तरी आई आणि मुलीच्या नात्याला पूर्वग्रह दूषित नजरेनं पाहायचं नाही असं त्यांनी ठरवलं.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smita joshi606@gmail.com)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It should be noted before blaming a woman that motherhood can be enlarged ssb