गेली अनेक वर्षे ती लोकशाहीच्या समर्थनासाठी अगदी पाय रोवून घट्टपणे उभी आहे. खरे तर तिच्या आजूबाजूचे वातावरण लोकशाही आणि लोकाधिकार यांच्यासाठी अजिबातच पोषक नव्हते. पण तिने तिचे प्रयत्न सोडले नाहीत. ती फक्त तिच्या देशासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी एक उदाहरण ठरली आहे. तिच्या अथक प्रयत्नांचे फळ म्हणून जगातील सर्वोच्च पुरस्कार देऊन तिला गौरवण्यात आले आहे. ती आहे यंदाची नोबेल शांतता पुरस्कार विजेती मारिया कोरिना मच्याडो. मारिया व्हेनेझुएलामधील विरोधी पक्षनेता आहे. पण संपूर्ण लॅटिन अमेरिकेत लोकशाही आणि लोकाधिकारांच्या पुरस्कारांसाठी एक सर्वसामान्य नागरिक काय करू शकतो याचे प्रतिक म्हणून तिच्याकडे पाहिले जाते.
नोबेल शांतता पुरस्कार देणाऱ्या समितीने मारियाचा गौरव करताना म्हटले आहे की, “ लोकशाहीमधील लोकांच्या अधिकारांचा पुरस्कार करण्यासाठी त्यांचे अथक प्रयत्न आणि हुकुमशाही ते लोकशाहीपर्यंतचा प्रवास शांततामय मार्गाने करण्याच्या त्यांच्या संघर्षासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.”
व्हेनेझुएलासारख्या देशात लोकशाहीसाठी शांततामय मार्गाने प्रयत्न करणे खरंच खूप कठीण गोष्ट आहे. आजूबाजूला प्रचंड अंधार असताना लोकशाहीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी मारियाला हा पुरस्कार देण्यात येत आहे, असे समितीने म्हटले आहे ते अगदी योग्य आहे. खरे तर या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार नावांची घोषणा होण्याआधीच चर्चेत आला होता. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार दिला जाण्याच्या चर्चेला उधाण आले होते.
लोकशाहीची खंदी समर्थक
व्हेनेझुएलाच्या लोकशाहीच्या आंदोलनामध्ये मारियाचे मोलाचे योगदान आहे. निकोलस मादुरो सरकारच्या दडपशाहीचा ती गेली कित्येक दशके विरोध करत आहे. जीवे मारण्याच्या धमक्या, हल्ले, अनेकदा झालेली अटक आणि राजकीय टीका सहन करूनही तिन लोकशाहीचे समर्थन करणे सोडले नाही. लॅटीन अमेरिकेतील नागरिकांच्या साहसाचे प्रतिक असे मारियाला संबोधले जाते. सातत्याने भितीच्या छायेखेली, मृत्युच्या सावटाखाली राहूनही तिने आपला देश व्हेनेझुएला सोडला नाही. उलट आपल्या लोकांच्या अधिकारासाठी ती सातत्याने लढत राहिली. मुक्त वातावरणातील निवडणुकासाठी सातत्याने प्रयत्न आणि अयोग्य, अन्याय गोष्टींच्या विरोधात शांततापूर्ण पण खंबीरपणे उभी राहिल्यामुळे लाखो लोकांची ती प्रेरणास्रोत बनली आहे. विखुरलेल्या विरोधी पक्षांना एकत्र करून त्यांच्यात एकजूट निर्माण करणारी शक्ती, असे तिचे नोबेल समितीने वर्णन केले आहे.
व्हेनेझुएलामध्ये २०२४ मध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये मारियाची उमेदवारी सरकारने रोखली होती. तिने विरोधी उमेदवार एडमंडो गोंजालेज उरुतिया यांचे समर्थन केले होते. सरकारची दडपशाही झुगारून मतदान केंद्रांची देखरेख, मनमोजणीच्या कागदपत्रांमधील फेरफार आणि निवडणुमधील घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी नागरिकांचे प्रतिनिधीत्व केले. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारे तिने हिंसात्मक मार्गाचा अवलंब केला नाही. त्यामुळेच ‘तिने लोकशाहीचे प्रयत्न म्हणजेच शांततेची साधनेही आहेत. ‘भविष्यातील आशेचे प्रतिक आहे, जिथे नागरिकांच्या अनमोल अधिकारांचे संरक्षण केले जाते आणि त्यांचा आवाज ऐकला जातो,’ या शब्दांत तिच्या अहिंसक मार्गाने केलेल्या कामाचा गौरव करण्यात आला आहे.
मारियाची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे ती व्हेनेझुएलाची राष्ट्रीय समन्वयक आहे. २०१३ मध्ये तिने याची सह-स्थापना केली होती. त्याचबरोबर २०१३ ते २०१५ या काळात ती नॅशनल असेंब्लीची सदस्यही होती. स्वतंत्रपणे निवडणुकांना प्रोत्साहन देणाऱ्या नागरिकांचा सुमाते समाज आणि लोकशाही परिवर्तनचे समर्थन करणारी युती सोयव्हेनेझुएलाच्या स्थापनेतही तिची महत्त्वाची भूमिका आहे.
२०१४ मध्ये अमेरिकन राज्यांमध्ये (organisation of American States) मानवाधिकारांच्या होणाऱ्या उल्लंघनाविरोधात तिने टीका केली होती. त्यामुळे तिला २०१४ मध्ये संसदेतून निलंबित करण्यात आले होते. इतकेच नाही, तिच्यावर राजद्रोह, कटकारस्थान रचल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. तिच्या प्रवासावर निर्बंध घालण्यात आले होते. ती राजकीयदृष्ट्या अयोग्य असल्याचा ठपकाही तिच्यावर ठेवण्यात आला होता. पण या सगळ्यांना ती पुरून उरली. लोकशाही, लोकाधिकारांसाठीचे तिचे प्रयत्न तिने थांबवले नाहीत. गेले वर्षभर तिला हद्दपार करण्यात आले आहे. सध्या ती व्हेनेझुएलात एकांतवासात निर्वासित म्हणून राहत आहे. युनिव्हर्सिटी कॅटोलिका आंद्रेस बेलोमधून तिने औद्योगिक इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे आणि IESA मधून तिने अर्थ विषयात विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे. उच्चशिक्षित असलेली ५८ वर्षांची मारिया खऱ्या अर्थाने लोकशाहीसाठी झटणाऱ्या शांतताप्रिय लोकांची प्रतिनिधी आहे. तिच्या याच संघर्षाचा गौरव म्हणून तिला अनेक मानसन्मान मिळाले आहेत. बीबीसीने २०१८ मधील १०० सर्वाधिक प्रभावशाली महिलांमध्ये तिचा समावेश केला होता. २०१९ च्या इंटरनॅशनल फ्रीडम प्राईजनेही तिला गौरवण्यात आले आहे. फक्त लोकशाहीसाठी तिने आपले जीवन समर्पित केले आहे. “मला जबरदस्त धक्का बसला आहे… पण हा आनंदाचा धक्का आहे,” २०२४ पासून अज्ञातवासात असलेल्या मारियाची नोबेल पुरस्काराची घोषणा झाल्यानंतरची ही पहिली सार्वजिक प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे.