आपापली चवीची वैशिष्ट्य हरवलेल्या, रासायनिक खतांवर पोसलेल्या भाज्यांना किडीही तोंड लावत नाहीएत. त्या भाज्या आपण मात्र रोज खतोय. नैसर्गिक गोडवा हरवलेली फळं, निसत्व भाजीपाला, बेचव धान्य हेच सध्या वाट्याला येतंय. सेंद्रिय म्हणून जे विकलं जातं ते तरी कितपत सेंद्रिय असेल याबद्दल शंका असतेच. रासायनिक अन्नाचे दुष्परिणाम आपल्या अगदी घरात येऊन पोहोचले आहेत.
वाईवरून जाताना कितीही घाई असली तरी गावात डोकावल्याशिवाय रहावतच नाही. भद्रेश्वरापर्यंत जाण्याएवढा वेळ नसला तरी घाटावर जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं जातंच. मग तिथून पुढे बाजारात फेरी ठरलेली. आता सगळं खूप बदललं आहे, तरी त्या त्या ठिकाणी गेल्यावर जुन्या आठवणींत रमायला होतंच. आमचे बहादर्पूरकर काका वाईचे. सुटी लागली की वाईला काका आणि मावशी आजीकडे पळायचं. तिथली ती निवांत सुटी अजूनही मनात घट्ट रुतून आहे. महानगरपालिकेजवळचा तो आठवडी बाजार. त्यातल्या त्या ताज्या रसरशीत भाज्या. धान्य, फळं -फळावळ, मेवा-मिठाई, चटया-रजया, तयार कपडे, शेतीची अवजारं, फळझाडं, फुलंझाडं, बी-बियाणं सगळं हारीनं मांडलेलं असायचं. कितीवेळ तरी आम्ही मुली बाजारात फिरत असू. घरी येताना भाजीच्या जड पिशवीत हिरवीगार मेथीची जुडी हवीच. घरी आल्यावर त्या मेथीची फर्मास आमटी ठरलेली. ती चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. कृष्णाकाठची वांगी, वेगवेगळी कडधान्य सगळ्याला आपली अशी चव एक होती. आजकाल मेथी कितीही ताजी असली तरी ती पूर्वीची मजा नाही. सगळ्याच भाज्या जणू काही एका चवीच्या झाल्या सारख्या. दुधीभोपळ्याची, लाल भोपळ्याची जी एक अंगभूत चव होती, ती पार हरवल्यासारखी झाली आहे. कारलीसुद्धा कडू असली तरी त्यांची अशी एक चव होती. आजकाल मीठ लावून कारल्याचं कडू पाणी काढलं नाही, तशीच फोडणीस टाकली तरी भाजी फारशी कडू लागत नाही.
ते जुने कच्च हिरवे दोडे पेरू आणि जोडीला पिवळेधमक, गोड पिके पेरू आताशा कुठे दिसतच नाही. आतून गुलाबी, आकाराने मोठाले थायलंडचे पेरू मात्र सर्रास सापडतात. काहीसे डागाळलेले, पिवळसर, ओबडधोबड, इवले, थोरले देशी पेरू पार हरवलेतच जणू. तीच तऱ्हा वांग्याची. वांगी मग ती काटेरी असू देत की भरताची, कापाची लांबट वांगी असू देत की, भरली वांगी करण्यासाठीची ठेंगणी डुसगी, सगळ्यांची चव सारखीच. एक वांगं म्हणून किडकं निघायचं नाही. मटार गोड असले की आत भरमसाठ हिरव्या अळ्या या असायच्याच, तिच तऱ्हा भेंडीची, पण आजकाल मटारात कीड अपवादानेच सापडते. शेंगभाज्या निवडताना पूर्वी फार काळजी घ्यावी लागे, आता कोणतीही भाजी इतकी बारकाईने निवडावी लागतं नाही. सहज स्वच्छ होते.
