Success Story Of IPS N Ambika: काही लोकांना अगदी लहान वयातच अडचणींचा सामना करावा लागतो. पण, या संकटांचा सामना करीत ते स्वतःच्या यशाचा मार्ग शोधूनच काढतात. कारण- कुठल्याही संकटापुढे मान न झुकवता धैर्य व चिकाटीने मात करूनच आपले ध्येय गाठता येते. पूर्वी स्त्रिया लवकर लग्न करून संसारात रमून जायच्या. पण, आता स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात उतरल्या आहेत. तर अशीच गोष्ट (Success Story) आहे आयपीसी अधिकारी एन. अंबिका यांची; ज्यांच्या मनात आपल्या नवऱ्याने आयपीएस अधिकाऱ्याला दिलेली सलामी पाहून एक स्वप्न जागे झाले.

तमिळनाडूच्या रहिवासी एन. अंबिका यांनी वयाच्या १४ व्या वर्षी एका पोलीस शिपायाशी लग्न केले. लवकर लग्न केल्यामुळे एन. अंबिका वयाच्या १८ व्या वर्षी दोन मुलांच्या आई झाल्या. अंबिका याचे पती पोलीस खात्यात शिपाई होते. त्यांच्याबरोबर अंबिका स्वातंत्र्यदिनी होणारी संचलन पाहायला जायच्या. त्यावेळी त्यांनी आपल्या पतीला एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ‘सलाम’ करताना पाहिले. पतीने आयपीएस अधिकाऱ्याला दिलेली ती सलामी पाहून त्यांना आयपीएस अधिकारी (IPS Success Story) बनण्याची प्रेरणा मिळाली.

हेही वाचा…तीन ते चार क्षेत्रांत केलं काम; दहा हजारात सुरू केला व्यवसाय; असा आहे पद्म पुरस्कारानं सन्मानित शशी सोनी यांचा प्रेरणादायी प्रवास

आयपीसी एन. अंबिका यांची प्रेरणादायी गोष्ट (Success Story) :

त्यावर त्यांच्या पतीने त्यांना सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर आयपीएस अधिकारी होण्यासाठी सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा द्यावी लागते, हेदेखील त्यांनी सांगितले. त्याच वेळी आपणही अशी परीक्षा द्यायची आणि अधिकारी व्हायचे, असा निश्चय अंबिका यांनी केला. त्यानंतर दहावी पूर्ण होण्यापूर्वीच अंबिका यांचा आयपीएस अधिकारी होण्याच्या दृष्टीने प्रवास सुरू झाला. त्यांनी एका खासगी संस्थेतून त्यांची १०वी व १२वी परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षणसुद्धा घेतले. त्यानंतर त्या यूपीएससीच्या तयारीसाठी चेन्नईला गेल्या. त्यांच्या या निर्णयात पतीने त्यांना खंबीर साथ दिली. त्यांच्या त्या प्रगतीच्या प्रवासात त्यांच्या पतीने स्वतःची व्यावसायिक कर्तव्ये पार पाडत, मुलांचीही काळजी घेतली.

मात्र, यादरम्यान एन. अंबिका यांना अनेक आव्हानांचाही सामना करावा लागला. कारण- त्या यूपीएससीमध्ये तीनदा नापास झाल्या. अंबिका यांच्या पतीने त्यांना घरी परत येण्याचा सल्ला दिला. पण, एन. अंबिका यांना आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे होते. त्यांनी २००८ मध्ये चौथ्यांदा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये त्या यशस्वी झाल्या. त्या UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन ‘आयपीएस अधिकारी’ बनल्या. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अंबिका यांना महाराष्ट्रात पहिली पोस्टिंग मिळाली. त्याचबरोबर त्या मुंबईच्या ‘लेडी सिंघम’ म्हणून देखील ओळखल्या जात आहेत.