काही दिवसांपूर्वीच माझ्या एका दूरच्या नातेवाईकांच्या सूनेला मुलगी झाली. लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी घरात पाळणा हलल्याने सगळेच आनंदी होते. अगदी थाटामाटात लाडक्या नातीचं बारसही केलं. सगळ्यांनी स्टेटस पोस्ट करत आनंदही व्यक्त केला. लेकीच्या आगमनाने वडील आणि लाडक्या नातीचा हसमुख चेहरा पाहून तिच्या आजोबांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. नातीशी तिच्या भाषेत बोबडे बोल बोलणाऱ्या व तिला कवेत घेऊन आकाश दाखवू पाहणाऱ्या आजोबासाठी आसमान ठेंगणं झालं होतं. माझ्या लेकाला मुलगी झाली… मी आजोबा झालो, हे छाती ठोकून सांगणाऱ्या आजोबाने आजपर्यंत अनेक महिलांना, मुलींना, स्वत:च्या बायकोला व घरात लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या सूनेला मात्र अपमानास्पद वागणूक दिली. स्वत:ला महान समजणाऱ्या, महिलांना तुच्छ लेखणाऱ्या, चारचौघात स्त्रियांचा अपमान करण्यात सुख मिळवणाऱ्या या महाशयांच्या घरी मुलगी कशी काय जन्माला आली असेल?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुरेश गोडबोले (नाव बदललं आहे) तालुक्यातील बडे प्रस्थ. राजकारणातील व्यक्तींबरोबर त्यांची ऊठबस. समाजातील पुढारलेल्या व्यक्तींपैकी एक. त्यांच्या लेकाच्या लग्नातही राजकीय मंडळींनी हजेरी लावली होती. त्यामुळे समाजातही त्यांना मोठा मान होताच. पण काही माणसांना गरजेपेक्षा जास्त मान दिला की, ती डोक्यावर बसतात. सुरेश गोडबोलेही अशाच माणसांपैकी एक. सुरुवातीला प्रत्येक कार्यक्रमात सल्ला घेणारी लोक आता त्यांना मागून नावं ठेवू लागली आहेत. त्याचं कारणंही तसंच आहे. आपल्याला थोडं जास्त समजत असलं, तरी समोरच्या माणसांचं बोलणं, मत विचारत घेतलं नाही, तर कोणाचाही स्वाभिमान दुखावू शकतो, हे अगदीच स्वाभाविक आहे. पण समोरच्याचं काहीही ऐकून न घेता, स्वत:ची मतं लादणं, भर कार्यक्रमात अपमान करणं, मनाला लागेल असं बोलणं याची त्यांना आता सवय लागली आहे.

हेही वाचा>> पतीचं वर्षश्राद्ध आणि हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाची तयारी करणारी ‘ती’

एका कार्यक्रमात घडलेला हा किस्सा. अगदी जवळच्या नातेवाईकांच्याच कार्यक्रमात सुरेश गोडबोलेंनी त्यांच्या सुनेचा सगळ्यांसमोर अपमान केला होता. कार्यक्रमात पुढे होऊन काम करणाऱ्या सुनेला त्यांनी चार चौघात सुनावलं होतं. “किती काहीही झालं तरी तुमची जागा आमच्या पायातील वहाणेचीच (चप्पल),” असं ते सुनेला म्हणाले होते. लक्ष्मीच्या पावलांनी घरात आलेल्या सुनेला त्यांनी याआधीही अनेकदा अपमानास्पद वागणूक दिली होती. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणं, आईवडिलांवरुन बोलणं… यात त्यांना कोणता पुरुषार्थ वाटतो, कुणास ठाऊक.

बरं त्यांचा मुलगाही वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकतोय. महिलांच्या बाबतीत त्याचे विचारही फारसे चांगले नाहीत. ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला.. अशी सुरेश गोडबोलेंच्या पत्नीची अवस्था. लग्नानंतर अनेक वर्ष मूल होत नाही म्हणून लेकाचं दुसरं लग्न लावायला निघाली होती ही बाई. विशेष म्हणजे या गोष्टीसाठी लेकही तयार झाला होता. म्हणजे बाई फक्त मूल जन्माला घालायचं साधन… असे यांचे विचार.

हेही वाचा>> “एक वर्ष घरात राहिल्याने माझा नवरा परत येईल का?”

आता अशा कुटुंबात मुलीचा जन्म झाल्याने मला थोडं आश्चर्यच वाटलं. अर्थात ते काही आपल्या किंवा देवाच्या हातात नसतं. पण स्वत:ला पाच मुली असतानाही या महाशयांना स्त्री कळलेली नाही, याबद्दल मला जास्त आश्चर्य वाटलं. सुनेला पायातील चप्पल म्हणणाऱ्या या महाशयांना आपल्या मुलीलाही कोणीतरी अशी वागणूक दिली तर हा विचार मनाला शिवत नसेल का? मूल होत नाही म्हणून लेकाचं दुसरं लग्न लावून देणाऱ्या या महाशयांच्या पत्नीचं तर स्त्री म्हणून आयुष्यच व्यर्थ आहे. मला वाटतं नातीच्या जन्माने देवाने त्यांना सुधारण्याची एक संधी दिली असावी. पण पाच मुली असूनही स्त्रियांबद्दलचं मत बदललं नाही अशा व्यक्तीच्या डोक्यात नातीच्या जन्माने तरी प्रकाश पडेल काय?

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man did not treated his sons wife well inappropriate behavior with bahu chatura kak