कलकत्ता असो वा बदलापूर… मुलगी, बाई ही केवळ उपभोगाची वस्तू आहे असं समजून तिला ओरबाडलं जातं. कामाचं ठिकाण असो वा चार भिंतीच्या आत- तिचं शोषण होत राहतं. कधी नकोशी म्हणून गर्भातच मारली जाते तर कधी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर संस्कृती, परंपरा यांच्या नावाखाली तिचा आवाज दाबला जातो.

‘काय तिने ते कपडे घातले होते…‘, ‘कशाला हवी फॅशन…’, ‘मी म्हणते, बाईने काम करायला बाहेरच का पडावं…’ असं बरंच काही तिच्या कानावर आदळत होतं… तिच्या कानावर पडणाऱ्या या वाक्यांनी ती अस्वस्थच होत होती. बालात्काराची ती घटना तिच्या डोक्यातून जात नव्हती तोच चार वर्षाच्या चिमुकलीवर शाळेतील एका कर्मचाऱ्याने केलेल्या अत्याचाराची बातमी ऐकून तिच्या मनात अनेक घटनांचं मोहोळ उठलं.

हेही वाचा : The Sky Queen: कॅन्सरवर मात करून सुरू केला स्वतःचा व्यवसाय अन् झाली करोडो रुपयांची मालकीण

बलात्कार हा नेहमीच शारीरिकच असतो असं नाही. कुणाच्या अश्लिल नजरा… कोणाचे ओंगळवाणे स्पर्श… कोणा अनोळख्याचेच कशाला, जेव्हा ते आपल्याच माणसांचे असतात तेव्हा ते जास्त त्रासदायक असतात. आणि कुणाला सांगताही येत नाहीत. भूतकाळात तिच्या सोबत घडलेले प्रसंग तिच्या नजरेसमोर येत राहिले. त्या नकळत्या वयात ती अगदी चिमुकली नव्हती- असेल दहा वर्षांच्या आसपास. घरी गावाकडे आजी वारली म्हणून तिचं कुटुंब ती आणि तिच्या लहान बहिणीला तिच्या मावशीकडे ठेवून गावाला निघून गेलं. मावशीच्या मुलांसोबत दंगा मस्ती करून ती अंथरूणात शिरली. दिवसभराच्या थकव्याने ती कधी झोपी गेली हे तिलाच कळलं नाही. जाग आली तेव्हा तिला कळलं की तिच्या शेजारी तिचा काका झोपला होता. नुसता झोपला नाही तर संपूर्ण शरीरावर हात फिरवत होता. पुढे काही कळण्याच्या आत…. दुसऱ्या दिवशीही तोच प्रकार. ती सरळ तिथून उठून दुसरीकडे निघून गेली. तर काका थोड्या वेळानं पुन्हा तिथं आला…

हे सगळ कुणाला सांगणाार? मावशी रागवेल म्हणून ती आईची वाट पाहत राहिली. आईला आल्यावर तिला सांगितल्यावर ‘तुझ्या बाबांना काही सांगू नको, नाहीतर…’ असं सांगून तिनंही या प्रकरणावर पडदा टाकला. यानंतर त्याच काकानं तिला कुमारी पुजनासाठी घरी बोलवून नवा ड्रेस घेऊन दिला आणि तो त्याच्यासमोरच बदलायला लावला. तेव्हाही त्याची नजर आणि स्पर्श नकोसा वाटला. या घटनेचे ओरखडे तिच्या मनावर राहिले ते कायमचेच. इतके की लग्नाच्या पहिल्या रात्री त्याचा झालेला स्पर्शही तिला नकोसा वाटला होता. तिच्या मनावरचे आझे तिला त्याच्या जवळ हलके करायचे होते. पण… तो काय म्हणेल या भितीपोटी ती गप्प बसली. काही घटना विसरण्यासारख्या नसतातच. त्या कुणाला सांगताही येत नाहीत आणि विसरताही… वर्तमान पत्रातल्या वा वेगवेगळ्या वाहिन्यांवरील स्त्रीयांच्या लैंगिक अत्याचाराच्या बातम्या या आठवणी अधिक गडद करतात आणि त्रास देत राहतात.

हेही वाचा : वडिलांचे हरपले छत्र, घर खर्चासाठी सुरू केले इंग्रजीचे क्लास; आज कमावतेय लाखो रुपये; वाचा नीतू सिंग यांचा संघर्षमय प्रवास

कलकत्ता असो वा बदलापूर… मुलगी, बाई ही केवळ उपभोगाची वस्तू आहे असं समजून तिला ओरबाडलं जातं. कामाचं ठिकाण असो वा चार भिंतीच्या आत- तिचं शोषण होत राहतं. कधी नकोशी म्हणून गर्भातच मारली जाते तर कधी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर संस्कृती, परंपरा यांच्या नावाखाली तिचा आवाज दाबला जातो. खूप कमी वेळा तिच्यात संघर्ष करण्याची ताकद उरते. अनेकदा तिला मरण सोपं आणि जगण अवघड होऊन जातं… तिच्या व्यथा मग सामान्य जनतेसाठी कुतूहल, चर्चेचा विषय ठरतो… तिच्यासाठी मेणबत्ती मोर्चे निघतात… समाजमाध्यमांवर तिच्यावर कसा अन्याय झाला याच्या चर्चा होत राहतात. तिची,तिच्या कुटुबियांची ओळख उघड करत सहानुभूती पेरण्याचा प्रयत्न होतो. ती निर्भया, दामिनी अशा नव्या नावांशी ओळखली जाते. पण या लाटेत मूळ मुद्दा बाजूला पडतो तो- तिच्यावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला झालेली शिक्षा, तिला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस असो वा प्रशासन यांनी केलेले प्रयत्न…

अशा विकृतींवर जरब बसवण्यासाठ ‘महिलांची सुरक्षितता’ या गोंडस नावाची झालर चढवली जाते. या विचारात असतानाच पुन्हा त्या लहानगीवरील अत्याचारानं तिचं मन हेलावून जातं.

हेही वाचा : ADR Report : महिला सुरक्षित राहतील कशा? लोकप्रतिनिधीच ठरले भक्षक; आमदार आणि खासदारांविरोधातच बलात्काराचा आरोप!

तिला स्वसंरक्षणाचे धडे द्यायचे. तिच्याजवळ मिरचीपुड ठेवायची… गुड टच बॅड टच शिकवायचा असं बरंच काही मनात घोळवत असताना दुसरीकडे हे सारं ती चिमुकली झेपवणार कसं… तेव्हा ती नकळतपणे पुटपुटली… ‘बाई गं, असं काही होत असेल तर जिवाच्या अंकाताने ओरड… साऊंड प्रुफ भिंतीवर आवाज आदळल्यानंतर एखादा कृष्ण तुझ्या मदतीला येईल असं नाही, पण तुझा आवाज तुझ्याच कानावर आदळेल आणि स्वत:च्या मदतीसाठी पुन्हा हिंमतीने प्रयत्न करशील…