तृप्ती पंतोजी
दहा वर्षांपूर्वी- मुलीच्या जन्मानंतर ॲलर्जी म्हणजे काय ते समजलं. आपल्या मुलीचा या ॲलर्जीपासून बचाव करण्यासाठी त्यासंबंधी माहिती गोळा करून, तज्ज्ञांशी भेट घेऊन, त्याविषयी अभ्यास करून समाजात ॲलर्जीविषयी जागृती करण्यासाठी धडपडणाऱ्या आईचा ॲलर्जीविषयीचा लेख.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्याकडे कोणाकडे जाताना लहानशी का होईना, पण एखादी भेटवस्तू घेऊन जाण्याची पद्धत आहे. त्या घरात लहान मुलं असतील तर आपण आवर्जून त्यांच्यासाठी खाऊ घेऊन जातो. खाऊ म्हटलं की चॉकलेट, पेढे, कुकीज हा पहिला पर्याय असतो. पण आमच्याकडे कोणी असं काही आणलं तर त्यांना आदराने नको म्हणून आम्हाला ॲलर्जी असल्याचं सांगतो. मग ओघाओघानं ॲलर्जीवर चर्चा होते. नेमकं काय होतं, थोडं खाल्ल्याने काय होतं, ॲलर्जी आणि इंटॉलरेन्स एकच ना, मग ॲलर्जी कधीच जात नाही का?… अशा प्रश्नांवर नेहमीचं ठरलेलं उत्तर द्यायचं. पुढे मग जन्म ठिकाण, भौगोलिक वास्तव्य, जीवन शैली, अनुवांशिकता, प्रॉसेस्ड फूड अशा संभाव्य कारणांवर विचारमंथन होतं. एकंदरीत हे लक्षात आलं की, या विषयावर साधारण माहिती कुठेच उपलब्ध नाही.

हेही वाचा : निसर्गलिपी: पुष्पलता

ॲलर्जी म्हणजे नेमकं काय?

सामान्यतः हानिकारक नसणाऱ्या वस्तूंच्या (खाद्य पदार्थ, परागकण, धूळ, लॅटेक्स, पाळीव प्राणी, काही औषधे, अगदी ॲलर्जीची औषढे सुद्धा इ.) संपर्कात आल्यानं झालेली रोग प्रतिरोधक संस्थेची अनावश्यक प्रतिक्रिया म्हणजे ॲलर्जी. अशा वेळी शरीरात इम्युनोग्लोबुलीन ई (आयजी ई) नावाच्या प्रतिपिंडांच्या संख्येत वाढ होऊन शरीरात हिस्टामिन नावाच्या रसायनचा स्राव होतो. परिणामस्वरूप काही मिनटांतच अंगावर रॅश येणे, शिंका येणे, ओठ-तोंड-डोळे सुजणे, घसा खाजवणे, पोटदुखी व उलट्या यांपैकी एक किंवा अनेक लक्षणं दिसतात. कधीकधी ही लक्षणं अतिगंभीर स्वरूपाची असतात. तेव्हा क्षणार्धात रक्त दाब कमी होऊन श्वास घेणं अशक्य होतं, याला ॲनाफिलॅक्सीस असं म्हणतात.

अनेकदा एक्झिमा आणि दमा होण्याचं कारण ॲलर्जीच असतं. तसंच एक्झिमा असणाऱ्या व्यक्तींना पुढील आयुष्यात ॲलर्जी होण्याची शक्यता असते. ॲलर्जी नेहमीच जन्मजात नसून कोणालाही आणि कोणत्याही वयात होऊ शकते, हे आता पर्यंत झालेल्या शोधांवरून कळतं.

ॲलर्जीचे प्रकार-

ॲलर्जीचे मुख्यतः दोन प्रकार असतात.

१. पहिल्या प्रकाराला आयजी ई मिडिएटेड ॲलर्जी म्हणतात. यात लक्षणं तासाभराच्या आत येतात आणि गंभीर असतात. या प्रतिक्रियेचा परिणाम त्वचा, पचन व श्वसन संस्था आणि रक्ताभिसरण प्रणाली या सर्वांवर होतो. काहींना केवळ रॅश येते, तर काहींना त्याबरोबरच इतर त्रासही होतात. लक्षणं नेहमीच ठरावीक प्रमाणात आणि एकसारखीच नसतात.