वरवर जरी हे सगळं फार विचारकरण्यासारखं वाटल नाही तरी हा बदल दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही. आपापली चवीची वैशिष्ट्य हरवलेल्या, रासायनिक खतांवर पोसलेल्या भाज्यांना किडीही तोंड लावत नाहीएत. त्या भाज्या आपण मात्र रोज खतोय. नैसर्गिक गोडवा हरवलेली फळं, निसत्व भाजीपाला, बेचव धान्य हेच सध्या वाट्याला येतंय.
सेंद्रिय म्हणून जे विकलं जातं ते तरी कितपत सेंद्रिय असेल याबद्दल शंका असतेच. रासायनिक अन्नाचे दुष्परिणाम आपल्या अगदी घरात येऊन पोहोचले आहेत. घटती प्रतिकारशक्ती, आजारांचे वाढलेलं प्रमाण या सावध करणाऱ्या घंटा सतत वाटतायत, पण अजून म्हणावी तितकी जाग येत नाहीए. हे असं झालं पाहिजे, अमक्याने अमकं केलं पाहिजे, हे काम सरकारचं आहे. अशा वायफळ चर्चा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा विपुलाचं सृष्टी चा आशीर्वाद आपण कसा मिळवायचा याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
पावसाळ्यात उगवलेली रस्त्याकडेची इवलाली रोपं, झाडं, झुडपं, गवत पाहताना वाटतं सृष्टी किती हाताने देतेय आपल्याला. आपण सृष्टीची ओळख विसरलोय. अजूनही आपल्या अवतीभवती अनेक औषधी वनस्पती टिकून आहेत. आपण त्यांचे गुण दुर्लक्षित केलेत. निर्गुडीचा पाला, रामबाणाची कणसं, रतन गुंजेचा पाला, अडुळशाची, प्राजक्त, पेरू, बेलाची गुळवेलीची पानं, हादगा, गोकर्णाची फुलं सगळं सगळं आपल्या अवती भवती तर आहे, पण आपण सगळं दृष्टी आड केलंय.
चार काठ्यांच्या आधारे वाढणारा तोंडलीचा वेल, एखाद्या फुटक्या डब्यात सहजी वाढणारा घोसाळ्याचा वेल. थोड्या सूर्य प्रकाशातही तग धरणारी तुळसं, गवती चहा, आलं, मिरचीची रोपं. पावसाच्या पाण्यावर वाढणारी हळद. आईस्किमच्या डब्यात सुद्धा उगवणारी मेथी, कोथिंबीर, लसूण पात आणि पालक, पाइपचा आधार घेत वाढणारी मायाळू, काकडीही सगळी जणं आपली वाट पहाताएत जणू, या भाज्या पोटभरीच्या तर आहेतच, पण औषधीही आहेत. विचार केला तर तुम्हालाही पटेल, यांना वाढवायला फारसे कष्ट नाही पडणार. फारसा खर्चही नाही होणार.
जागा नाही, म्हणून ओरड करणारे आपण, डोळसपणे प्रयत्न तरी कधी करणार आहोत. सेंद्रीय म्हणत महाग मोलाचं विकत घेण्यापेक्षा यातलं निदान एखादा टक्का तरी आपण घरी वाढवू या, असं कधी ठरवणार आहोत.
आज खरंच ती वेळ आली आहे. शोभेच्या झाडांच्या सोबतीला एक दोन पोटभरीच्या भाज्या हव्यातचं. आधाराने वाढणाऱ्या वेलींना जागा करून द्यायला हवीच.
हे जर साधलं तर आपल्या एवढ्याशा कृतीने निसर्ग आपल्या घरात येईल, रूजेल, वाढेल आणि आपल्याला अंतर्बाह्य समृद्ध करेल. आपली एक एक छोटी कृती, छोटं पाऊल आपलं अवघं जीवन बदलून टाकेल.
mythreye.kjkelkar@gmail.com