डॉ. स्मिता प्रकाश जोशी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“अंजली, फोन उचल, अगं किती वेळ तो वाजतो आहे.”

“शर्मिला, मला तो फोन उचलायचा नाहीये.”

“अगं, मग तो फोन बंद करून ठेव.”

“मी फोन बंदही करणार नाहीये, त्याला कळू देत मला किती राग आलाय ते, आज मी आजिबात माघार घेणार नाहीये आणि तुला फोनचा त्रास होत असेल तर तू दुसऱ्या टेबलवर जाऊन काम करीत बैस.”

अंजलीचं चांगलंच बिनसलंय हे शर्मिलाच्या लक्षात आलं. घरात काही वाजलं, की हिचं ऑफिसमध्येही लक्ष लागत नाही आणि ऑफिस मधल्या मैत्रिणींसोबतही तिची चिडचिड सुरू होते, हे एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं. नक्की काय झालंय हे समजून घ्यायलाच हवं असं तिनं ठरवलं. कॅन्टीन मधून दोन स्ट्रॉंग कॉफी तिनं मागवल्या आणि अंजली जवळ जाऊन बसली.

“अंजली, काम जरा बाजूला राहू देत. हे बघ आपल्या दोघींसाठी मस्त कॉफी मागवली आहे. घे बरं, तुला छान वाटेल.”

“शमा, कसलं छान? अगं मन थाऱ्यावर नसेल ना, तर काहीच चांगलं वाटत नाही.”

“अगं, पण काय झालंय ते तरी सांगशील? ”

“ काय सांगायचं? नेहमीचंच. आमच्या दोघांचे वाद आणि कारणही नेहमीचंच. ‘माझी सासू.’ त्यांचं कितीही चुकलं तरी माझा नवरा कधीही त्यांना बोलणार नाही. प्रत्येकवेळेला काही झालं तरी मीच माघार घ्यायची असं का? अमोलच्याच एका मित्राने एक चांगलं प्रपोजल आणलं होतं. आमच्या शेजारच्या सोसायटीमध्ये एक फ्लॅट विकायचा आहे, आम्हांला त्याने बघायला बोलावलं होतं, मला तर तो फ्लॅट एकदम आवडला, म्हणून घरी आल्यावर तो घेऊया अशी आमची चर्चा चालली होती, पण सासूबाईंनी मोडता घातला. झालं, श्रावण बाळाने लगेच आईसाहेबांची आज्ञा मान्य केली. फ्लॅट बघून येताना आम्ही जे मनसुबे रचले होते, ते धडाधड कोसळले. माझ्या सासूला आम्हांला पुढे जाऊच द्यायचे नाही.”

“कशाला नवीन फ्लॅट घ्यायचा? हे घर आमच्या नंतर तुम्हालाच मिळणार आहे,उगाच कर्ज करू नका.” असे त्यांचे विचार आहेत. आणि अमोल काहीही बोलत नाही. काल याच गोष्टीवरून आमचे वाद झालेत. मी अमोलला सांगितलं आहे, तुला नक्की कोण हवं आहे ते ठरव. एकतर आई किंवा बायको. मी यापुढे त्याच्या आईसोबत राहू शकत नाही. अगं, प्रत्येक गोष्टीत त्यांचा हस्तक्षेप. घरातील सगळं त्याच सांगणार आणि माझा नवरोबा ते सगळं ऐकणार. मी एकही शब्द आईच्या विरुद्ध बोललं, की लगेच अमोलला राग येणारच. पण आज मलाही राग आलाय. मी सकाळी उठून ब्रेकफास्ट केला नाही आणि जेवणाचा डबाही आणलेला नाही म्हणून तो मला सारखा फोन करतोय.”

