आजही देशातील अनेक खेड्यापाड्यांत, वाड्या वस्त्यांमध्ये, आदिवासी पाड्यात वीज, शिक्षण, पाणी आणि मूलभूत गरजांची वानवा आहे. पण म्हणतात ना, शिक्षणाची आवड असेल तर व्यक्तीला आयुष्यात प्रगती करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कठीण परिस्थितीतही व्यक्ती शिकते आणि स्वत:चे नाव उज्ज्वल करते. अशाच प्रकारे एका आदिवासी पाड्यात राहणाऱ्या महिलेने तामिळनाडू लोकसेवा आयोगाद्वारे (TNPSC) घेतल्या जाणाऱ्या दिवाणी न्यायालय न्यायाधीश परीक्षा दिली अन् या परीक्षेत यशही मिळवले. यामुळे त्यांना आता पहिला आदिवासी महिला न्यायाधीश होण्याचा मान मिळाला आहे.

यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रसूतीनंतर काही तासांनी त्यांनी चक्क २५० किमीचा प्रवास करून परीक्षा केंद्र गाठले, यानंतर ही परीक्षा दिली. या परीक्षेच्या मुलाखत प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायालय न्यायाधीश म्हणून निवड झाली. अवघ्या २३ व्या वर्षी त्यांनी हे यश मिळवले आहे, ज्यामुळे त्यांची ही कहाणी अनेक महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे. दिवाणी न्यायालय न्यायाधीश व्ही. श्रीपथी यांनी हा इतिहास रचला आहे.

व्ही. श्रीपथी या तिरुपथूर जिल्ह्यातील पुलियूर गावातील मल्याळी जमातीतील येलगिरी हिल्सच्या रहिवासी आहेत. तिरुवन्नमलाई येथील राखीव जंगलातील सीमेवरील थुविंजीकुप्पम येथे त्यांचा जन्म झाला. श्रीपथी यांनी येलागिरी हिल्समध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केले, यानंतर बीए आणि कायद्याची पदवी घेतली, पण लहान वयातच त्यांचे लग्न झाले. नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रसूतीच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी TNPSC ची परीक्षा देण्यासाठी सुमारे २५० किमी प्रवास करून चेन्नई गाठले. त्यामुळे त्यांच्या या संघर्षमय प्रवासाकडे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे लक्ष वेधून घेतले.

दरम्यान, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केलं आहे. त्यांनी एक्सवरून (पूर्वीचे ट्विटर) एक पोस्ट केली आहे, ज्यात त्यांनी लिहिले की, एका डोंगराळ भागातील आदिवासी समाजातील एका मुलीने हे यश मिळवले हे पाहून आनंद झाला. आमच्या द्रविड मॉडेल सरकारने तामिळ भाषेत शिक्षित लोकांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याच्या उद्देशाने आणलेल्या धोरणामुळे श्रीपथी यांची न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे, हे जाणून मला अभिमान वाटतो. तिच्या यशाला पाठिंबा दिल्याबद्दल तिच्या आई आणि पतीचे आभार! तामिळनाडूत ज्यांना सामाजिक न्याय हा शब्द उच्चारायलाही संकोच वाटतो, त्यांच्यासाठी श्रीपथी यांच्यासारख्या व्यक्तींचे यश हे चांगले उत्तर आहे.

यावर क्रीडा मंत्री स्टॅलिन यांनीदेखील व्ही. श्रीपथी यांचं कौतुक केलं आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट करत लिहिले की, तिच्या मुलाच्या जन्मानंतर दोनच दिवसांनी परीक्षा होणार होती, पण आपला जीव धोक्यात घालून परीक्षेला जाण्यासाठी लांबचा प्रवास करण्याचा त्यांचा निर्धार प्रशंसनीय आहे, अशाप्रकारे त्यांची ही प्रेरणादायी कथा चिकाटी, जिद्द आणि उत्कटतेचा पुरावा आहे.

नोव्हेंबर २०२३ मध्ये चेन्नई येथे २५० किमी दूर ही परीक्षा झाली. काही दिवसांपूर्वी अंतिम निवडीसाठी मुलाखत प्रक्रिया पार पडली. या मुलाखतीनंतर व्ही. श्रीपथी यांची दिवाणी न्यायालय न्यायाधीश या पदावर निवड झाली. या यशानंतर व्ही. श्रीपथी यांचे त्यांच्या गावात ढोल-ताशे, हार आणि भव्य मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले.