जिद्दीच्या जोरावर शारीरिक व्यंगावर मात करून यशाची शिखरे काबीज करणारी अनेक माणसे समाजात दिसून येतात; आणि आपले स्वप्न सत्यात उतरवून समाजात एक वेगळा इतिहास रचून समाजासाठी प्रेरणास्थान बनतात. सातारा जिल्ह्यातील संस्कृती विकास मोरे ही त्यांपैकीच एक.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संस्कृतीचा जन्म सातारा जिल्ह्यातील दहीवडी गावातील मध्यमवर्गीय कुटुंबातील. संस्कृती जन्मत:च दृष्टीहीन असूनही तिच्या आईवडिलांनी कोणताही संकोच न बाळगता मोठ्या आनंदाने तिचा स्वीकार केला. दृष्टीहीन असल्याने तिचं पुढील आयुष्य कसं जाईल याबद्दल अनेकजण चिंता व्यक्त करत.

ही मुलगी आहे आणि त्यात दृष्टीहीन- हिचं पुढे काय होईल? हीचं भविष्य काय असेल? पण संस्कृतीच्या आईवडिलांनी लोकांच्या या चिंतेवर फार लक्ष न देता तिच्या पालनपोषणावर जास्त भर दिला. त्यात हळूहळू नातेवाईकांची देखील साथ मिळत गेली.

हे ही वाचा… स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?

पुढे शाळेत गेल्यावर थोडा त्रास झाला. पण शाळेतील तिच्या पहिल्या शिक्षिका मुलाणी मॅडम आणि कुलाळ मॅडम यांनी तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन नेहमीच पॉझिटिव्ह ठेवला. शाळेच्या सुरुवातीच्या काळात या दोन शिक्षिकांचे तिला विशेष आधार आणि सहकार्य मिळाले.

शाळेत असताना अभ्यासाव्यतिरिक्त अन्य ॲक्टिव्हिटी, अभ्यासातून थोडा विरंगुळा म्हणून संस्कृतीच्या आईने तिला कोणता खेळ खेळता येईल याविषयी चौकशी सुरू केली. तेव्हा त्यांना काही दिव्यांग व्यक्ती भेटल्या व त्यांच्याकडून त्यांना दिव्यांग लोकांसाठीसुद्धा बुद्धीबळसारखा खेळ आहे हे त्यांना समजले. मग त्यांनी अजून चौकशी करून साताऱ्याचे अमित देशपांडे यांचा नंबर मिळवला. अमित देशपांडे स्वत: घरी येऊन बुद्धीबळ कसा खेळतात हे संस्कृतीला शिकवलं. त्यानंतर शहाबुद्दीन शेख आणि शार्दुल तपासे या दोघांनी मिळून तिला बुद्धीबळातील मुलभूत गोष्टी समजावून सांगितल्या व शिकवल्या. पुढे स्वप्निल शहा आणि पंकज बेंद्रे या दोन शिक्षकांचे मार्गदर्शनदेखील तिच्यासाठी खूप मौल्यवान ठरले. आर्यन जोशी यांनी तर तिला बुद्धीबळामध्ये कोणती बुक ॲप्स कशी वापरावी, लॅपटॉपवर बुद्धीबळ कसा खेळायचा या सर्व बारीकसारीक गोष्टी शिकवल्या. आणि संस्कृतीने देखील त्या गोष्टी बारकाईने आत्मसात केल्या.

गावात बुद्धीबळ जास्त प्रचलित नसल्याने संस्कृतीकडे बुद्धीबळ खेळायला पार्टनर मिळत नव्हते. म्हणून तिने लॅपटॉपवरच ऑनलाईन गेम खेळायला सुरुवात केली. जोशी सरांनी लॅपटॉप शिकवल्यामुळे ती बुद्धीबळ खेळण्यासाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वत:च ऑनलाईन खेळायला सुरुवात केली.

हे ही वाचा… ‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन

ऑनलाईन बुद्धीबळ खेळताखेळता ती शाळा, महाविद्यालय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्या स्पर्धेत विजेतेपद पटकावून नावारूपास आली. २०२३ मध्ये होंगझो येथे झालेल्या आशियाई पॅराऑलिम्पिकमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची संधी तिला मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत संस्कृतीने महिला सांघिक बुद्धीबळ स्पर्धेत कांस्यपदक मिळवले. बुद्धीबळ खेळातील तिच्या कामगिरीमुळे आतापर्यंत जिल्हा क्रीडा पुरस्कार, सावित्रीबाई फुले संघर्ष पुरस्कार असे एक ना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच सातारा जिल्ह्याची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणूनही निवड झाली आहे. या सर्व गोष्टींमध्ये संस्कृतीच्या आईचे देखील मोलाचे योगदान असल्याने त्यांना जिजामाता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे संस्कृतीच्या जीवनावर डॉक्युमेंटरी तयार केली जात आहे. बुद्धीबळासोबत संस्कृती एक उत्त्कृष्ट पियानो वादक आहे. तसेच सध्या ती कॉलेज शिक्षणासोबत शास्त्रीय संगीताचे पदवी शिक्षण घेत आहे.