हेही वाचा : वयाच्या आठव्या वर्षी लग्न अन् भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक वर्षाहून अधिक तुरुंगवास; पाहा ‘या’ शूर महिलेची कहाणी

२. दुसरा प्रकार नॉन-आयजी ई मिडिएटेड – यात आयजी ईची मध्यस्थी नसून खाद्य पदार्थांमध्ये असलेल्या प्रोटीनमुळे मुख्यतः पचनसंस्थेला दुखापत होते. उदा – सिल्याक डिसीझ. यात लक्षणे खाल्ल्यावर काही तासांनी किंवा १-२ दिवसांत येतात.
तिसरा प्रकार यावरील दिलेल्या दोन्ही प्रकारांचं संयोजन असतं. त्याला मिक्सड आयजी ई मिडिएटेड आणि नॉन-आयजी ई मिडिएटेड ॲलर्जी म्हणतात.

या सर्व प्रकारांत ॲलर्जन्सचं सेवन किंवा संपर्क कटाक्षाने टाळावा लागतो. त्याच बरोबर आहारात आवश्यक पोषक तत्वांचे पर्याय समाविष्ट करून घेण्यासाठी डॉक्टर आणि आहारतज्ञांचं मार्गदर्शन महत्त्वाचं असतं.
मुख्य ॲलर्जन्स –

ॲलर्जन्सची वर्गीकरण ते मुख्यतः शरीरात कसे प्रवेश करतात त्यानुसार होतं.

वायूजन्य ॲलर्जन्स – असं ॲलर्जन्स जे हवेतून शरीरात जातात उदा. धूळ, परागकण, अत्तर, पाळीव प्राण्यांच्या शरीरावरील धूळ इत्यादी. यामुळे मुख्यतः शिंका येणं, नाक वाहणं, डोळे लाल होऊन खाजवणं अशी लक्षणं दिसतात. याला ॲलर्जिक ऱ्हायनायटिस/ हे फिव्हर म्हणतात. ॲलर्जिक ऱ्हायनायटिस सिझनल (ऋतू बदलल्याने), बारमाही किंवा व्यावसायिक कारणांमुळे असू शकतो. वायूजन्य ॲलर्जीमुळे दम्याचा त्रास होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. लॅन्सेटमध्ये आलेल्या एका संशोधनानुसार, भारतात साधारण ३.७५ कोटी दम्याचे रुग्ण आहेत – त्यात ६ ते ७ आणि १३ ते १४ वयोगटातल्या ७% मुलांना (काही ठिकाणी १०-२०% पर्यंत) दम्याचा त्रास असल्याचं दिसतं. या पैकी ५०% मुलांचा दमा हा अनियंत्रित आहे.

खाद्यपदार्थातील ॲलर्जन्स – दूध, गहू, तांदूळ, डाळी, कडधान्य, सुकामेवा, मासे, झिंगा, शेंगदाणे, अंडी, तीळ, खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाणारे प्रिझर्व्हेटिव्ह, सोया हे मुख्य ॲलर्जन्स आहेत. म्हैसूर आणि बंगळुरूमध्ये झालेल्या एका संशोधनातून काही लोकांना भेंडी, वांगी, पपईची ॲलर्जी असल्याचंही कळतं. काही लोकांना सुकामेवा, शेंगदाणे इ.च्या केवळ वासानंसुद्धा त्रास होतो. एकूण भारतातील फूड ॲलर्जीच्या प्रसाराची आकडेवारी अभ्यासलेली नाही आणि प्रकरणे अतिशय कमी प्रमाणात नोंदवली जातात.

हेही वाचा : “पापी माणसांच्या पोटी मुलगी जन्माला येते”, असं म्हणणाऱ्यांच्या घरात मुलगी जन्माला आली, अन्….

चाचण्या

ॲलर्जीची लक्षणं दिसल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार चाचण्या करून घेणं शक्य असतं. चाचण्या मुख्यतः दोन प्रकारच्या असतात-

१. रक्त तपासणी – या तपासणीत ॲलर्जनच्या संपर्कात आल्यानंतर रक्तातील निर्माण होणाऱ्या आयजीइचं प्रमाण मोजलं जातं. प्रमाणानुसार ॲलर्जी आहे किंवा नाही हे सिध्द होतं. अतिसंवेदनशील (शारीरिकदृष्टया) लोकांना, गंभीर ॲलर्जी असणाऱ्यांना, एक्झिमा असणाऱ्यांना किंवा लहान मुलांना ही चाचणी उपयुक्त ठरते. खाद्यपदार्थांच्या ॲलर्जीसाठी ही तपासणी सुरक्षित पर्याय आहे. या तपासणीला खर्च जास्त येतो आणि रिझल्ट यायला साधारण एक आठवडा लागतो.