“ अंजली, कॉफी घे बरं आधी, तू सकाळपासून काहीच खाल्ले नाहीस म्हणून तुझी चिडचिड वाढली आहे. समोरचा माणूस नक्की काय म्हणतोय हे ऐकून घेण्याची तयारी असेल ना तर त्रास कमी होतो. तुझी सासू फार शिकलेली नाही, पण एवढे वर्ष त्यांनी घर सांभाळले आहे. एक गृहिणी म्हणून प्रत्येक बारीकसारीक गोष्ट निगुतीनं केलेली आहे. तुझ्या सासऱ्यांनी रिकामा प्लॉट घेतला होता त्यावर तुमचा बंगला बांधून घेताना त्यांनी स्वतः लक्ष घालून सर्व करून घेतलं आहे, त्यांचे अनुभव हेच त्यांचे शिक्षण आहे. आपल्या मुलांचं चांगलं व्हावं हे कोणत्याही आईच्या मनात असतंच, म्हणूनच त्या काही गोष्टी तुम्हांला सांगत असतात. तुमच्या दोघांचा स्वतंत्र फ्लॅट असायला हवा, अशी तुझी अपेक्षा आहे, त्यात काहीही गैर नाही पण याच गोष्टी योग्य भाषेत तू त्यांना समजावून सांगितलंस तर त्यांना पटेल. पूर्वी ऋण काढून सण करू नका असं म्हटलं जायचं म्हणजेच आपल्या कमाई नुसारचं आपल्या गरजा भागवल्या जायच्या. कर्ज काढणं हे कमीपणाचं लक्षण होतं, परंतु आता ती गरज झाली आहे. तू आणि अमोल दोघेही आधी चर्चा करा, तुमच्या दोघांचं एकमत झालं, की त्यांना समजावून सांगा. कर्ज काढून घर घेतलं तर तुम्हांला आयकरात कशी सवलत मिळेल, आपली अजून एक संपत्ती कशी वाढेल हे समजावून सांगा. रिसेलचा फ्लॅट घेण्यापेक्षा नवीन ठिकाणी बुकिंग करा, म्हणजे त्याचंही ऐकल्यासारखं होईल. अंजली, अगं ऑफिस मध्ये आपण काम करतो तेव्हा, आपल्या बॉसच्या सगळ्या गोष्टी आपल्याला पटतात का? पण आपण जुळवून घेतो. बॉस असा आहे म्हणून नोकरी सोडत नाही, मग घरच्या नात्यांबद्दल असं का? तेथे कमीपणा का घेतला जात नाही? एक लक्षात ठेव, सासू सुनांचं पारंपरिक नातं हे विळ्या-भोपळ्याचं असतं, पण दोघीही एकत्र आल्या तर चांगली कलाकृती तयार होऊ शकते. या वयात त्यांच्यात बदल होणे अवघड आहे,परंतु तू तर तुझ्यात बदल करू शकतेस ना. त्यांचा द्वेष करणं सोडून दे थोडं त्यांच्या कलानं आणि तुझ्या कौशल्यानं काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न कर. महत्वाचं म्हणजे सासूबाई अशा वागतात म्हणून अमोलशी वाद घालणं बंद कर. दोघींपैकी एकीची निवड तो कशी करेल? त्याच्यासाठी तुम्ही दोघीही तेवढ्याच महत्वाच्या आहात. आणि अन्नावर आजिबात राग काढायचा नाही. खाऊन घे बरं आधी काहीतरी. अंजली, अगं, घरच्या वातावरणाचे पडसाद आपल्या ऑफिसच्या कामावरही पडतात. तुला तुझे घर आणि करिअर दोन्हीही संभाळायचं आहे.”

शर्मिला बराच वेळ अंजलीला समजावून सांगत होती. तिचं म्हणणं अंजलीला पटलं. तिनं कॉफीचा आस्वाद घेतला आणि शर्मिलाच्या डब्यातील पराठा ही संपवला, तेवढ्यात पुन्हा फोन वाजला. तेव्हा मात्र फोन उचलून ती अमोलशी छान हसून बोलली. आणि संध्याकाळी सर्व कुटुंबासोबत डिनर साठी बाहेर जाण्याचा प्लॅनही केला.

(smitajoshi606@gmail.com)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relationship between mother in law and daughter in law asj