भविष्यात आतंरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नेतृत्व करत देशासाठी सुवर्ण पदक जिंकण्याचं तिचं स्वप्न आहे. ती म्हणाली, ‘‘ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंड (AICFB) ही संस्था आम्हाला खूप सहकार्य करते. या संस्थेमुळे आम्हाला स्पर्धेत भाग घेता येतो, मार्गदर्शन मिळते. फक्त शासनाने जातीने यात लक्ष घालून खेळाडूंना अजून सहकार्य केलं तर नक्कीच सर्व खेळाडू देशाचं नाव उंचावतील. प्रत्येक मुलीने स्वत:च्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आपल्या आईवडिलांना अभिमान वाटेल अशी वाटचाल आपण केली पाहिजे हेच ध्येय आपण उराशी बाळगले पाहिजे. समाजाकडून आपल्याकडे दुर्लक्ष, विरोध होत असला तरी आपण आपल्या कर्तृत्वाने समाजाचा दृष्टीकोन बदलू शकतो. आणि समाजाने देखील आमच्यासारख्या मुला – मुलींवर विश्वास दाखवला पाहिजे. कारण आम्ही जरी अपंग जरी असलो तरी आम्हीदेखील समाजाचा भाग आहोत,’’ असं ती कळकळीने सांगते.

आपल्या यशात घरच्यांचा अधिक वाटा असल्याचं सांगताना ती म्हणाली की, आमच्या घरातील वातावरण नेहमीच सकारात्मक विचाराचे असल्याने मला माझ्याबद्दल समाज काय बोलतोय, काय विचार करतोय याचा फरक पडला नाही. आमची एकत्र कुटुंबपद्धती असल्याने घरच्यांचा नेहमीच पाठिंबा राहिला आहे. तसेच नातेवाईकांचेदेखील मला खूप पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळाले. या सर्व गोष्टींमुळे समाजात वावरताना मला सहसा कधी कोणती अडचण जाणवली नाही.’’

हे ही वाचा… काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…

संस्कृतीसोबत नेहमी सावलीप्रमाणे असणारी तिची आई म्हणते की, तिच्या अंधत्वाबद्दल आम्हाला कधीच खंत वाटली नाही. इतर सामान्य मुलांप्रमाणेच आम्ही तिचा सांभाळ केला आहे. माझी मुलगी अंध असली तरी ती खूप हुशार आणि कर्तृत्ववान आहे. आणि मला माझ्या मुलीवर जरा जास्तच विश्वास आहे. लहानपणापासूनच ती प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करते चांगलं काय वाईट काय हे ती समजून घेते. संस्कृतीची आई असल्याचा आज मला अभिमान वाटतो.

तिच्या याच कर्तृत्वाची दखल घेऊन राज्य सरकारतर्फे संस्कृतीला मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी (प्रशिक्षण) क्लास वन अधिकारीची म्हणून नियुक्त करत तिचा यथोचित सन्मान केला आहे. अगदी कमी वयात म्हणजे १९ व्या वर्षीच आपल्या उपजत कलागुणांमुळे क्लासवन अधिकारी झाल्याने पंचक्रोशीतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आज आजूबाजूचे लोक आपल्या मुलांना संस्कृतीचं उदाहरण देऊन आपल्या मुलांना प्रेरित करत आहेत.

संस्कृतीचा प्रवास पाहिला असता समर्थ रामदासांचे बोल आठवतात ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’. तुमची परिश्रम करण्याची तयारी असेल आणि संयम असेल तर अशक्य गोष्ट आपण शक्य करून साध्य करू शकतो. पण अवघड आहे किंवा माझ्याकडून हे होणार नाही म्हणून सोडून देणे, दुर्लक्ष करणे हे योग्य नाही. संस्कृतीचा आदर्श सर्व मुलांनी ठेवावा असं तिचं कर्तृत्व आहे.

rohit.patil@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanskruti more a visually challenged chess player asj