२. स्किन प्रिक तपासणी – या तपासणीत हातावर विविध ॲलर्जन्सचा एक एक थेंब घालतात आणि त्या त्या ठिकाणी सुई टोचतात. ज्या ॲलर्जन्सनी शरीराला त्रास होतो त्याच ठिकाणी फक्त पुरळ उठतं किंवा गाठ येते.
अशा रीतीनं कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे किंवा नाही हे ठरविलं जातं. ही चाचणी कमी खर्चाची आहे आणि अगदी पंधरा मिनिटात करता येते, मात्र अंगावर एक्झिमा, पुरळ असल्यास ही चाचणी करणं शक्य नसतं.

हेही वाचा : १०१ व्या वर्षीही शिकवतात योग प्रयोग; फ्रेंच शिक्षिकेचा भारताकडून पद्मश्री पुरस्काराने गौरव

मग फूड इंटॉलरेन्स म्हणजे?

शरीरात विशिष्ट पदार्थ पचविण्यासाठी लागणारं एन्झाईम्स पुरेशा प्रमाणात नसल्यानं होणाऱ्या त्रासाला फूड इंटॉलरेन्स असं म्हणतात. याची लक्षणं खाल्ल्याच्या २४ तासानं दिसायला लागतात. उदा – दुधात असणाऱ्या लॅक्टोस या साखरेला पचविण्या करिता पोटात ‘लॅक्टेझ’ नावाचं एन्झाईम हवं असतं. ते कमी प्रमाणात असल्यास अपचनानं पोट फुगणं, पोटदुखी, उलट्या, जुलाब, वायुविकार अशी सगळी लक्षणं दिसतात. याला ‘लॅक्टोस इंटॉलरेन्स’ असं म्हणतात. केवळ स्पर्शानं किंवा श्वासातून त्याचा त्रास होत नाही आणि या प्रक्रियेत रोगप्रतिरोधक संस्थेचाही सहभाग नसतो. बऱ्याच प्रमाणात लोकांमध्ये ग्लूटेन( गहू, बार्ली), लॅक्टोस, हिस्टामिन, कॅफिन, मोनोसोडियम ग्लूटामेट (प्रोसेस्ड फूड मध्ये चव वाढवण्यासाठी वापरलं जाणारं रसायन) चं इंटॉलरेन्सेस दिसतात. फूड इंटॉलरेंसच्या तपासणी साठी रक्त चाचणी, तसंच तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार आहारातून काही पदार्थ वर्ज्य केले जातात.

हेही वाचा : बायकोच्या ‘या’ सल्ल्यामुळे, Google चे सीईओ आज दिवसाला कमवतात तब्ब्ल पाच कोटी रुपये! पाहा

संशोधन आणि उपचार

ॲलर्जी ही जगभरात चर्चेचा एक मोठा विषय असून त्यावर संशोधन सुरू आहे. २०२१ मध्ये झालेल्या एका शोधात शरीरात न्यूरिटिन नावाचं प्रथिनं कमी असल्यानं ॲलर्जी होण्याची शक्यता वाढते असं दिसून आलं आहे. तरी अजूनही छातीठोकपणे ‘हेच ते कारण’ आहे असं कोणीही सांगू शकत नाही. अँटिहिस्टॅमिन्स (हिस्टामीन रोधक) आणि एपिनेफेरीन इंजेक्शन हे तात्पुरते उपचार आहेत. इम्युनोथेरपी, ॲलर्जी शॉट्स वायूजन्य ॲलर्जीवर काही प्रमाणात यशस्वी ठरतात. काही वर्षं हा उपचार घेतल्यावर ॲलर्जीची तीव्रता कमी होते आणि फारच थोड्या प्रमाणात ती पूर्णपणे जाते. फूड ॲलर्जीवर इम्युनोथेरपी अजूनही हवी तेवढी सुरक्षित आणि परिणामकारक नाही. भारतात आयुर्वेद आणि होमिओपॅथीनं ॲलर्जी वर मात करता येते असे मानतात मात्र या विषयावर लिखाण किंवा संशोधन सापडत नाही.

एकूण काय तर सध्या ॲलर्जीवर अजूनही ‘रामबाण इलाज’ मिळालेला नाही.
trupti.pantoji@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When looking for the causes of allergies css